वनवासी कल्याण आश्रम व बाळासाहेब देशपांडे

    25-Dec-2022
Total Views |
बाळासाहेब देशपांडे


आज भारतातील वनवासी, जनजाती, बंधूंचा सर्वांगीण विकास हा उद्देश समोर ठेवून अखिल भारतीय स्वरुप असलेले कल्याण आश्रम विशाल संगठन आहे. आज कल्याण आश्रमाला ७० वर्षे पूर्ण होऊन ७१ व्या वर्षात कल्याण आश्रम पदार्पण करत आहे. त्याविषयी आपण जाणून घेऊया.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस २६ डिसेंबर

स्थान : जशपूर नगर
राज्य : छत्तीसगढ
संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बाळासाहेब
जन्मदिवस : दि. २६ डिसेंबर, १९१३
संस्थापक अध्यक्ष परिचय व कार्यपरिचय.
रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. वडील केशवराव देशपांडे सरकारी नोकरीत होते. ते ‘जेलर’ होते. त्यामुळे त्यांचे स्थानांतर होत असे.
शिक्षण व संस्कार

बाळासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सागर, अमरावती, अकोला तथा नरसिंहपूरला झाले. वडिलांनी स्थायी निवास हा नागपूरला केला. येथूनच काशी हिंदू विद्यापीठातून ते माध्यमिक (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण झाले.वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी स्वामी विवेकानंद जीवनचरित्र वाचले. नरसेवा नारायण सेवा लहानपणापासून हा ध्यास उराशी बाळगला. पुढे रामकृष्ण आश्रमातील पुस्तकेदेखील वाचली.दीक्षादेखील घेतली.

१९२६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजींची व त्यांची भेट झाली. त्यावेळी नागपूरला ‘वॉकर’ रोडवर असलेल्या व्यायामशाळेत ते लाठी, काठी शिकायला जात होते. त्याचवेळी कृष्णराव जोशींनी डॉक्टरांचा परिचय करुन दिला व डॉक्टर साहेबांशी संपर्क वाढल्याने ते संघाचे स्वयंसेवक बनले. स्वाभाविकपणे बाळासाहेबांवर देशभक्ती, अनुशासन व हिंदुत्वाचे संस्कार झाले.१९३०ला त्यांनी हिस्लॉप कॉलेजात प्रवेश घेतला. १९३५ला बीए, १९३७ला एमए, एलएलबी झाले. १९३८ रामटेकला मामा गंगाधर देवरस यांच्याबरोबर त्यांनी वकिलीला प्रारंभ केला. त्याचवेळी ते रा.स्व.संघाचे रामटेक तालुक्याचे कार्यवाह झाले.

सेवाजीवनाची प्रेरणा

 
बाळासाहेबांची व परम पूजनीय श्रीगुरुजी यांची प्रथम भेट धंतोली शाखेत बौद्धिक कार्यक्रमावेळी झाली. श्रीगुरुजी त्यावेळी ‘वुईह्या’ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करत होते. त्याचे हस्तलिखित वाचण्याचे काम बाळासाहेब करत होते. त्यामुळे श्रीगुरुजींशी भेट होत होती.

श्रीगुरुजी रामटेकला होते. त्यांच्या घरातल्या पुस्तकालयातील सर्व पुस्तके वाचून काढली. अशा प्रकारे त्यांना पूजनीय श्रीगुरुजींचा पावन सहवास लाभला. बाळासाहेबांच्या जीवनाची राष्ट्रसेवेची पृष्ठभूमी तयार झाली.
स्वतंत्रता सेनानी


१९४२ साली महात्मा गांधींनी ‘चले जाव’ हा नारा दिला होता. संपूर्ण भारतात जनाक्रोश व संतापाचे वादळ उठले होते. रामटेकला तहसीलदार कचेरीवर युनियन जॅक उतरुवून तिरंगा ध्वज लावण्यासाठी जनता रस्त्यावर आली. पोलिसांनी गोळीबार करण्यासाठी बंदुका रोखल्या. बाळासाहेबांनी पोलिसांची बंदूक पकडली व विचारले, “गोळीबाराचा लेखी आदेश दाखवा.” या वेळेत लोकांनी तिरंगा ध्वज फडकवला. त्याकाळी हा मोठा गुन्हा होता. नागपूरहून पोलीस बल आले.

बाळासाहेबांना पकडण्यात आले. तुरुंगामध्ये टाकले, यातनापण सहन केल्या. साक्षी बाळासाहेबांच्या विरुद्ध जात होत्या. परंतु, रामटेकचे तहसीलदार हरकरे तथा कवी देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या विरुद्ध साक्ष द्यायला विरोध केला व बाळासाहेबांना न्यायाधीश विकेडन यांनी निरपराध घोषित केले. त्याकाळी ‘वंदे मातरम्’ बोलणे, इंग्रजांच्या विरोधात काम करणे, हा राजद्रोह होता. त्याची शिक्षा ही फाशी होती, पण नियतीला बाळासाहेबांकडून महान कार्य करुन घ्यायचे होते.

