जांभ्या संस्कृतीतील गूढ कातळचित्रे

    17-Dec-2022
Total Views |
कातळचित्रे


‘कोकण इतिहास परिषदे’च्या डॉ. दाऊद दळवी, रवींद्र लाड व इतर संशोधकांसोबत २०१० साली रत्नागिरी व राजापूर भागात कातळ शिल्पांच्या शोधात मी हिंडलो होतो. त्यावेळी निवळी फाटा, बारसु, गावडेवाडी, राजापूर, चिंद्रवली आदी अनेक ठिकाणांच्या कातळचित्रांची पाहणी आम्ही केली होती. त्यानंतर देवगड तालुक्यातील कातळचित्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न मी माझ्या मित्रांच्या मदतीने सुरू केले. २०१२ साली दाभोळच्या सड्यावर मला कातळचित्र सापडले आणि त्यानंतर स्थापन झालेल्या देवगडच्या इतिहास संशोधक मंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत अनेक कातळ शिल्पे सापडली आहेत. त्यांचाच या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...


दाभोळ येथील वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्र


दाभोळच्या कातळचित्रात मानवी आकृतीचा फक्त कमरेखालचा भाग कोरलेला आढळतो. प्रामुख्याने हे स्त्रीचे चित्रण असावे असे वाटते. तिच्या कमरेवर मेखलेप्रमाणे शिल्पांकण आढळते. तिच्या पायातही तोड्यासारखे कोरीव काम आढळते. आजवर जगभर सर्वत्र झालेल्या उत्खननात मातीच्या मातृदेवता खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यांची पूजाअर्चा होत असल्याचेही संशोधनातून आढळले आहे. प्रसिद्ध संशोधक रा. चिं. ढेरे यांनी ‘लज्जागौरी’ विषयी खूप माहिती आपल्या पुस्तकात दिली आहे. कोकणात मध्ययुगीन कालखंडात तांत्रिक शाक्त संप्रदायाचे मोठे प्राबल्य होते. त्यामुळे दाभोळ येथील हे कातळचित्र मातृदेवतेचे असावे का? येथे तांत्रिक साधना होत असावी का? असेही प्रश्न उपस्थित होतात.


कातळचित्रे



आरे येथील कातळचित्र


देवी हसोळ येथील ‘मांड’ या नावाने ओळखले जाणारे चित्र आता देवगड तालुक्यातही अनेक ठिकाणी आढळून आले आहे. याच तालुक्यातील आरे हे एक दुर्लक्षित पण निसर्गसंपन्न असणारे गाव. या गावातील सड्यावर दुर्लक्षित अवस्थेत असणारी काही कातळचित्रे माझे मित्रश्री अजित टाककर यांच्यामुळे सापडली. टाककर हे काही कामानिमित्त आरे येथे गेले असता तेथील कातळावर त्यांना काही दुर्बोध आकारातील आकृत्या कातळात कोरलेल्या आढळल्या. त्यांनी त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून मला पाठवून दिले. ते एक कातळशिल्प आहे, हे ओळखून देवगडच्या इतिहास संशोधन मंडळाच्या सहकार्‍यांसमवेत तेथे धाव घेतली व येथे सापडलेल्या कातळचित्रांचे सर्वेक्षण केले.

एका विस्तीर्ण कातळावर खोदून कोरून काढलेले हे कातळचित्र आहे. एक आयताकृती पट लांब पट्टे कोरुन बाकीच्या कातळापासून वेगळा केलेला आहे. याला सरळ पट्यांची बॉर्डर कोरलेली आहे. त्याच्या आत वळणे घेत जसा नाग चालतो तशाप्रकारचे खोल पट्टे कोरले आहेत. आतील भागामध्ये चौरस, गोल, आयताकृती व नागवलय यांसारख्या विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. लांबून पाहता एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटसारखी ही संरचना दिसते. या प्रकारच्या कातळचित्रात विविध प्रकारच्या आकृत्या असतात. सोयीसाठी अशा प्रकारच्या कातळचित्रांना आपण ‘मांड’ असे म्हणूया.\आरे येथील ‘मांड’ या प्रकारच्या कातळचित्रापासून अगदी थोड्या अंतरावर व्हाळीनजीक एक मानवाकृती कोरलेली आढळली. अत्यंत पुसट अशा रेषांनी ही आकृती कोरली आहे. त्यामुळे पटकन ती लक्षातच येत नाही.

