मूल जन्माला आल्यावर ते त्याच्या पाहिल्या वाढदिवसापर्यंत बाळाला आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी काही लसी दिल्या जातात. त्यास प्राथमिक लसीकरण असे म्हणतात. मूल जन्मल्यावर तिसर्या दिवशी ‘बीसीजी’ लस आणि ‘हिपाटाटिस बी’ या लसीचा पहिला डोस दिला जातो. ‘हिपाटायटिस बी’चा दुसरा व तिसरा डोस अनुक्रमे दीड महिना व साडेतीन महिन्यांमध्ये दिला जातो. पोलिओ व ट्रिपलचे डोस हे दीड, अडीच व साडेतीन महिन्यांत दिले जातात, तर ‘गोवर’ची लस नवव्या महिन्यांत दिली जाते. या सर्वांमुळे बाळाला ‘टिबी’, ‘पोलिओ’, ‘धर्नुवात’, ‘डांग्या खोकला’, ‘डिप्थेरिया’, ‘गोवर’ व ‘जर्मन मिझल’ या रोगांपासून संरक्षण मिळते.
महाराष्ट्रात झालेला ‘गोवर’च्या साथीचा उद्रेक लवकर आटोक्यात आला. मुंबईत दोन दिवसांपूर्वी ‘गोवर’चा एकही रुग्ण आढळला नाही. साथ आटोक्यात आणल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन. घरोघरी जाऊन मुलांच्या लसीकरणाचा सर्व्हे करणे, ‘गोवर’च्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविणे, लोकशिक्षण देणे, ‘गोवर’च्या आजाराचे लवकर निदान करून अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, सरकारी यंत्रणा, बालरोग तज्ज्ञ, फॅमेली डॉक्टर आणि सेवाभावी संस्था यांच्यातील चांगला समन्वय यामुळे ‘गोवर’ची साथ लवकर आटोक्यात येऊ शकली.
कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक मुलांचे प्राथमिक लसीकरण राहून गेले. ‘गोवर’च्या साथीचा उद्रेक हा लस न दिल्यामुळेझाला असावा, असा कयास आहे. या काळात ‘गोवर’बरोबर ‘बीसीजी’, ‘पोलिओ’, ‘त्रिगुणी’, ‘एमएमआर’ या लसीदेखील दिल्या गेल्या नव्हत्या. या उरलेल्या लसीदेखील मुलांना देणे आवश्यक आहे. बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आधी बाळाला ‘बीसीजी’, ‘पोलिओ’, ‘त्रिगुणी’ आणि ‘गोवर’ची लस दिली गेली आहे की नाही, हे पालकांनी आधी तपासून पाहावे. अंगणवाडी सेविका आणि सेवाभावी संस्था यांनी हा सर्व्हे नक्की करावा. भविष्यात लसीकरणाचे कार्ड सर्व मुलांना दिले जावे व ते कार्ड आधारकार्डशी लिंक करावे म्हणजे लसीकरणाची एकत्रित माहिती मिळू शकेल. प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मुलांच्या लसीकरणाचा तक्ता नीट भरून घ्यावा. एखादी लस द्यायची राहून गेली असल्यास ती देण्याची व्यवस्था करावी. लसीकरणाबद्दल समाजात जागरुकता कमी असल्याचे ‘गोवर’च्या साथीच्या उद्रेकादरम्यान जाणवले. सार्वजनिक आरोग्य शिक्षण म्हणून लहान मुलांच्या प्राथमिक लसीकरणासंबंधी थोडक्यात माहिती देत आहे.