विवाह व नोकरी


१९४३ साली बंधू नीलकंठराव यांचे निधन झाले. बाळासाहेबांवर कुटुंबाचा भार आला. १९४३ ला अचलपूर निवासी जहागीरदार यांची कन्या प्रभावती यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
नोकरी


त्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती ठीक नव्हती. रेशन विभागात नोकरी मिळाली. काळा बाजार करणार्‍या एका मोठ्या व्यापार्‍याच्या विरोधात तक्रार वरिष्ठांकडे केली. अपेक्षा होती की, त्याला कठोर शिक्षा होईल. पण मामला दाबला गेला. बाळासाहेबांनी नोकरीचा राजीनामा दिला. परंतु, सगळे पुरावे गोळा करुन खटला स्वतः चालवला व काळा बाजार करणार्‍या व्यापार्‍याला शिक्षा झाली. प.पू.श्रीगुरुजींनीसुद्धा पाठ थोपटली.नागपूरच्या वृत्तपत्रात बातमी आली. कर्तव्यकठोर व अन्यायासमोर झुकण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.

१९४५ ते १९४८ थोडी शांततेत गेली. महात्मा गांधींच्या हत्येनंतर नागपूरला खूप उपद्रव झाला. लोकांना संघाच्या विरोधात भडकवले. स्वयंसेवकांच्या घरावर आक्रमणे झाली. बाळासाहेब देशपांडे यांच्या घरावर जमाव चालून आला. मोठे बंधु समोर आले जे प्रख्यात फौजदारी वकील होते. त्यांना बघून गर्दीतील नेत्यांनी सांगितले, हे वकील साहेब आहेत. यांनी खूप मदत केली आहे. आम्हाला अनेक खटल्यांमधून सोडविले आहे. यांना काही करु नका. आक्रमणकारी जमाव परत गेला. ईश्वराला मोठे कार्य करुन घ्यायचे होते ना!
 
ईश्वराने निर्धारित केलेल्या कार्यक्षेत्राकडे प्रस्थान


१५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. मध्य प्रदेशातील जशपूरनगर संस्थान मध्य प्रदेशमध्ये सामील झाले. तत्कालीन मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल हे प्रथम जशपूरला गेले. ख्रिश्चनांनी काळे झेंडे दाखवले. ‘झारखंड जिंदाबाद, शुक्लजी वापस जावो’ हे नारे लावले गेले. त्यांना अपमानित होऊन परत भोपाळला यावे लागले. शुक्लजी चिंतेत होते. त्यांनी पूज्य ठक्कर बाप्पा यांच्याशी विचारविमर्श करून जशपूरची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्व्हे केला. तेव्हा कळले की, रोमन कॅथलिक चर्च भारत स्वतंत्र झाला असला, तरी स्वीकार करत नव्हता, सरकारी कामावर काम करायला लोकंना मज्जाव करीत होते.

‘इसाई मिशन’च्या दहशतीतून जशपूरला मुक्त करण्याची योजना आखली. आदिमजाती कल्याण विभागाची स्थापना मध्य प्रदेश सरकारने केली. वणीकरजींनी बाळासाहेबांचे नाव सुचवले. बाळासाहेबांची व अन्य सर्वांची सहमती मिळाल्यावर बाळासाहेबांची नियुक्ती क्षेत्रीय शिक्षणाधिकारी पदावर नेमणूक झाली. नियतीने बाळासाहेबांना जशपूरला आणले व संयोग परत सरकारी नोकरीचा आला.
कर्मयोग्याचे कार्यक्षेत्रात पदार्पण


१९४८ साली मध्य प्रदेशातील ख्रिश्चनांच्या लोखसंख्येपैकी जशपूरला अर्ध्यापेक्षा जास्त होती. ‘इसाई मिशन’च्या प्रभावाखाली येऊन स्वतंत्र झारखंडची मागणी येथील जनतेने केली.अशा आव्हानपूर्ण क्षेत्रात सुयोग्य, निर्भीड कार्यकर्त्यांची आवश्यकता सरकारला होती. ही वेळ जानेवारी, १९४८ची होती. बाळासाहेब देशपांडे यांना गांधी वधानंतर शासनाने अटक वॉरंट जारी केले होते. परंतु, शासनाने त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पृष्ठभूमी असल्यानेच शासकीय अधिकारी म्हणून उपयुक्त समजले व त्यांची जशपूर क्षेत्रात आदिमजाती क्षेत्र विकास योजनेअंतर्गत क्षेत्रीय अधिकारीपदावर नियुक्ती केली.

