पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन

    18-Dec-2022
Total Views |
पर्यावरण

निसर्ग ही आपल्याला लाभलेली सर्वात अमूल्य अशी देणगी ... मग ते कोकण असो किंवा अन्य निसर्गस्थळे. ‘वेस्टर्न कल्चर पर्यटन’ टाळून निसर्गाचा आस्वाद घेऊन पर्यटन हा खरा आनंद... तेव्हा असे हे पर्यावरणपूरक पर्यटन नेमके कसे असू शकते, हे या लेखातून जाणून घेऊया...


आपल्या देशाच्या प्रतिज्ञेत आपण अभिमानाने म्हणतो की, ‘भारताच्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.’ त्या परंपरेचे, संस्कृतीचे मूळ भारतातल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक परिसंस्थांमध्ये अर्थातच इथल्या जैवविविधतेत आहे. जिथे आजही नद्या गोठलेल्या अवस्थेत आहेत, त्या हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगेपासून ते त्याही आधी लाखो वर्षे निर्माण झालेल्या, भारतासाठी पाऊस अडवणार्‍या, समुद्राशी नाते सांगणार्‍या सह्याद्रीपर्यंत हिमवनापासून ते पर्जन्य वनापर्यंत हर एक प्रकारची नैसर्गिक संपत्ती या देशाला लाभली आहे.

निसर्गाच्या या प्रत्येक रूपासोबत एकरूप होऊन पंचमहाभूतांना देव मानून भारतीयांनी कुठे नदीच्या खोर्‍यात तर कुठे डोंगराच्या माथ्यावर, समुद्राच्या किनारी, घनदाट जंगलात, अति पावसातसुद्धा आणि अति उन्हातसुद्धा एवढेच काय वाळवंटातसुद्धा तिथल्या नैसर्गिक अधिवासाशी समरूप जीवनशैली विकसित केली.जितका समृद्ध निसर्ग तितकीच समृद्ध जीवनशैली. हीच नैसर्गिक समृद्धता आमच्या खाद्यसंस्कृतीत शेती परंपरांमध्ये कलेमध्ये प्रतिबिंबित होते. जिथे आजही माणूस निसर्गाशी घट्ट नाते जोडून जगत आहे त्या कोकण नावाच्या स्वर्गीय भूमीत सहा ऋतूंचे सहा सोहळे अनुभवताना.

 निसर्गाच्या उत्सवांना मानवी आनंदाचा स्रोत बनवताना. निसर्ग हाच भारतीय संस्कृतीच्या संपन्न असण्याचा पाया आहे हे मला जाणवले. त्यामुळेच जग ‘क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग’ जलवायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असताना आपल्या देशाला यातून वाचवायचे असेल, तर आपली संस्कृती आणि शाश्वत जीवनशैली जपणे हाच एकमेव मार्ग माझ्यासारख्या गावातल्या तरुणांसमोर असल्याचे मला जाणवले.स्वर्गीय कोकणात अवास्तव अशाश्वत विकासाच्या संकल्पनांना वाट दिली जात असताना तळकोकणातील ‘इकोसेन्सिटिव्ह’ गावांमध्ये स्थानिकांना घेऊन आमच्या शाश्वत विकासाचे ‘व्हिजनरी मॉडेल’ आम्हीच का नाही तयार करू शकत? आम्हाला आमचा विकास नेमका कसा हवा आहे हे आम्हीच का नाही ठरवू शकत? समाधानात आनंद मानून जगायला शिकवणार्‍या सुशेगाद आनंदाचे कोकणी रहस्य जगासमोर आणण्याची संधी मला पर्यटनातून मिळाली.


पर्यटन


बाजूच्या गोव्याची ‘कमर्शियल टुरिझम’मुळे झालेली वाताहत नैसर्गिक आणि सांस्कृतिक नुकसान आम्ही जवळून बघितले होते. पर्यटन म्हणजे केवळ मजा मारणे, पार्ट्या करणे, दारू पिणे, धिंगाणा करणे पाश्चात्य संस्कृतीतले पैशावर आधारित खेळ आपल्या देशात रुजवणे आणि आपली मूळ जीवनशैली संपवून नव्या असंबद्ध अशाश्वत गोष्टींवर उभी राहिलेली व्यवस्था तिथे दिवस टिकणार आहे? गावात जगण्याची कला कौशल्य परंपरा शेती बागायती मासेमारी एकदा सोडल्यावर पुन्हा प्रस्थापित करणे, जवळपास अशक्यच. आमच्या शाश्वत जगण्याच्या आनंदाला इतरांमध्ये वाटणे आणि इथल्या लोकांना शाश्वत रोजगाराची संधी त्यांच्याच जगण्यातून मिळवून देणे अशा संकल्पनेतून आम्ही शाश्वत जीवनशैली वरती आधारित पर्यटन तळ कोकणात सुरू केले.

