पोलीसांना फोन करुन उद्धव ठाकरेंनी उमेश कोल्हे प्रकरण दाबले? चौकशी होणार
मुंबई : अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरणात आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केलीये. त्याला सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आलंय. आता उद्धव ठाकरेंचीही एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता निर्माण झालीये. विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना आमदार रवी राणा यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस मंत्र्याच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी हे केल्याचा दावा राणांनी केलाय.
रवी राणा म्हणाले, "उमेश कोल्हे हत्याकांड 33 महिन्यांच्या सरकारच्या काळात झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे होते. उमेश कोल्हे हिंदू विचाराचे होते. हिंदू विचारांचा प्रचार-प्रसार करत होते. नुपूर शर्माची पोस्ट, त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हेंनी पोस्ट व्हायरल केली. त्यावेळी त्यांना धमक्या आल्या. धमक्या आल्यानंतरही अमरावतीच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी हे गांभीर्यानं घेतलं नाही. जेव्हा उमेश कोल्हेंची चौकात हत्या करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो तपास एका काँग्रेसच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून चोरीच्या प्रकरणात बदलल्याचं सांगितलं." असा खुलासा रवी राणांनी केला.
पुढे ते म्हणाले, "मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, एसआयटीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. पोलीस अधीक्षकांचीही चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे सभागृहात नाहीत, पण त्यांना माझं सांगणं आहे की, काँग्रेसच्या सांगण्यावरून तुम्ही हिंदू विचारांच्या लोकांना दाबत असाल, तर हे सरकार हिंदू विचाराचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचा तपास करतील. उद्धव ठाकरेंनी केलेल्या फोनची चौकशी झाली पाहिजे." अशी मागणी रवी राणांनी विधानसभेत केली.