मासिक वेतन १५० रुपये मात्र होते. जशपूर ला येण्यापूर्वी संघ अधिकार्‍यांना भेटले. सर्वांनी या आव्हानात्मक क्षेत्रात कामाला जाण्यास प्रोत्साहित केले. उत्साहाने आव्हानात्मक कामासाठी १९४८ च्या मे महिन्यात नागपूरहून ६९७ किलोमीटर दूर निसर्गरम्य वनक्षेत्रात जशपूरला पत्नी प्रभावतींना घेऊन हे सीता व राम पोहोचले.

जशपूरचे आव्हान


१९४८ साली जशपूर क्षेत्रात ग्रामीण शाळा केवळ इसाई मिशनरी चालवत होते. त्यांची अनेक कामे चालू होती. जणु काही समांतर सरकारच होते. मिशनच्या अनुमतीशिवाय कुठलेही कार्य करणे सोपे नव्हते. धर्मांतरित इसाई वनवासी त्यांच्या हातातले बाहुले बनले होते. ‘झारखंड जिंदाबाद’चे नारे जागोजागी ऐकायला येत होते.सरकारी शाळेत कुणीही मुलगा-मुलगी जाऊ नये, हा त्यांचा प्रयत्न होता. जी मुले जातील त्यांना धमकावले जायचे. पालकांवर बहिष्कार टाकला जायचा. १९४८ साली जशपूर राज्यात इसाई मिशनरींच्या १०० प्राथमिक शाळा, आठ माध्यमिक विद्यालये व दोन उच्च विद्यालये चालत होती.आठ-दहा शाळा चालवण्याची योजना शासनाने स्वीकृत केली होती. त्यात बाळासाहेबांनी बदल करण्यास भाग पाडून १०० शाळा सुरु करण्याची परवानगी मागितली. ठक्कर बाप्पांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले की,“हे करणे खूप कठीण आहे. जर १०० शाळा सुरू केल्या तर मी स्वतः क्षेत्रातील काम बघण्यास येईन.”


अनेक प्रकारचा विरोध व धमक्यांची पर्वा न करता बाळासाहेब देशपांडे यांनी १०० शाळा सुरू केल्या. त्या व्यवस्थित चालवल्या. ‘इसाई मिशन’चा एकाधिकार समाप्त झाला.सरकारी जागेवर मिशनने कब्जा केलेला असायचा तो काढायचा व तेथे शाळा सुरु करायच्या. यावर कॅथलिक चर्चचे के. के. व्हनियरने वणीकरांकडे तक्रार केली की, देशपांडे जेथे आमच्या शाळा आहेत तेथेच शाळा सुरु करतात.बाळासाहेब बलवान, ज्याची सर्वात लांब शेंडी त्याला शिक्षक म्हणून नियुक्त करत. त्यात सर्वात बलवान त्याला मुख्याध्यापक म्हणून नेमत. शिक्षकांना सुरुवातीपासून सांगितले होते की, आपण पोलीस संरक्षण घ्यायचे नाही. आपले रक्षण आपण स्वतः करायचे. याप्रमाणे मिशनचा आतंक दूर केला. शाळेचा प्रयोग सफल झाला.
 

ग्रामदर्शन


बाळासाहेबांना सरकारने गाडी दिली होती. संपूर्ण क्षेत्र पिंजून काढले. एक प्रोजेक्टर दिला होता. रात्री गावात जायचे. लघुपट, रामायण, महाभारत यावर आधारित चित्रपट दाखवायचे. सर्वांना ‘भारतमाता की जय!’ ‘वंदे मातरम्’चा नारा वदवून घ्यायचे व सांगायचे आपला देश स्वतंत्र झाला आहे. आपले नियम आता लागू आहेत. घाबरायचे नाही. अन्याय सहन करायचा नाही. फादरने काही केले तर खटला भरायचा. असे हे सांगत त्याप्रमाणे फादरला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे. लोकांना बघायला बोलवायचे. फादर हा देव नाही. त्याने काही गुन्हा केला, पण काही गडबड, अन्याय, अत्याचार केले, तर आपले न्यायालय त्याला शिक्षा देऊ शकते, अशाप्रकारे मिशनरी दादागिरी बंद केली. १९५१ ला पू. ठक्कर बाप्पा बघायला आले. ठक्कर बाप्पांना परिवर्तनाचा आनंद झाला.