मूल जन्माला आल्यावर ते त्याच्या पाहिल्या वाढदिवसापर्यंत बाळाला आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी काही लसी दिल्या जातात. त्यास प्राथमिक लसीकरण असे म्हणतात. मूल जन्मल्यावर तिसर्या दिवशी ‘बीसीजी’ लस आणि ‘हिपाटाटिस बी’ या लसीचा पहिला डोस दिला जातो. ‘हिपाटायटिस बी’चा दुसरा व तिसरा डोस अनुक्रमे दीड महिना व साडेतीन महिन्यांमध्ये दिला जातो. पोलिओ व ट्रिपलचे डोस हे दीड, अडीच व साडेतीन महिन्यांत दिले जातात, तर ‘गोवर’ची लस नवव्या महिन्यांत दिली जाते. या सर्वांमुळे बाळाला ‘टिबी’, ‘पोलिओ’, ‘धर्नुवात’, ‘डांग्या खोकला’, ‘डिप्थेरिया’, ‘गोवर’ व ‘जर्मन मिझल’ या रोगांपासून संरक्षण मिळते. या सर्व लसी सरकारी रुग्णालयात व महानगरपालिकेच्या दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. तसेच, या लसी खासगी फॅमेली डॉक्टर आणि बालरोगतज्ज्ञ यांच्याकडेदेखील उपलब्ध असतात. बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आधी त्याला वरील सर्व लसी देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांची आहे. यासाठी वेळ नसणे, पैसे नसणे या सबबी मुलांसाठी घातक ठरू शकतात. यासाठी व्यापक प्रमाणात लोकशिक्षण होणे जरूरी आहे.
आजारपणाचा त्रास सोसण्यापेक्षा, त्यावर खर्च करण्यापेक्षा आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी केलेला खर्च केव्हाही श्रेष्ठ असतो.
लसीकरणाचा शोध एडवर्ड जेन्नर यांनी १७९६ साली लावला. त्यांनी देवीची (स्मॉल पॉक्स) लस शोधून काढली. ही लस एवढी प्रभावी ठरली की, देवीच्या आजाराचे सार्या जगातून निर्मूलन झाले. अनेक प्रभावी लसींमुळेत्या रोगांचा प्रसार कमी होत चालला आहे. ‘पोलिओ’च्या लसीमुळे आज जगातील १९५ पैकी १९१ देशांमध्ये ‘पोलिओ’चे निर्मूलन झाले आहे. भारत देखील ‘पोलिओ’निमूर्र्लनाच्या उंबरठ्यावर आहे. ‘गोवर’ची लसदेखील प्रभावी आहे. या लसीमुळे गेल्या ३५ वर्षांत ‘गोवर’चे प्रमाण बरेच कमी झाले होते. सध्या झालेला ‘गोवर’च्या साथीचा उद्रेक हा कोरोना काळातील लसीच्या शिथिलीकरणामुळे झाला असावा, असा एक अंदाज आहे. लसीकरण ही जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच ती पालकांची देखील जबाबदारी आहे. पालक शिक्षित वा अशिक्षित, गरीब वा श्रीमंत, ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील प्रत्येक मुलाचे प्राथमिक लसीकरण होणे, हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांचे सहकार्य या मोहिमेत अपेक्षित आहे.
लसीकरण - शंका समाधान
१) कुठल्या तक्त्याप्रमाणे बाळाचे लसीकरण करावे?
‘राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम’ व ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्स’ (आयएपीचा लसीकरणाचा तक्ता हा लहान मुलांमध्ये होणार्या आजारांपासून संरक्षण देणारा आहे. आपले बाळ सुदृढ राहावे, त्याला कमीत कमी आजार व्हावे हा त्यामागील उद्देश. बाळ आजारी पडल्यावर धावपळ करण्यापेक्षा बाळाच्या प्रतिबंधात्मक लसीबद्दल व्यवस्थित माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक अडचण नसेल, तर ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्स’ (आएपी) च्यालसीकरणाच्या तक्त्याप्रमाणे लसीकरण करावे. आर्थिक अडचण असेल, तर किमान राष्ट्रीय लसीकरण अंतर्गत दिल्या जाणार्या लसी वेळेवर घ्याव्यात. या लसी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. जर मध्यममार्ग स्वीकारायचा असेल, तर ज्या लसी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत त्या आधी घ्याव्या व नंतर फॅमेली डॉक्टर किंवा बालरोगतज्ज्ञांकडून उरलेल्या लसी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्याव्या.
