नववर्षाचे स्वागत करुया सकारात्मकतेने...

26 Dec 2022 20:53:31
नववर्ष


तुम्ही तुमची सकारात्मक मानसिक प्रतिमा आणि प्रसन्न भावनांचे भांडार तयार केल्याने तुम्हाला नकारात्मकतेचा पूर्वाग्रह दूर होण्यास मदत मिळू शकते. तुम्ही एखादा सकारात्मक क्षण अनुभवाल, तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ घ्या. तुम्हाला वाटत असलेल्या चांगल्या संवेदना, आनंदी विचार आणि आनंददायी भावनांमध्ये पूर्णपणे गुंतून राहा.


तुमच्या रोजच्या जीवनात बर्‍याच वेळा तुम्हाला कदाचित काही व्यक्तींकडून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते, असा अनुभव आला असेल. तुम्हाला काही वातावरणात खूप सुखद आणि इतर ठिकाणी बेचैनी जाणवली असेल. काहीवेळा हे आपल्या पूर्वीच्या अनुभवांमुळेही होत असावे. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की, अशी ऊर्जा वास्तविक असावी आणि ती मोजण्यायोग्य आहे. असे अनुभवजन्य पुरावेदेखील आहेत की, सभोवतालच्या भौतिक तपशीलांचा तुमच्या मूडवर खास परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या झोपेतही व्यत्यय आणू शकतो. तुम्हाला असे अस्वस्थ करणारे वातावरण हे नकारात्मक ऊर्जेचे असल्याचेही जाणवू शकते. इतरांचा असाही समाज आहे की लोक इतरांचा राग, दुःख आणि इतरांनी व्यक्त केलेल्या नकारात्मक भावना कळत-नकळत स्वतःमध्ये शोषून घेतात.


जर तुम्ही काही लोक किंवा विशिष्ट ठिकाणांच्या रूपात नकारात्मक ऊर्जा अनुभवत असाल किंवा तुम्ही नकारात्मक आत्म-चर्चा करत असाल, तर तुम्हाला खालील चिन्हे आणि लक्षणे आढळून येतात. इतरांवर टीका करणे हा तुमच्या आंतरिक अशांतीचा दोष कोणावर तरी किंवा इतर कशावर तरी ठपका ठेवण्याचा एक मार्ग आहे. इतरांवर टीका केल्याने तुम्हाला सुरुवातीला बरे वाटेल. परंतु, नंतर ते क्वचितच सुखद वाटते. तुम्ही खूप तक्रार करत असता. तक्रार करणे ही अशी अंगभूत सवय होऊन जाते की, आपण ती केव्हा करत आहोत, हे आपल्याला कळत नाही. जेव्हा तुम्ही सतत तक्रार करता, तेव्हा तुम्ही तुमची नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत असता, जिचा इतरांवर परिणाम होऊ शकतो. दीर्घकालीन नकारात्मक भावनांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. तणाव रोगप्रतिकारक शक्ती बिघडवू शकतो आणि मेंदूतील सकारात्मक रसायने नष्ट करू शकतो.

वारंवार नकारात्मक विचार तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब करतात. झोपेची कमतरता नकारात्मक विचारांना चालना देते की नकारात्मक विचार तुमची झोपमोड करतात, हे अस्पष्ट आहे. कदाचित नकारात्मक विचार आणि खराब झोप यांचे मिश्रण नंतर एक दुष्टचक्र निर्माण करते. आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा मोजण्यासाठी तंत्रज्ञान नसेल. परंतु, नकारात्मक ऊर्जा कशी वाटते, हे मात्र आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहे. कधी ती रोजच्या चिडचिडीत दिसते व कधी नैराश्यासारख्या मानसिक आजारांतून दिसते. खरं तर, मानवी शरीरात नकारात्मक ऊर्जेची काही शारीरिक लक्षणेदेखील आहेत, जी मूलत: मन, शरीर, ऊर्जा आणि जीवंत अनुभव यांच्यातील संबंध किती जवळचे असू शकतात, हे दर्शवतात.