सायमन दुलारची घरवापसी : त्याकाळातील मोठे कार्य


सायमन दुलार जशपूरमधील सर्वात जुने रोमन कॅथलिक इसाई होते. जशपूरला ते आले की, बाळासाहेबांना भेटायचे. एक दिवस बाळासाहेबांना म्हणाले, “मी एकांतात आपल्याशी बोलू इच्छितो.” बाळासाहेबांनी सहर्ष स्वीकार केला. भेटले. सायमनला विचारले, “काय म्हणता?” त्यावर ते म्हणाले, “माझ्या बाबतीत आपण काय सांगू इच्छिता?”त्यावर बाळासाहेब म्हणाले, “तू उरांव आहेस. श्रेष्ठ आहेस.उरांवचा आपला श्रेष्ठ धर्म आहे. सरनाची पूजा करता, सूर्य-चंद्र हे पूज्य मानतात. शेष हिंदू पण झाडांची, दगडांची पूजा करतात.तेव्हा तू हिंदू आहेस. तुला विश्वास होता की, मी पूजा करुन ईश्वरप्राप्ती करु शकतो. पण तू हे सोडले व ख्रिश्चन झाला. तुझ्यात हीनभाव आला. मानवतेच्या नात्याने आपण सर्वांनी प्रेमाने राहावे, असे तुला वाटत नाही. आपले आप्तस्वकीय परके झाले.आपले पूर्वज नकोसे झाले.”


“आज तुला इसाई काय शिकवतात?” त्यावर सायमन दुलारनी सांगितले, “राम, कृष्ण खराब आहेत, चोर आहेत. ते आमचे नाहीत, बाहेरून आले आहेत. आमच्यावर राज्य करतात.हिंदू दुष्ट आहेत. एक दुसर्‍याशी प्रेम करु शकत नाही.” आणि तो हमसून मोठ्याने रडायला लागला व म्हणाला, “आजपासून मी ख्रिश्चन नाही. मी हिंदू आहे. इसाई धर्म सोडल्याने मला नोकरीवरून काढून टाकतील. मी गरीब आहे. मी माझा निर्वाह करीन.” पुन्हा म्हणू लागला, “मी शेकडो लोकांना इसाई बनविले. माझी चूक मला कळली. ती मी सुधारणार. त्यांना परत हिंदू बनवणार. घरवापसी करीन.” त्याला बाळासाहेबांनी कामाला लावले. बोलल्याप्रमाणे सायमन दुलारने गावागावात फिरून घरवापसी कार्य मोठ्या प्रमाणात केले. सगळीकडे वातावरण बदलले. बाळासाहेब सर्वांना समजावत. दबावामुळे, प्रलोभनाने, मारपीट करुन लोकांचे सामूहिक धर्मांतरण झाले होते. दबाव दूर झाल्यावर आपल्या मूळ श्रद्धेकडे परत आले.त्यांच्यावर लादलेल्या इसायतपासून मुक्त झाले.

भय बिन होत न प्रीत


एक दिवस सायमन दुलार गीना बहार चर्चच्या समोरुन जात होता. त्याचवेळी इसाई रोमन कॅथलिक फादर म्यूज चर्चमधून प्रार्थना करुन बाहेर आला. त्याने सायमनला बघितले. सायमन दुलार हिंदू धर्मात गेल्याचा प्रचंड राग मनात होता. त्याने रागाने बायबलच्या पुस्तकाने सायमनच्या तोंडावर मारले. सायमन दुलारने ही घटना बाळासाहेब देशपांडेंना सांगितली. बाळासाहेब त्याला म्हणाले, “येथे पण तू जिंकलास आहेस. ईसा मसीहने सांगितले आहे की, जर तुम्हाला एका गालावर कुणी मारले तर दुसरा गाल पुढे करा. फादर म्यूजने बायबलने तुला मारले आहे हे नीच कृत्य केले आहे. तू त्यांच्यावर केस कर.” बाळासाहेबांनी लिहून दिल्याप्रमाणे सायमन दुलारने तहसीलदार मिश्र यांच्या कोर्टात ‘कलम ३२३’च्या अंतर्गत केस फाईल केली. याच काळात फादर म्यूजने रस्त्यावर सायमन दुलारला घेरले व चाकूचा धाक दाखवून राजीनामा लिहून घेतला. ही घटना पण बाळासाहेबांना सांगितली. त्यावर बाळासाहेबांनी त्याला सांगितले की, तू नुयायालयात सांग, माझ्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला. मला फादर करत असलेला समझोता अमान्य आहे.” न्यायालयाने सायमनची बाजू मान्य केली व फादर म्यूजचा समझोता अमान्य केला.


दुसरी घटना एक दिवशी बाळासाहेब कुनकुरीला पोहोचले.ते आपल्या गाडीत बसले होते. इतक्यात एक व्यक्ती धावत धावत आली व म्हणाली, “आपल्या शाळेतील मुलं गीना बहार मिशन शाळेच्या आवारातून जात होती. त्यांना फादर म्यूजने मारले. त्यापैकी एकाला इतके जोराने मारले की, त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले.” बाळासाहेबांनी त्या व्यक्तीला गाडीत आपल्या बरोबर बसवले व गीना बहार चर्चमध्ये गेले व फादर म्यूजला विचारले, “आमच्या शाळेतील मुलांना का मारले?” त्यावर फादर म्यूज म्हणाला, “ही मुलं आमच्या मिशन शाळेच्या आवारातून जात होती. त्यांनी अतिक्रमण केले. त्यामुळे मी मारले.” यावर बाळासाहेब म्हणाले, “ही जमीन तुमच्या बापाची नाही. देशाची आहे. भारत स्वतंत्र झाला आहे. येथून विदेशी लोकांचे साम्राज्य समाप्त झाले आहे, समजले.”