२) नवीन लसी किंवा ऐच्छिक लसींची किंमत एवढी जास्त का?
‘न्युमोकोकल’ व ‘मेनिगोकोकल’ लस यांची किंमत प्रत्येकी सुमारे चार हजार रुपये आहे. ‘हिपाटायटिस ए’, ‘रोटा व्हायरस’, ‘चिकन पॉक्स’, ‘स्वाईन फ्लू’ या लसी देखील बर्यापैकी महाग आहेत. या सर्व लसी ‘पेटेंडड’ असल्यामुळे व आयात कराव्या लागत असल्यामुळे त्या महाग आहेत. भविष्यात या लसींची भारतात निर्मिती सुरू झाल्यास यांच्या किंमती कमी होतील.
३) लसीचे साईड इफेक्टस काय आहेत?
प्रत्येक लसीचे साईड इफेक्टस वेगवेगळे आहेत.‘बीसीजी’च्या लसीमुळे छोटीशी फोडी येते. ती काही वेळा पसरून त्यात पू तयार होतो. क्वचित प्रसंगी काखेत गाठ येते, असे आढळल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
‘त्रिगुणी’ इंजेक्शनचे साईड इफेक्ट -
सर्व लसीमध्ये त्रिगुणी लस जास्त त्रासदायक आहे. ताप येणे, इंजेक्शन दिलेली जागा लाल होणे, सुज येणे, पाय हलविताना दुखणे, मूल सारखे रडणे ही लक्षणे पहिले दोन दिवस सगळ्याच मुलांमध्ये दिसतात. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार करावे. क्वचित प्रसंगी ‘ट्रिपल इंजेक्शन’ नंतर आकडीसुद्धा येऊ शकते.
पोलिओ : लस दिल्यानंतर १२ ते २४ तासांत बारीक ताप येणे, हिरवट पातळ संडास होणे यासारखे सौम्य साईड इफेक्टस असतात व ते पुढील एक ते दोन दिवसांत कमी होतात त्यासाठी औषधाची सहसा गरज लागत नाही.
‘गोवर’ची लस : लस दिल्यानंतर साधारण आठवड्याभरानंतर ताप येऊन अंगावर बारीक पुरळ उठते. ताप जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४) एका पायावर जास्तीत जास्त किती इंजेक्शन देता येतात?
एका पायावर दोन ते तीन सेमी अंतराने दोन इंजेक्शन दिले जातात. सर्व मिळून एका दिवशी बाळाला तीन इंजेक्शनदेखील दिले जातात.
५) लसीची तारीख चुकल्यास काय करावे?
तारीख चुकल्यास पुढची तारीख घ्यावी. परंतु, कुठल्याही सबबीखाली लस देणे टाळू नये.
६) ‘हिपॅटाटिस अ’ आणि ‘ब‘ या लसींमध्ये काय फरक आहे?
सर्वप्रथम त्यांच्या किंमतीमध्ये फरक आहे. ‘हिपॅटायटिस अ’ची लस पाण्यावाटे होणार्या ‘काविळी’च्या विषाणूसाठी आहे. पहिला डोस बाळ एक वर्षांचे झाल्यावर दिला जातो. ‘बूस्टर डोस’ सहा महिन्यांने दिला जातो. किंमत साधारणत: एक हजार रुपये प्रति डोस आहे.
‘हिपाटायटिस बी’ : दूषित सुया, रक्त संक्रमण यामुळे होणार्या काविळीसाठी ही लस आहे. जन्माच्या तिसर्या दिवशी, दीड महिना आणि साडेतीन महिने असे तीन डोस दिले जातात. ही लस सरकारी रुग्णालयात मोफत दिली जाते. खासगी रुग्णालयातदेखील या लसीचे दर माफक आहेत.‘गोवर’च्या साथीच्या उद्रेकामुळे आपण सतर्क झालो. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे प्राथमिक लसीकरण झाले आहे की नाही ते तपासून बघावे. नसेल झाले तर ते लवकरात लवकर करून घ्यावे. कारण, आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ आहे.
-डॉ. मिलिंद शेजवळ