वाहायू : पाचवी पत्नी

23 Dec 2022 20:35:11
वाहायू


तिहेरी तलाक’, ‘हलाला’ आणि ‘खतना’या प्रथा-परंपरांबद्दल जगभरात बरीच जागृती झाली. या परंपरांच्या फायद्या- तोट्याबद्दलही जागतिक स्तरावर चर्चाही होतात. पण, ‘वाहायू’ या प्रथेबद्दल, परंपरेबद्दल फारसे एकलेले नव्हते. हादीजैदू मनी या महिलेमुळे जगासामोर ‘वाहायू’ परंपरेचे सत्य उघडे झाले. नायजेरियामध्ये ‘वाहायू’ प्रथेनुसार सधन आणि चांगल्या हुद्द्यावर असलेला मुस्लीम पुरुष पाचवा विवाह करू शकतो. मुस्लीम धर्मामध्ये चार पत्नी करायला परवानगी आहे, असे म्हटले जाते. पण, त्यानंतरही एखाद्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर? त्यासाठी ‘वाहायू’ ही पद्धत.


यामध्ये पुरुषांची चार लग्ने झालेली असतात. मूल, बाळ अगदी नातवंडही असतात. पण, वयोमानाप्रमाणे चारही पत्नी थकलेल्या असतात. त्यांना विश्रांती देऊन त्यांच्याऐवजी घरची कामं, मुलाबाळांना सांभाळणे, वयोवृद्ध असला म्हणून काय झाले, पण अशा वयोवृद्ध पुरुषाची सर्वच प्रकारची सेवा करणे यासाठी एक व्यक्ती हवीच असते. या व्यक्तीला बिनपगारी घरात आणण्यासाठी मग दक्षिण नायजेरियामध्ये सधन घरचे पुरुष ‘वाहायू’ करतात. यामध्ये वय वर्षे ११ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलींशी विवाह केला जातो. अर्थात, चार विवाह केलेल्या घरात पोराबाळांचा लेंढार असलेल्या वयोवृद्ध पुरुषासोबत कुणाचा विवाह होणार? तर गरिबाघरच्या मुलीचाच! मुलगी नव्हे बालिकाच! ती जितकी वयाने कमी तितकी तिला मागणी जास्त!

 कारण, लहान मुली कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार करत नाहीत आणि अत्याचार सहन करण्याचे वळण लागले की, मोठ्या झाल्या तरी त्या ‘ब्र’शब्द उच्चारत नाहीत म्हणून! तर ‘वाहायू’ करून बालिकांना घरी आणले जाते. त्या क्षणापासून तिचे लैंगिक शोषण सुरू होते. शारीरिक-मानसिक अत्याचाराची सीमाच नसते. कारण, घरातले सगळेच काम त्या बालिकेला करायचे असते. तिला काहीही बोलण्याचा अधिकार नसतो. पहाटेपासून तिचा दिवस सुरू होतो. पाणी भरणे, घर स्वच्छ करणे, धुणीभांडी, पतीच्या आधीच्या चार बायकांची सेवा करणे, त्यांच्या मुलांची देखभाल करणे, त्याचबरोबर पत्नी आहे म्हणून पतीचा अत्याचार सहन करणे आहेच. तिला पत्नी म्हणून कसलाही अधिकार आणि हक्क नसतो. मात्र, तिच्यापासून जन्मलेल्या अपत्यांना त्या घरात स्थान असते.

थोडक्यात,ती फक्त गुलाम. तिने जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा असाही दंडक असतो... तर अशी ही ‘वाहायू’ पद्धत. भयानक आणि क्रूर. नायजेरियामध्ये १९६० साली गुलामगिरीविरोधात कायदा झाला. २००३ साली ‘वाहायू’ पद्धतीलाही गुन्हेगारी म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, अभ्यासकांचे म्हणणे आहे की, आजही एकट्या नायजेरिया आणि आसपासच्या परिसरामध्ये ‘वाहायू’ पद्धतीने गुलाम बनवलेल्या एक कोटी, तीन लाख मुली बालिका आहेत. ‘वाहायू’ प्रथेचे भयंकर वास्तव समोर आले ते नायजेरियीच्याच हादीजैदू मनीमुळे.

हादीजैदू मनी नायजेरियातील गरीब मुस्लीम कुटुंबात जन्माला आली. ती जेव्हा ११ वर्षांची होती, तेव्हा ६२ वर्षांच्या व्यक्तीने तिला अक्षरशः कोंबडीच्या किमतीत विकत घेतले. त्या दिवसापासूनच तिचे लैंगिक, शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू झाले. कित्येक वेळा हादीजैदूने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, इथली पोलीस यंत्रणा आणि सामाजिकता ‘वाहायू’ प्रथेची विरोधक नसल्याने प्रत्येक वेळी हादीजैदू पकडली गेली. तिला परत तिच्या पतीकडे पोहोचवले जायचे. परतल्यावर हादीजैदूवर दुपटीने अत्याचार व्हायचे. दहा वर्षे सरली. २००३ साली नायजेरिया सरकारने ‘वाहायू’ पद्धतीवर बंदी आणली. हादीजैदूची सुटका झाली. तिने एका पुरुषाशी विवाह केला. मात्र, तिच्या पहिल्या पतीने तिच्याविरोधात तक्रार केली.

 हादीजैदू आपली बेगम आहे, ती दुसरा विवाह करू शकत नाही असे त्याचे म्हणणे. त्याच्या तक्रारीनुसार हादीजैदूवर गुन्हा नोंदवण्यात आला. तिला तुरुंगात टाकण्यात आले. याचदरम्यान ‘टिमिद्रय’ नावाच्या सेवाभावी संस्थेशी तिचा परिचय झाला. या संस्थेने हादीजैदूच्या न्यायासाठी आवाज उठवला. हादीजैदू संस्थेच्या मदतीने कायदेशीर लढाई लढली. नायजेरीयन न्यायालयाने हादीजैदूला मुक्त तर केलेच, शिवाय नायजेरियन प्रशासनाने तिला २० हजार डॉलर्स नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णयही दिला. दुसरीकडे नायजेरियामध्ये ‘वाहायू’ू प्रथेविरोधात देशभरात जागृती झाली. जगभरात आजही अनेक प्रथा पंरपरा अस्तित्व असतील ज्यांच्या नावावर महिला, बालिका आणि दुर्बलांचे शोषण होत असेल. या सर्व शोषणकारी प्रथांचा निषेध!




Powered By Sangraha 9.0