यावर फादर म्यूज निर्लज्जपणे म्हणाला, “ओहो! आय फरगॉट दॅट इ़ंडिया इज बिकमिंग फ्री!”अर्थात भारत स्वतंत्र झाल्याचे फादर विसरला, यावर बाळासाहेबांना राग आला. बाळासाहेबांचे बरोबर असलेल्या भांडारकरने फादर म्यूजची कंबर पकडली. बाळासाहेबांनी दोन खाडकन थोबाडीत मारल्या.त्यावर फादर म्यूज घाबरला व म्हणाला, “आय अ‍ॅम व्हेरी सॉरी” बोलुन क्षमा मागितली. हे पाहून मिशनची मुले धावत हातात शस्त्र घेऊन तेथे आली. तेव्हा बाळासाहेब जोरात बोलले की, “आपण जाणता आहात का कोणता अपराध तुम्ही केला आहे? तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू शकतो.” फादर म्यूजने धावत आलेल्या मुलांना शांत केले. या घटनेनंतर मुलांना तो मार्ग मोकळा झाला. भय बिन होत न प्रीत.


चिंतन सुरु झाले



या प्रसंगानंतर बाळासाहेबांच्या मनात विचार सुरू झाला की, आपल्या शाळा या शक्तिकेंद्र बनून समोर आल्या पाहिजेत.शाळेतील शिक्षक व छात्र राष्ट्राची शक्ती म्हणून समोर आले पाहिजेत. आज विदेशी मिशनरी रस्त्यावर सायकल, मोटरसायकल, घोड्यावर बसून जात असतात, तेव्हा सडकेवर बसलेले, उभे असलेल्या लोकांना वाकून नमस्कार करावा लागतो. या मिशनरी दहशतीला, प्रभावाला समाप्त केले पाहिजे.हे आपल्या शाळांद्वारा संभव आहे.बाळासाहेबांमुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले. हिंमत आली. कार्यवृद्धी झाली. बाळासाहेब म्हणत, एक वेळा आपण निश्चयपूर्वक विद्रोही इसाई तत्त्वांचा सामना करा की, आपण अनुभवाल त्यांचा प्रतिरोध अधिक काळ टिकत नाही. विजय आपलाच होईल.


सरकारी नोकरीचा राजीनामा


१९४९ ला पूज्य ठक्कर बाप्पा जशपूरला आले. कार्यविस्तार व प्रभाव बघून प्रसन्न झाले. दुर्दैवाने १९५१ ला पूज्य ठक्कर बाप्पांचा मृत्यू झाला.त्यामुळे शासन व वनवासींच्यामध्ये सेतूचे काम करणारी कडी तुटली.स्वतंत्र भारतातील प्रथम निवडणुकीची तयारी सुरू झाली. मतांचे सौदागर मत मिळवण्यासाठी, ख्रिश्चनांचे मत मिळवण्यासाठी फादरना भेटायला गेले. त्यांची प्रथम मागणी होती की, देशपांडे यांची बदली करा. गडचिरोली महाराष्ट्रात पाठवले. सामान्य तक्रार केली. त्यावरही कारवाई केली. खोटे आरोप लावले तपास केला. ते निर्दोष सिद्ध झाले. पुन्हा जशपूरला सन्मानपूर्वक आणले.नोकरीवर हजर झाले. अनुभवाला आले की, पहिल्यासारखे वातावरण राहिलेले नाही. नागपूरला प.पू.श्रीगुरुजींशी विचारविनिमय झाला. त्यांच्याशी झालेल्या निर्णयाप्रमाणे सरकारी नोकरी सोडून अशासकीय स्तरावर संस्था स्थापन करून त्या माध्यमातून जशपूर क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय झाला. नागपूरहून परत जशपूरला आल्यावर मे १९५१ ला सरकारी नोकरीचे त्यागपत्र दिले व वकिलीला प्रारंभ केला.