 याची दोन्ही पावले बाजूला वळवलेल्या स्थितीत आढळतात. अशाच अनेक मानवाकृती रत्नागिरीपासून कुडाळपर्यंतच्या अनेक गावांतील कातळ सड्यांवर कोरलेल्या आढळल्या आहेत आणि बाजूला वळवलेली पावले हे वैशिष्ट्य या प्रकारच्या बर्‍याच कातळचित्रांमधे आढळते. अनेक ठिकाणी या मानवाकृतींविषयी काही स्थानिक आख्यायिका सांगितल्या जातात. कुठे त्यांना ‘महापुरुष’, ‘राखणदार’ असे संबोधले जाते. काही ठिकाणी अशा पाच-सहा मानवाकृती आढळल्या आहेत. त्यांना त्या भागातील लोक ‘पाच पांडव’ म्हणून ओळखतात. अशा ठिकाणी काही विशिष्ट विधी, पूजाअर्चा, भागवणी करण्याचे म्हणजेच वार्षिक बळी देण्याचे प्रकारही केले जात असत, असे चौकशी करता आढळले आहे. यातील काही आकृत्या या उंच लांब अजानबाहू असलेल्या जैन साधूंप्रमाणे भासतात. पण, ठोस पुराव्याअभावी असा काही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

साळशी येथील कातळचित्र


‘मांड्या’ प्रकारातील एक कातळचित्र साळशी येथील दुर्ग संवर्धनाचे काम करणार्‍या संतोष गावकर या आमच्या तरुण उत्साही मित्राला सापडले. या प्रकारातील कातळचित्रांना अनेक ठिकाणी नागमोडी वळणाची नक्षी आढळते. पण, साळशी येथील ‘मांड’ या प्रकारातील कातळचित्राला ही नागमोडी नक्षी काटकोनात वळवलेली आढळते. बाकी सर्व रेखांकन ‘मांड’ या कातळचित्रासारखेच आहे.
वानिवडे येथील कातळचित्रांचा समूह


वानिवडे या गावात सापडलेले महत्त्वाचे व मोठे कातळचित्र हेदेखील ‘मांड’ याच प्रकारातले आहे. या शिवाय येथे अन्य अनेक प्रकारची कातळचित्रे आहेत. यात मागे मान वळवून पाहाणार्‍या हरणाचे अप्रतिम चित्र आहे. या हरणाचे चित्र आज अतिशय झिजले आहे. त्यामुळे ते चटकन लक्षात येत नाही. या चित्राच्या रेषांचा सहजपणा कलाकाराचे कौशल्य लक्षात आणून देण्यास पुरेसा आहे. अतिशय गोंडस दिसणार्‍या या हरणाची रेखिवता बघत राहाण्यासारखी आहे. त्याची मान वळवून मागे बघण्याची पद्धत पाहिली की आपणास सहजपणे रामायणातील जीव घेऊन पळणार्‍या कांचनमृगाची आठवण व्हावी.

अशी सहजता या कातळात कोरलेल्या चित्रातून दिसून येते. या शिवाय आणखीन एक हरीण किंवा शेळीसारख्या प्राण्याचे चित्र आहे. एक कुत्र्यासारखा दिसणार्‍या प्राण्याचेही चित्र आहे. एका ठिकाणी शिंग किंवा सुळ्यासारखे चित्र आहे. नागाच्या फण्यासारख्या आकृत्या आहेत. दोन मोठी डॉल्फिन माशासारखी चित्रे आहेत. आणखीनही काही वेगवेगळे आकार दिसतात, पण अर्थ लागत नाही. याशिवाय गुडघ्यापासून कोरलेला मानवी पाय हे अर्धवट सोडलेले एक कातळचित्र येथे पाहायला मिळते.

कुणकेश्वर येथील महापुरुष


देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हे गाव निसर्गसंपन्न तर आहेच, पण येथील ११व्या शतकातील प्राचीन शिवालयामुळे हे गाव अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळ ठरले आहे. पण, आता हे गाव कातळचित्रांबाबतही प्रसिद्धीला आले आहे. कुणकेश्वरच्या सड्यावर कातळचित्रे असावीत, असा मला विश्वास होता. कारण, काही विशिष्ट दंतकथा या भागात प्रसिद्ध होत्या. माझ्या आजी-आजोबांकडून कुणकेश्वर मंदिर व इथल्या परिसराविषयी अनेक दंतकथा माझ्या लहानपणी मी ऐकल्या होत्या. आता नवीन पिढीला या दंतकथा ठाऊक नाहीत. या कथांची माहिती असणारी जुनी मंडळी दिवसेंदिवस काळाच्या पडद्याआड जात आहेत. अजूनही अशा दंतकथा सांगणारी काही वयोवृद्ध मंडळी असतील. त्यांच्याकडून या दंतकथा एकत्र केल्या पाहिजेत. अशा दंतकथा अगदीच निरर्थक नसतात. त्यात एखाद दुसरा छुपा अर्थ दडलेला असतो.

