शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश!

24 Dec 2022 15:18:23
शाही ईदगाह


मथुरा
: मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वादावर जिल्हा न्यायालयाने शनिवारी दि.२४ डिसेंबर रोजी मोठा आदेश दिलाय. या आदेशात ही वाराणसीच्या ज्ञानवापी परिसराप्रमाणे सर्वेक्षण होणार आहे. हिंदू सेनेच्या याचिकेवर वरिष्ठ न्यायालयाने हा आदेश दिलाय. वर्षभरापूर्वी मथुरेच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र जिल्हा न्यायालयांच्या आदेशानुसार शाही ईदगाह येथे २ जानेवारीपासून सर्वेक्षण केले जाणार आहे. २० जानेवारीला हा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.


हिंदू सेनेने असा दावा केला आहे की, शाही ईदगाहमधील स्वस्तिक चिन्ह हे मशिदीच्या खाली असलेल्या देवतेचे गर्भगृह आहे, ते मंदिर असल्याचे प्रतीक आहे. हिंदू सेनेचे मनीष यादव आणि वकील महेंद्र प्रताप यांनी सांगितले की, शाही ईदगाहमध्ये हिंदू वास्तुकलेचे पुरावे आहेत. वैज्ञानिक सर्वेक्षणानंतर हे सर्व समोर येईल. हिंदू सेनेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानातील १३.३७ एकर जागेवर मंदिर पाडून ईदगाह मशीद बांधली होती. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते मंदिर उभारणीपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्यांनी न्यायालयासमोर मांडला. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ विरुद्ध शाही ईदगाह यांच्यातील १९६८ च्या कराराला बेकायदेशीर ठरवून रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

शाही ईदगाह मशिदीचे नेमके प्रकरण काय?



शाही ईदगाह मशीद मथुरा शहरातील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर परिसराला लागून आहे. हिंदू धर्मात हे स्थान भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान मानले जाते. औरंगजेबाने १६६९-७० मध्ये श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट करून शाही ईदगाह मशीद बांधली असे मानले जाते.
१९३५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने १३.३७ एकर वादग्रस्त जमीन बनारसचे राजा कृष्णदास यांना दिली होती. ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टने १९५१ मध्ये संपादित केली होती. या ट्रस्टची १९५८ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि १९७७ मध्ये श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान या नावाने नोंदणी करण्यात आली.

१९६८ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही इदगाह कमिटी यांच्यात झालेल्या करारात ट्रस्टला या १३.३७ एकर जागेची मालकी मिळाली आणि ईदगाह मशिदीचे व्यवस्थापन इदगाह कमिटीकडे देण्यात आले.आता याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करण्यात आली आहे.





Powered By Sangraha 9.0