कल्याण आश्रमाचे ईश्वरीय कार्य प्रारंभ



ईश्वरीय आशीर्वाद असलेले वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य प्रेरणा देणार्‍या प्रसंगातून प्रारंभित झाले. बाळासाहेब देशपांडेंनी वकिलीला प्रारंभ केली. प.पू.श्रीगुरूजींनी मदतीसाठी संघाचे प्रचारक मोरुभाऊ केतकरना जशपूरला पाठवले. काम सुरू करायचे ठरले. बाळासाहेब प्रवास, संपर्कयात्रा करत होते. प्रयत्न चालू होते. तरीपण आश्रम शाळेसाठी ग्रामीण भागातून वनवासी मुलं जशपूरला पोहोचत नव्हती. मोरुभाऊ खिन्न होऊन, कामासाठी आतुर झाले होते.त्या रात्री प्रचंड पाऊस पडत होता. अत्यंत निराश होते. अनेक महिने झाले, पण ज्या कार्यासाठी मी जशपूरला आलो, ते कार्य प्रारंभित व्हायचे काही लक्षण दिसत नाही. कुणी मुलं आली नाही, तर कार्य सुरू कसे होणार? उद्या बाळासाहेबांना भेटून सांगू की, कार्य सुरू होत नाही. त्यामुळे माझा वेळ वाया जातो आहे. कार्य न होणे, हे मला असहनीय आहे. या विचारात त्यांना झोप लागली.



रात्री झोपेत स्वप्न पडले. प. पू. डॉ. हेडगेवारजी पाठीवर प्रेमाने हात फिरवून मोरूभाऊ केतकरांना म्हणाले, “काय मोरु कसे काय चालले आहे तुझे काम? चालू दे, चालू दे.” व डॉक्टर अंतर्धान झाले व ते झोपेतून जागे झाले व विचार करु लागले. हे काय झाले? दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वनवासी मुले आश्रम शाळेत शिकायला आली. मोरूभाऊ केतकर आनंदविभोर झाले व रात्रीचे स्वप्न ‘स्वप्न’ न राहता प्रत्यक्षात आले. डॉ. हेडगेवारांचा आपल्या कार्याला आशीर्वाद आहे. त्यांचे मन असीम श्रद्धा व आत्मविश्वासाने भरून आले व हे कार्य ईश्वरीय प्रेरणा व आशीर्वादाने आवश्य पूर्ण होईल, हा विश्वास झाला. बाळासाहेबांना भेटायला गेले व रात्रीचे स्वप्न सांगितले. बाळासाहेबांचे मनसुद्धा श्रद्धा, भक्ती व आत्मविश्वासाने भरून आले. जेव्हा स़ंकटं येतात तेव्हा हा प्रसंग सतत प्रेरणा देत राहिला. ‘डटे रहो और अपना कार्य करो।’

कल्याण आश्रमाचे कार्य ईश्वरीय कार्य आहे. जशपूर नरेश श्रीमंत विजयभूषण जुदेव यांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांनी जुना राजवाडा कामासाठी दिला. २६ डिसेंबर, १९५२ ला आठ-नऊ मुले आली व कल्याण आश्रमाचे कार्य सुरू झाले.\मोरुभाऊंचा नागपूरच्या संतश्रींच्याप्रति श्रद्धा, भक्तिभाव होता. नागपूरला गेले की ते भेटत. सुरुवातीच्या दिवसांची ही गोष्ट आहे. ते नागपूरला गेले व संतश्रींना सांगितले की, जशपूरला राष्ट्रविरोधी शक्तींचे प्राबल्य आहे. त्याच्यासमोर कल्याण आश्रमाचे कार्य बघून मनात बैचेनी होते. मन निराश होते. अशा स्थितीत आमच्या कार्याने काय होणार? काही होऊ शकणार नाही.तेव्हा पूज्य संतश्री मोरुभाऊंना म्हणाले, “हे तुम्ही काय सांगता? तुम्ही जाणत नाही, स्वतः बजरंगबली या कार्याला शक्ती प्रदान करत आहेत. तुम्हाला ते दिसत नाही, पण मला स्पष्ट दिसत आहे.”


१०-१५ वर्षांनंतर जशपूर क्षेत्रात १९७३-७४ ला हनुमंताची मंदिर बनणे प्रारंभ झाले. अशाप्रकारे श्रद्धा जागरण कार्य प्रारंभ झाले. गावोगावी राम भजनी मंडळं सुरू झाली.जशपूर क्षेत्रात मोठे यज्ञ संपन्न झाले. महान संत-महंतांचे प्रवास झाले. हजारो वनवासी यात सामील होत. सहभोजनाचा कार्यक्रम होत असे.

वनवासी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्टी


तत्कालीन मध्यप्रांत व बरारचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांनी ख्रिश्चन मिशनरींचे अराष्ट्रीय कारस्थान व जनजाती क्षेत्रावर त्यांचा प्रभाव व वर्चस्वाने उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश भवानीशंकर नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग १४ एप्रिल, १९५४ रोजी स्थापन केला. त्याचे नाव होते ख्रिश्चन मिशनरी अ‍ॅक्टिव्हिटीज् इन्क्वायरी कमिशन. १९५६ ला आयोगाने काम पूर्ण केले. अनेक धक्कादायक देशविरोधी गोष्टींचा पर्दाफाश झाला होता.