 आपल्या इतिहासाची रहस्ये अशा दंतकथांमधून दडलेली असतात. त्यातून इतिहास शोधून काढणेही एक शास्त्र आहे. अशाच एका दंतकथेमुळे कुणकेश्वर येथील सड्यावर कातळचित्रे असावीत, असा माझा समज होता. त्या अनुषंगाने या भागात शोध सुरू होता.माझे सहकारी अजित टाककर यांना कुणकेश्वरातील या विषयाची मी कल्पना दिली होती. त्यांनी त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली. अनेकांकडे चौकशी करता त्यांना इळये येथील रवी कासले यांनी इळये-कुणकेश्वर मार्गावर महापुरुषाची कातळावर कोरलेली प्रतिमा असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या भागात शोध घेऊनही ती सापडत नव्हती आणि अचानक एके दिवशी येथे गवत कापणार्‍या खरात नावाच्या व्यक्तीकडे या महापुरुषाविषयी चौकशी करता खरात यांनी याविषयी एक नवी दंतकथाच सांगितली. त्यानंतर येथे कातळचित्र नक्कीच असावे, अशी शक्यता वाढली व पुढे अधिक शोध घेता अखेर हा महापुरुष सापडला.

या कातळचित्राचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्व तयारीनिशी आम्ही गेलो तेव्हा आम्हाला या महापुरुषाव्यतिरिक्त आणखीन एक कातळचित्र सापडले. यातील महापुरुष म्हटल्या जाणार्‍या माणसाची आकृती पावणेतीन मीटर उंचीची आहे. या माणसाची उंची रुंदीच्या तुलनेत जास्त दिसते. त्याने आपल्या डाव्या हातात सोट्यासारखे काही हत्यार धरलेले असावे, असे जाणवते. त्याच्या पोटावर एक मानवी डाव्या पावलाचा ठसा आढळतो. याच ठशाविषयी एक विशिष्ट दंतकथा खरात यांनी सांगितली होती. ही दंतकथा या आकृतीविषयीच सांगितली जात असली पाहिजे, हे या डाव्या पावलाच्या ठशावरून स्पष्ट होते.

या शिल्पापासून जवळच एका कातळावर छोटे शिवलिंग कोरलेले सापडले आहे. या शिवलिंगाचे काम व ते कोरण्यातील सफाई पाहाता मानवाकृतीपेक्षा हे कातळशिल्प फारसे जुने नसावे. ते अलीकडच्या काळातील दोन-तीनशे वर्षांतील असावे.खरे तर अशी कातळचित्रे नेमकी कधी कोरली, हे सांगणे अवघड आहे. याविषयी वेगवेगळे अंदाज अनेक संशोधकांनी व्यक्त केले आहेत. पण, अजूनही याविषयी ठोसपणे काही सांगता येईल, असे कोणतेही संदर्भ अजूनही सापडलेले नाहीत. भविष्यात अधिक संशोधनानंतरच यावर प्रकाश पडू शकेल.

गिर्ये येथील कातळचित्रे


गिर्ये या इतिहास प्रसिद्ध गावात देवी चौंडेश्वरीचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला असणार्‍या भात शेतीच्या मळ्याच्या बाजूच्या कातळावर दोन पुसट रेषेने कोरलेली अप्रतिम कातळचित्रे आहेत. यात एक तीन मीटर लांबीचा व पावणे दोन मीटर उंचीचा वराह कोरलेला आहे. हे इतके मोठे विशाल कातळचित्र कोरले असले तरी त्याच्या प्रमाणबद्धतेत काही फरक पडत नाही. येथे थोड्या अंतरावर दोन हरणाची शिकार करून ती उलटी आपल्या हातात धरली असावीत, असे एक प्रसंगचित्र म्हणता येईल, असे सुरेख कातळचित्र आहे.

