महात्मा गांधी आणि विनोबांच्या प्रेरणेतून दुर्गम भागात काम : डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे

‘आयएएस’ आशुतोष सलील यांच्या ‘बिईंग द चेंज-इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा’ पुस्तकाचे प्रकाशन

    03-Dec-2022
Total Views | 104

MahaMTB



नवी दिल्ली :
“महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची प्रेरणा मिळाली आणि आम्ही दुर्गम भागात वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. यामध्ये सरकारी व्यवस्थेस वंचितांपर्यंत नेण्यास प्राधान्य दिले,” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘भारतीय प्रशासकीय सेवे’तील (आयएएस) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आशुतोष सलील यांच्या ‘बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हे दाम्पत्य, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि केंद्र सरकारच्या ‘कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन’चे सदस्य प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोल्हे दाम्पत्याने मेळघाटातील आपला प्रवास उलगडून दाखवला.

ते म्हणाले की, “महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारातून शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर जाणीवपूर्वक जिथे प्राथमिक वैद्यकीय केंद्र 30 किलोमीटर असेल, तिथे जाऊन काम करण्याचे ठरविले होते. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र तब्बल 65 किलोमीटर असलेल्या बैरागडची निवड केली. तेथील वनवासी समाजाला शहरातून आलेला डॉक्टर आपल्यासाठी काम करतो, हे प्रथम पटलेच नाही.” मात्र, हळूहळू त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या आरोग्यासाठी भरपूर काही करता आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवीण परदेशी यांच्यासारखे अधिकारी समाजात गरजेचे असल्याचे मत डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, “बैरागड येथे येणारे पहिले अधिकारी म्हणजे प्रवीण परदेशी. त्यांनी तेथे येऊन जनतेच्या सर्व समस्या समजून घेतल्या आणि त्यांचे निराकरणही केले.” शाळेचा प्रश्न, दवाखान्याचा प्रश्न, रस्ता-पूल, पाणी आदी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मनापासून यशस्वी प्रयत्न केल्याचेही डॉ. कोल्हे यांनी यावेळी नमूद केले. लेखक आशुतोष सलील यावेळी बोलताना म्हणाले की, “प्रवीण परदेशी यांच्यासोबत काम करताना समस्यांची नेमकी जाणीव झाली. त्याचप्रमाणे डॉ. कोल्हे दाम्पत्य आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांचे काम पाहून ते सर्वांसमोर यावे,” या हेतूने पुस्तकाचे लिखाण केल्याचे त्यांनी सांगितले.


वनवासींनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे असून तो त्यांचा हक्कच : प्रवीण परदेशी
वनवासी समाज हा जंगल, डोंगरदर्‍या आणि प्रतिकूल परिस्थितीतच रमतो, यात तथ्य नसल्याचे मत वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, “वनवासी बांधवांना तेच हवे आहे, हा काही लोकांनी पसरवलेला ’रोमँटिझम’ आहे. मात्र, त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे असून तो त्यांचा हक्क आहे. त्याचप्रमाणे विकास करताना त्याचा प्रतिकूल परिणाम होणार्‍या नागरिकांची काळजी घेणे आवश्यक असते. मेळघाटमधील व्याघ्र प्रकल्पासाठी गावांचे पुनर्वसन करताना त्यांच्या पायाभूत सुविधांची योग्य ती काळजी घेतली,” असे परदेशी यावेळी बोलताना नमूद केले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121