हा आयोग रद्द करण्यासाठी नागपूरचे बिशप जी. एस. फ्रान्सिसनी नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यात आमचे मौलिक अधिकारांचे हनन होते आहे. ती उच्च न्यायालयाने फेटाळली.पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिल्लीला इसाई प्रतिनिधी मंडळाने भेटून विनंती केली की, “मध्य प्रदेश शासनाने इसाई मिशनरी गतिविधी हा आयोग रद्द करा.” नेहरु म्हणाले, “मला व्यक्तिगत हे आवडले नाही, पण प्रांतीय सरकारच्या निर्णयात मी हस्तक्षेप करणार नाही.”आयोगाचे काम सुरू झाले. बाळासाहेब देशपांडे, कृष्णराव सप्रे आदी कार्यकर्त्यांनी नियोगी कमिशनला मदत केली. खरे पुरावेही दिले. त्यामुळे नियोगी कमिशनला भरपूर मदत झाली.

नियोगी आयोगासमोर रांचीचे बिशप रेव्हरंड जुएल लकडा जे उरांव जनजातीचे होते, यांची साक्ष झाली. त्यांचा ‘मेरी जर्मन यात्रा’ शीर्षकाचा एक लेख ‘घरबंधू’ मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्याने सांगितले, “मी पासपोर्टशिवाय जर्मनीला गेलो व तेथे सरकारी पाहुणा म्हणून राहिलो.” त्याने आपल्या साक्षीत सांगितले, “भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १२ जुलै, १९४७ ला ‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ अधिवेशनात मी भाग घेण्यासाठी पोहोचलो. तेथे प्रस्ताव पारित झाला की, विश्व युद्ध संपल्यावर जेथे ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत, तेथे त्यांनी लडाकू अल्पसंख्याक जातीच्या रुपाने संघटित झाले पाहिजे.” वरील सर्व घटनांनी हे सिद्ध होते की, भारतामध्ये इसाई अलगाववादी विद्रोही कार्यक्रम हे अमेरिकन इसायतची देन आहे. सूत्ररुपाने सांगायचे झाले, तर कुठच्याही देशात सर्वप्रथम एका अल्पसंख्याक समुदायाचे सामूहिक धर्मांतरण करा. त्यानंतर त्याला लढाईखोर बनवा. त्यानंतर त्याला राष्ट्रीयता प्रदान करा व देशाचे विभाजन करा, अशा प्रकारे विश्वामध्ये आपले प्रभुत्व स्थापित करा व राज्य करा, ही इसाई साम्राज्यवादाची योजना असते.


प्रख्यात लेखक व गांधीवादी विचारवंत जे. सी. कुमारप्पा यांना ही योजना समजल्यानंतर म्हणाले की, पश्चिम राष्ट्रांच्या सेनेची चार अंगं आहेत, थलसेना, नौसेना, वायुसेना व चौथी सेना चर्च. तेव्हा चर्चला धार्मिक समजण्याची चूक करू नका.धार्मिकता चर्चचा मुखवटा आहे.नियोगी समितीने अजून एक गंभीर तथ्य समोर ठेवले. जर भारत-पाकिस्तानचे युद्ध झाले तर नागालँड व झारखंडमधील आंदोलन करणारे सशस्त्र गट दुसर्‍या मोर्चावर युद्ध करतील. त्यावेळी भारतीय सेनेची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी होईल.

मूलनिवासी संकल्पना व आपण


राष्ट्रीय अखंडता व सामाजिक समरसता या विधायक ‘मूलनिवासी’च्या संदर्भात १९९२ साली पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहरावांना वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांनी आवेदन दिले. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची काय भूमिका असली पाहिजे, हे त्यात लिहिले होते. अमेरिका, आफ्रिका व ऑस्ट्रेलियामध्ये मूळनिवासी असू शकतील. परंतु, भारतात कोणताही एक समूह मूळनिवासी नाही. येथे तर आपण सर्व भारतवासी मूळनिवासी आहोत. कारण, भारतात आक्रमणकारी अथवा बाहेरुन आलेले व मूळनिवासी असे दोन समूह नाहीत. मूळनिवासी ही संकल्पना भारतासाठी घातक आहे. कल्याण आश्रमाने आवेदन देऊन सरकारला सूचित केले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चित मूळनिवासी संकल्पना भारताचे तुकडे करण्याचे षड्यंत्र आहे. त्याचा स्वीकार करता कामा नये.संयुक्त राष्ट्रसंघात याच विचारांचे प्रतिपादन करण्यात आले व आजही सरकारची तीच भूमिका आहे.

