सामाजिक कार्याचा वसा घेतलेले अजय

25 Dec 2022 21:15:37
Ajay Kulkarni


लहानपणापासून सामाजिक कार्याचे आणि प्रामाणिकपणाच्या संस्कारांचा वारसा घेऊन सामाजिक कार्य करणार्‍या ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे अध्यक्ष अजय कुलकर्णी यांच्याविषयी...


अजय कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले. त्यानंतर मुंबई येथून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पण त्यांच्या वडिलांची इच्छा अजय यांनी लष्करामध्ये जावे अशी होती. त्यामुळे अजय यांनीदेखील वडिलांच्या इच्छेनुसार ‘मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिस’मध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी पत्करली. ही नोकरी करताना त्यांना विविध मिलिटरी प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यात बहुमजली इमारती, विमानांचे रन-वे, मिसाईलसाठी टेक्निकल बिल्डिंग, मिलिटरी ऑफीस बिल्डींग, रस्ते, विमानांसाठी हँगर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल इत्यादी गोष्टींचा समावेश होता. याशिवाय काही वर्षे इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्ट्स, डीआरडीओ लॅबोरेटरी आणि काही वर्षे वैमानिकरहित विमान प्रकल्पांवर काम करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली.

 अजय यांनी २०१० साली लष्करी सेवेमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी खासगी क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी ईएसआयसी या केंद्र सरकारी उपक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध हॉस्पिटल प्रकल्पांसाठी ‘कन्सल्टन्सी’ देण्याचे काम केले. यात कुलाबा, कांदिवली, मरोळ, वाशी, औरंगाबाद, वाळुंज, नागपूर, पणजी, मडगाव, कोरलिम-गोवा, ठाणे, कोल्हापूर, चिंचवड, बिबवेवाडी, पुणे इत्यादी ठिकाणांचा समावेश होता. त्यासाठी त्यांना खूप प्रवास करावा लागला. तसेच अनेकदा दिल्लीवारीदेखील कराव्या लागल्या. परंतु, हे सर्व प्रकल्प २०१४ साली पूर्णत्वास गेल्यावर त्यांनी पुन्हा एकदा क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठाणे येथील ‘एपिकॉस’ ही नामांकित फर्म ‘जॉईन’ करायचे ठरविले. या फर्ममध्ये ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ म्हणजे इमारतींची आरोग्य तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र डिपार्टमेंट होते. याठिकाणी ‘जॉईन’ केल्यावर त्यांना विविध इंडस्ट्रीमध्ये ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची संधी मिळाली.

त्यात एसीसी वाडी, एसीसी बारघर ओरिसा, एसीसी टिकारिया, लखनौ, अंबुजा सूली व राऊरी हिमाचल प्रदेश येथील सिमेंट प्लांट, तारापूर येथील अणुऊर्जा प्लांट, दिल्ली मेट्रो, गुजरात स्टेट फर्टिलायझर वडोदरा, नाबार्ड भोपाळ, रेल व्हील फॅक्टरी बंगळुरू, वोल्टास ठाणे, गोदरेज विक्रोळी, महेंद्र सानयो खोपोली इत्यादी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता. तसेच भारत पेट्रोलियम रिफायनरी, माहुल येथील आगीच्या तडाख्यात सापडलेल्या प्लांटचे पुनरूज्जीवन करण्याची संधी त्यांनी मिळाली. २०१९ साली तेथूनही त्यांनी ऐच्छिक निवृत्ती घेतली.अजय यांच्यावर लहानपणापासूनच समाज कार्याचे व प्रामाणिकपणाचे संस्कार झाले. त्यांचा नोकरी करताना आणि आतासुद्धा उपयोग होत असल्याचे अजय सांगतात. आयुष्यातील ३५ वर्षे स्वत:साठी आयुष्य जगल्यानंतर आप ही समाजाचे देणं लागतो, या भावनेतून त्यांनी सामाजिक कार्यात उतरण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये त्यांनी त्यांचे मित्र मिलिंद मोहिते यांच्या आग्रहावरून ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ या क्लबमध्ये सदस्यत्व स्वीकारले.

 २०१८ मध्ये त्यांनी रोटरी क्लबच्या खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली. २०२० मध्ये क्लबच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये त्यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी अनेक प्रकल्प रोटरीच्या माध्यमातून राबविले. त्यात रक्तदान शिबीर, महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबीर, किन्नर लोकांसाठी श्रावणातले हळदीकुंकू, पोलिसांसाठी रक्षाबंधन सोहळा, वनवासी बांधवांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय प्रदर्शन, वनवासी लोकांसाठी कपडे वाटप व मच्छरदाणी वाटप, गरीब लोकांना दिवाळी फराळ वाटप, मुरबाडजवळील दहीवसी गावात दंत आरोग्य तपासणी शिबीर व पशुचिकित्सा शिबीर इत्यादी कामांचा समावेश आहे. डिसेंबर २०२१मध्ये क्लब संचालित ‘रोटरी ममता चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये त्यांनी ट्रस्टी म्हणून कार्यभार स्वीकारला. क्लबतर्फे चालविण्यात येणार्‍या ‘रोटरी हेल्थ सेंटर’चे कामकाज फेब्रुवारी २०२०पासून ते पाहत आहेत. या सेंटरमध्ये दातांचा दवाखाना, रक्ततपासणी, डोळ्यांचा दवाखाना व फिजिओथेरपी या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच घरगुती ऑक्सिजनपुरवठा मशीन्ससुद्धा पुरविल्या जातात.

येत्या काळात ‘रोटरी’च्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात ‘टाटा मेमोरियल रुग्णालया’साठी कर्करोग चाचणी बस, जिल्हा परिषद शाळेसाठी शौचालय, शहापूर येथे शाळेची इमारत बांधणे आणि ‘रोटरी हेल्थ सेंटर’चे रुग्णालयामध्ये रुपांतर करणे इत्यादींचा समावेश आहे. तसेच नवोदित गायकांसाठी ‘स्वरभूषण स्पर्धा’, महिलांसाठी पाककला स्पर्धा आणि सुदृढ बालक स्पर्धा घेण्याचा मानस आहे. अजय यांच्या पत्नी वर्षा या गृहिणी असून त्यादेखील ‘रोटरी क्लब’च्या सदस्या आहेत. त्यांचा मुलगा आशिष एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. या दोघांचीही अजय यांना त्यांच्या कामात साथ मिळते. अजय आणि त्यांच्या पत्नी वर्षा दोघेही ‘रोटरी क्लब’च्या कामाला पूर्ण वेळ देत आहे. २००३ साली अजय हे दमण येथे कार्यरत असताना तेथे तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘कोस्टगार्ड मुंबई’तर्फे त्यांना उत्तम कार्यासाठी मानाचे मेडल व मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!







Powered By Sangraha 9.0