कोकणातली नदी जशी सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत वाहते तसा कोकण पर्यटनाचा आमचा नकाशा आहे..सह्याद्रीच्या माथ्यापासून ते समुद्र संगमापर्यंत नदी, डोंगर, सदाहरित जंगल, खाडी, कातळ सडे, पाणथळ जमिनी तलाव, खाजण, समुद्र किनारे अशी निसर्गाची वेग वेगळी रूपे बघत प्रत्येक ऋतूनुसार, होणारे बदल आणि गावातले जीवन समजून घेत हा प्रवास आपण अनुभवतो..हे डोंगर, ही झाडे आणि वन्यजीवन समृद्ध करण्यासाठी समुद्र सह्याद्रीकडे मान्सूनचे वारे पाठवतो स्वतःच्या पाण्याची वाफ त्यात मिसळतो, हिरवेगार डोंगर त्यातून पाऊस देतात ..जणू दुधाचे घट फुटावेत तसे कोसळणारे सह्याद्रीतले धबधबे एका खोर्‍यातल्या अशा असंख्य धबधब्यांनी जन्माला येणारी नदी हा काही महिन्यांचा सृष्टीला नवजीवन देणारा सोहळा आमच्या जगण्याचाही सोहळा असतो


पर्यटन


..स्वतः खारट राहून हजारो जीवांची तहान भागवणारा दर्या जितका कृतज्ञ आहे तितकेच कृतज्ञ आहेत इथले पर्वत जे त्याला त्याचे पाणी परत देतात..नद्या ही कृतज्ञता जपणारे माध्यम आहे. डोंगरांना समुद्राशी जोडणारे, हजारो पशुपक्ष्यांचे जीवन घेऊन वाहणारे .. हे निसर्गचक्र जवळून अनुभवायचे असेल, तर सह्याद्रीच्या कुशीतून समुद्राच्या मिठीत नदीच्या प्रवाहासोबतचा प्रवास अनुभवायला हवा...निसर्गचक्र समजून घेण्यासाठी एक संपूर्ण वर्ष कोकणात निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गजीवन जगायला हवे......निसर्गाचा उत्सव जवळून पाहणं, त्यात सामील होणं यासारखं सुख कोणतंच नाही ..कोकण भटकंतीचा प्रवास सुरू होतो पश्चिम घाटापासून जैवविविधतेने नटलेला, हिरवाईने सजलेला अभेद्य सह्याद्री...

असंख्य प्रकारची वनराई, रानफळे, फुले, दुर्मीळ पक्षी आणि प्राणी आणि यांच्या सान्निध्यात राहणारी साधी भोळी कोकणी माणसं.. कोकणातल्या लोकांच्या प्रत्येक सणात उत्सवात निसर्गाला प्रचंड महत्त्वाचं स्थान असतं ते या मुळेच..सह्याद्रीलगतच्या कोकण भागाला ‘वलाटी’ म्हणतात आणि समुद्रालगतच्या भागाला ‘खलाटी’ वलाटीत नदीला तीव्र उतार असतो.. खळखळ वाहणारी नदी जेव्हा समुद्राच्या जवळ येते तेव्हा संथ होते...वलाटी हा घनदाट जंगलांचा प्रदेश, भात शेतीच्या शेळी सोडल्या तर सर्वच दाट जंगलांचे डोंगर...माधव गाडगीळ अहवालाप्रमाणे, हा सगळा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहे..कित्येक दुर्मीळ जीवांचा हा अधिवास आहे. आजूबाजूला असलेली झाडे न तोडता बांधलेले मातीचे टुमदार कौलारू घर, मातीचीच कौले, शेणाने सारवलेले खळे ..

पावसाळ्यात भात शेती, हिवाळ्यात वायंगणी शेती किंवा पोरसु आणि उन्हाळ्यात जंगली काजू, कोकम, आंबे, नारळ, सुपारी अशा निसर्गातून मिळणार्‍या उत्पन्नावर जगणारी समाधानी पिढी कोकणात जगते आहे तोपर्यंत कोकण स्वर्गच राहील ...माणूस निसर्गाधारीत जीवनशैलीत एक समाधानी आणि शाश्वत जीवनपद्धती जगू शकतो, पण या जगण्यातला स्वर्गीय आनंद त्याला कळायला हवा नाहीतर त्याच जीवनाला गरिबी समजून पैशावर आधारित अशाश्वत जीवनशैली स्वीकार हेच जीवन वाटले, तर स्वतःबरोबर निसर्गाचं विनाश आपण करणार आहोत..

(क्रमश:)

-प्रसाद गावडे