धनसंग्रह अभियान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्वातील सर्वात विशाल अशासकीय संगठन आहे. संघाला, कल्याण आश्रमाला असलेली आर्थिक अडचणीची कल्पना आहे. या राष्ट्रीय कार्याला आर्थिक सहयोग देण्याचे ठरवले.रामनवमीच्या दिवशी स्वयंसेवकांच्याद्वारा हा धनसंग्रह केला जातो. कल्याण आश्रमाच्या कार्यविस्तारासाठी याचा उपयोग होतो. रा. स्व.संघाचे सरसंघचालक पू. रज्जूभैय्याजी धनसंग्रह संपर्क अभियानासाठी निघाले होते. हे अनोखे उदाहरण होते. रामनवमी अभियान आजही चालू आहे.
महानुभवांची आश्रमास भेट

महामहिम राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग मानवेल आश्रम, दादरा नगर हवेली

माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई, जशपूर

माजी पंतप्रधान विश्वनाथप्रताप सिंह, जशपूर

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, बभनी उत्तर प्रदेश.

 
महानिर्वाण

 
कर्मयोगी श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांनी २६ डिसेंबर, १९१३ ला प्रारंभ केलेली जीवन यात्रा २१ एप्रिल, १९९५ ला कर्मभूमी जशपूर नगर येथे समाप्त केली.
 
कल्याण आश्रमाचे ध्येय व उद्देश


राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात वनवासी, आदिवासी, जनजाती या नावाने परिचित समाजाचा सर्वांगीण विकास करणे, हा कल्याण आश्रमाचा उद्देश आहे.आज वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य भारतात सर्वदूर पोहोचले आहे. कार्यविस्तारसुद्धा झाला आहे. अजून कार्यविस्तार करणे, ही काळाची गरज आहे.विपरित परिस्थिती, चारही बाजूला विद्रोही, प्रतिकूल वातावरणात श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांनी कार्य केले. आपल्याला त्यांचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी जीवनात शक्य असतील, ती वषेर्र् कल्याण आश्रम कार्यासाठी आपण देऊ शकता. आपले समयदान, द्रव्यदान खूप उपयोगी आहे.
दि. १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हा ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून भारत सरकारने घोषित केला आहे.


जनजाती महापुरुषांचे स्वातंत्र्यासाठी, धर्मासाठीमोठे बलिदान झाले आहे. त्यांचा परिचय होणे आवश्यक आहे.
भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर महामहिम द्रौपदी मुर्मू यांची नेमणूक झाली, हा जनजाती समाजाच्या महिलांचा गौरव आहे. भारत सरकारचे अभिनंदनीय कार्य आहे.


वनवासी कल्याण आश्रमाचे विविध आयामांद्वारे कार्य चालू आहे.


सप्टेंबर २०२२ ची कार्यस्थिती

औपचारिक शिक्षा विद्यालय २००, लाभार्थी २४,५६२.

अनौपचारिक शिक्षा केंद्र ३,४६५, लाभार्थी ६४,६२२ छात्रावास, बालक १७९, बालिका ५४.

आर्थिक विकास केंद्र ७८, लाभार्थी १,१९२.

कौशल्यविकास केंद्र १३०, लाभार्थी २,६६८.

स्वयंसाहाय्यता समूह ३,३९८, लाभार्थी ३५,५९५

ग्रामविकास प्रकल्प ७८, लाभार्थी १,१९२, अन्य १५, लाभार्थी १,७१३.

चिकित्सा - दैनिके ३८, साप्ताहिक ३१, आरोग्यरक्षक ४,१८८, रुग्णालये १०.

चिकित्सा शिबीर ३४१, लाभार्थी ४,७७,३२८.

खेलकूद केंद्र २,१०४, श्रद्धा जागरण सत्संग केंद्र ५,४२९.

एकूण प्रकल्प १९,३७९.

एकूण प्रकल्प स्थान १५,४९४.

‘तू मैं एक रक्त’ हे घोषवाक्य घेऊन ग्राम, नगरात हे कार्य चालू आहे.

जनता जनार्दनाच्या तन-मन-धन सहयोगाने वनवासी कल्याण आश्रम गेली ७० वर्षे वनवासी बंधूंच्या सर्वांगीण विकासाचे कार्य करीत आहे.वनवासी हिंदू समाजाचे अंग आहे. शरीराचा लहान भाग दुखत असेल, तर सर्व शरीर ते दु:ख भोगते व त्याला ठीक करण्यासाठी सक्रिय होते.वनवासी, जनजाती समाजाला सबल बनविण्यासाठी संपूर्ण समाजाची शक्ती व संपूर्ण सहयोग आवश्यक आहे.




- श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे
अधिक माहितीसाठी
www.kalyanashram.org
Email:-kalyanashram२०१०@gmail.com




-सुहास पाठक
(लेखक वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र शिक्षण आयाम प्रमुख आहेत.)
suhaspathak९@gmail.com