नकारात्मकता पूर्वाग्रह खर्‍या माहितीच्या अनुपस्थितीत संभाव्य हानिकारक उत्तेजना टाळण्यास मदत करते. संशोधनात असे आढळून आले आहे की, आपले मेंदू नकारात्मक उत्तेजनांना अधिक तीव्रतेने प्रतिसाद देतात. जगभरात, नकारात्मक बातम्यांचे लेख प्रसिद्धी माध्यमांवर वर्चस्व गाजवताना दिसतात. पण, ते इतके प्रचलित का आहेत? नकारात्मक भावना सकारात्मक भावनांपेक्षा जास्त काळ टिकतात, हे त्यामागील महत्त्वाचे कारण लक्षात घेणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर, नकारात्मक बातम्यांद्वारे सरासरी अधिक माणसे उत्तेजित होतात आणि त्यावर अधिक लक्ष देतात. अलीकडील कोरोनाच्या काळात हे स्पष्ट लक्षात आले की, नकारात्मक घटनांबद्दल उहापोह करण्यात आपण अधिक वेळ घालवतो आणि अनेकदा त्यांच्याबद्दल अधिक तर्कवितर्क करतो.

आपण आपली सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती कशी वाढवायची, यासाठी भरीव विचार करणारे आवश्यक आहे. तुमच्या सामाजिक वर्तुळाचा पुनर्विचार करा. तुम्ही सकारात्मक लोकांशी संबंध ठेवल्यास अधिक आनंदी व्हाल. सर्व नकारात्मक लोकांना आपल्या जीवनातून काढून टाकणे शक्य किंवा इष्ट असू शकत नाही. तथापि, आपण त्यांच्या उपस्थितीत सकारात्मक ऊर्जा जोपासण्याचे अनेक मार्ग शोधू शकता. सर्वप्रथम आपल्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मकतेच्या कोशाची कल्पना करणे. दुसरे म्हणजे, सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी विनोदाचा वापर करणे. उपयुक्त गोष्टी आणि तुम्हाला आवडत असलेल्या वस्तू मनात व प्रत्यक्षात धरून ठेवा आणि बाकीच्या नको असलेल्या गोष्टींपासून मुक्त व्हा. तज्ज्ञांकडे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्याच्या पद्धतींची एक लांबलचक यादी आहे. त्यांच्या काही सामान्य सूचनांमध्ये नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, निसर्गात अधिक वेळ घालवणे, चांगले छंद बाळगणे, सकस सामाजिक नेटवर्क असणे हे समाविष्ट आहे.


ध्यानधारणा किंवा सजग (माइंडफुलनेस) प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला जीवनाचे मूल्य सापडू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, सजग राहण्यामुळे दैनंदिन जीवनातील सांसारिक कार्य सकारात्मक अनुभवात बदलू शकतात. तुम्ही ध्यान करा किंवा नका करु, शांत करणारा मंत्र उच्चारल्याने तुमची सकारात्मक ऊर्जा प्रवाही राहते. भूतकाळातील घटनांना तुम्ही सोडून द्या - सतत नकारात्मक घटनांकडे वळल्याने तो तुमचा वर्तमान लुटतो आणि तुम्ही निराश होता. जेव्हा तुम्ही थोडे थांबून सकारात्मक अनुभवासाठी थोडा वेळ काढता, तेव्हा तुम्ही त्याचा आस्वाद शांतपणे आणि समाधानाने घेत असता आणि भविष्यासाठी मधूर आठवणी तयार करत असता. तुम्ही तुमची सकारात्मक मानसिक प्रतिमा आणि प्रसन्न भावनांचे भांडार तयार केल्याने तुम्हाला नकारात्मकतेचा पूर्वाग्रह दूर होण्यास मदत मिळू शकते. तुम्ही एखादा सकारात्मक क्षण अनुभवाल, तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ घ्या. तुम्हाला वाटत असलेल्या चांगल्या संवेदना, आनंदी विचार आणि आनंददायी भावनांमध्ये पूर्णपणे गुंतून राहा.पुढच्या आठवड्यात नवीन वर्ष येत आहे अशावेळी आपली ऊर्जा आपण विधायक ठेवली, तर त्याचा फायदाच होईल नाही.





-डॉ. शुभांगी पारकर


Powered By Sangraha 9.0