धर्मांध मूलतत्त्ववादी प्रचारांबद्दल उघडपणे बोलणारी कादंबरी म्हणजे 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या'

23 Dec 2022 14:56:55
pravin bandekar
 
 
 
बाहुल्या म्हणजे माणसांचे खेळणे. माणसांची प्रतीकं आणि त्यांचीच दैवतं. या बाहुल्यांना चेहरा नसतो, आणि म्हणून त्यातून निखळ कथा आपण सांगू शकतो. प्रवीण बांदेकरांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या पुस्तकाला २०२२ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्या पुस्तकात असे काय आहे आणि मुळात ते लिहिणारे बांदेकर कोण असं प्रश्न पडणं स्वाभाविक.
 
 
प्रवीण बांदेकर कोण आहेत?
 
 
कोकणी मातीत जन्माला येणारे सर्वच लेखक, कवी जन्मजात प्रतिभा घेऊन येतात. या भागातील पोषक वातावरणाचा त्यांच्या घडवणुकीमध्ये मोठा हात असतो. मूळचे सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीचे लेखक प्रवीण बांदेकर याना आयुष्याच्या सुरुवातीपासूनच लेखनाची आवड होती. हाच धागा कायम ठेवल्याने ते कमी काळातच नावारूपाला आले. त्यांनी सर्व शिक्षण इंग्रजीत घेतले. महाविद्यालयापासूनच त्यांनी लिहिण्यास, व्यक्त होण्यास सुरुवात केली. त्यांच्या कविता, कादंबरी, ललित लेखन, बाल साहित्य व अनेक समीक्षा प्रकाशित झाल्या.
 
 
 
बांदेकरांनी लिहिलेली 'चाळेगत' ही कादंबरी तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठातून अभ्यासक्रमासाठी घेतली गेली. गेल्या २० ते २५ वर्षांपासून बांदेकर विपुल लेखन करत आहेत. आपल्या लेखनातून त्यांनी निव्वळ मनोरंजन न करता कोकणातील विविध सामाजिक प्रश्न, मानवी नात्यातील गुंते, धार्मिक व राजकीय परिस्थिती यांच्यावर भाष्य केले आहे. त्यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या कादंबरीतही अनेक संदर्भ याबाबतीत वाचायला मिळतात.
 
 

काय म्हणतात उजव्या सोंडेच्या बाहुल्या ?
 
 
बाहुल्या म्हणजे प्रतीकं, निरंतर राहणारी.. जसे आपले देव, राक्षस, निरंतर आपल्या मनात घर करून राहत आहेत, तशाच या भावल्या. लहानपणीची बाहुली सापडली की तो काळ आपल्यासमोर उभा राहतो ना तसेच. या बाहुल्यांचे काळ नसतो. ज्या काळात आपण त्यांच्याशी खेळलो, भांडलो, त्यांच्यापाशी रडलो, तो काळ त्यांचा. या कादंबरीतील सर्व पात्रांना समकाळाशी जोडण्यासाठी बांदेकरांनी बाहुल्यांच्या माध्यमातून कथा सांगितल्या आहेत. त्या समाजमनाचा, कोकणातील परिस्थितीचा आणि सामाजिक राजकीय घटनांचा उलगडा करतात. बाहुल्यांतील बाहुल्या हुबेहूब पण स्वतंत्र. जस मन आणि आपली बुद्धी.. वर्तमानातील परिस्थितीशी संबंध या बाहुल्यांतून सहज लागतो, वर्तमानातील आशय धागे या बाहुल्या एकेक पदर उलगडाव ताशा उलगडत जातात. आपल्या भोवताली काय चालू आहे हे सांगण्यासाठी या बाहुल्यांची मदत घेऊन वर्तमानाला भेदून जे दिसते ते दसतेपण या बाहुल्यांतून पाहायला मिळते.
 
 
कोकणातील कथेकरी ठाकर समाजाच्या कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समकाळातील समूह-संस्कृती वास्तवाची फॅण्टसी ह्या कादंबरीत उभी केली आहे. परश्या ठाकर कथागत निवेदक पात्राकडे वर्तमानासह भूत-भविष्य साकारणाऱ्या बाहुल्या आहेत. ही मोठीच उपलब्धी निर्मिली आणि आपला भोवताल नोंदविण्याच्या अनेकविध शक्यता निर्माण केल्या आहेत. कधी परश्या ठाकर, तर कधी मल्हार पाटील, गोविंद परब किंवा गीता ठाकर असे कथेकरी बदलत बाहुल्यांच्या खेळांमधून, गोष्टींमधून हा भोवताल तपासला आहे. समकाळातील धार्मिक संस्थांबद्दल तसेच त्यांच्या कारवायांबद्दल, पद्धतशीर चालवलेल्या धर्मांध मूलतत्त्ववादी प्रचारांबद्दल ही कादंबरी उघडपणे बोलते.
 
 
'चाळेगत' ही त्यांची पहिली कादंबरी. तिची निवड अभ्यासक्रमासाठी झाल्यानंतर त्यांच्या लिखाणाकडून अर्थातच मराठी वाचकांच्या अपेक्षा वाढल्या.. त्यानंतर २०१७ साली लिहिलेली 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' ही त्यांची दुसरी कादंबरी. या कादंबरीला २०२२ साचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होणे क्रमप्राप्तच होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0