उद्धवसेनेने रखडलेला प्रश्न फडणवीसांनीच सोडवला - नितेश राणे

03 Dec 2022 13:26:08
 
Nitesh and Uddhav
 
 
नितेश राणे
 
 
मुंबई : 'उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमुळे मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता. ठाकरेंनी केवळ टक्केवारीचे धोरण राबविल्यामुळे हे प्रश्न इतकी वर्षे सुटू शकले नव्हते. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानत असून यासाठी त्यांचे अभिनंदनही करतो. मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असलेला पण उद्धवसेनेने रखडवलेला प्रश्न अखेरीस फडणवीसांनीच सोडवला,' असे म्हणत आ. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
 
 
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असून, त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक व रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश आले असून, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. आता या नव्या कायद्यानुसार विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले / रखडलेले सेस (उपकर) इमारती प्रकल्प म्हाडामार्फत ताब्यात घेऊन त्याचा पुनर्विकास करणे यामुळे शक्य होणार आहे.
 
 
नितेश राणे म्हणाले की, 'मुंबईकरांसाठी आवश्यक आणि महत्त्वाचा असलेला फार मोठा प्रश्न आता देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुटला आहे. त्यासाठी मी देवेंद्रजींसोबतच मुंबईकरांचे देखील मनापासून अभिनंदन करतो. मुंबईतील जुन्या इमारतींचे काय होणार ? याची मुंबईकरांना वर्षानुवर्षे चिंता होती. पण देवेंद्रजींनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम विधेयकाला मंजुरी मिळाली असून त्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे.'
 
 
मुंबईवर खरे प्रेम भाजपचेच !
 
 'पुनर्विकासासाठी रखडलेल्या इमारतींचा प्रश्न आता कायमस्वरूपी संपलेला असून याची काळजी करण्याची आता काहीही आवश्यक राहिलेली नाही. इतकी वर्षे केवळ उद्धव सेनेच्या टक्केवारीच्या धोरणामुळे हे प्रश्न जैसे थे राहिले. मुंबईकरांवर खोटे प्रेम दाखवण्यात आणि खोट्या स्वप्नांमध्ये रमवण्यापर्यंतच उद्धवसेनेचे काम होते. परंतु, यापुढे आता याची पुनरावृती होणार नाही. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आता चिंता करण्याची गरज नसून फडणवीसांच्या पुढाकाराने या सुटला असल्याने मुंबईवर खरे प्रेम हे भाजपचेच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे,'असे नितेश राणेंनी म्हटले आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0