माणसाची आकृती काढताना या कलाकारांनी फारसे कसब वापरलेले दिसत नाही. पण, दोन्ही हरणे काढताना मात्र त्या कलाकाराने लयबद्ध रेषा काढलेल्या आहेत. माणसाच्या आकृतीपेक्षा हरणाच्या आकृत्या या आकाराने मोठ्या काढलेल्या आहेत. बहुधा माणसाने हातात धरलेल्या म्हणण्यापेक्षा माणसाच्या बाजूला ठेवलेली दोन मोठी हरणे असे हे दृश्य दिसते. या अनामिक काळातील कलाकारांनी सर्व प्राण्यांची चित्रे हुबेहूब व कितीही मोठ्या आकारात काढलेली असली तरीही ती प्रमाणबद्ध व लयबद्ध काढलेली दिसतात. पण, माणसांच्या सर्व ठिकाणच्या आकृत्या या आकाराने जरी लहान मोठ्या काढलेल्या असल्या तरी त्या तंतोतंत प्रमाणात काढलेल्या कुठेच दिसत नाहीत. रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण आदी सर्वच ठिकाणी मानवी आकृतींना प्राण्यांच्या आकृतींच्या तुलनेत असे दुय्यम स्थान दिलेले आढळते. ही कातळचित्रे काढणार्‍या माणसांच्या दृष्टीने प्राणी सृष्टी ही अधिक महत्त्वाची असावी, असे दिसून येते.



कातळचित्रे


वाघोटन येथील कातळचित्रे


देवगड तालुक्यातील वाघोटन हा एक सुप्रसिद्ध गाव. हे गाव ओळखले जाते ते ब्रिटिशकालीन बंगल्यासाठी. दि. २३ जानेवारी, २०२१ रोजी देवगडच्या इतिहास संशोधन मंडळाने रवींद्र लाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वाघोटन परिसरात ऐतिहासिक स्थळांचे सर्वेक्षण केले. त्यावेळी काही नवीन कातळचित्रे पाहाण्यात आली आहेत. या गावात एक कातळचित्र असल्याचे कळले होते. त्यानंतर या गावात महेंद्र देवगडकर हे दोन ते तीन वेळा पाहणी करून आले होते. या पाहणीतून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या भागात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मोहिमेत सर्वप्रथम बापर्डे येथील कातळचित्राची व्यवस्थित साफसफाई करून त्याचे फोटो काढण्यात आले, त्याची नीट मोजमापे घेऊन रेखाचित्रे करण्यात आली. त्यानंतर वाघोटन सड्यावर संशोधन मंडळाची टीम पोहोचली. येथे आल्यानंतर हे कातळचित्र पार गवत व मातीखाली झाकले गेले आहे, असे लक्षात आले. या कातळचित्राच्या आसपासच बहुधा गावकरी भाताची झोडणी व वारवणी करीत असल्यामुळे हे कातळचित्र पावसात वाहून आलेली माती व त्यावर वाढलेल्या गवताखाली पार दिसेनासे झाले होते. जवळजवळ चार तास साफसफाई केल्यानंतर हे कातळचित्र मोकळे झाले. या कातळचित्राची सफाई पुरी होता होता संध्याकाळ होत आली आणि आणखीनही काही कातळचित्रे येथे असावीत, असा अंदाज आल्याने आणखी आजूबाजूला शोध व सफाई करण्यात आली. तेव्हा तेथे आणखीन तीन नव्या कातळचित्रांचा शोध घेण्यात आला. यात एक मानवाकृती, एक वर्तुळ व एक वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्र सापडले.

वाघोटन येथील हे मुख्य कातळचित्र ‘मांड’ या प्रकारातील आहे. अशी कातळचित्रे देवगडात आतापर्यंत आरे, साळशी, वानिवडे या ठिकाणी सापडली आहेत. वाघोटनच्या या कातळचित्राजवळ आणखीन काही चित्रे सापडली आहेत. यात दाभोळच्या कातळचित्रासारखे एक चित्र मिळाले आहे. पण, गंमत अशी येथे फक्त दोन पावलेच आज दिसतात. पूर्वी गुडघ्यापर्यंतचे पाय येथे कोरलेले असावेत असे वाटते. हे कातळचित्र कदाचित खंडीत झाले असावे किंवा दोन मानवी पावले एवढाच भाग कोरलेला असू शकेल.


कातळचित्रे



बापर्डे येथील समअंगी कातळचित्र


बापर्डे येथील कातळचित्र हे अतिशय प्रेक्षणीय आहे. अतिशय रेखीवपणे हे कातळचित्र कोरले आहे. देवगड तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या कातळचित्रात ही सर्वोत्तम साईट आहे. अडीज मीटर रुंद व पावणे तीन मीटर लांबीचे हे कातळ चित्र असून एखाद्या आधुनिक समअंगी चित्राप्रमाणे हे चित्र अत्यंत कठीण अशा जांभ्या कातळात कोरलेले आहे. याच्या मध्यभागी शिवलिंगासारखा आकार कोरलेला आहे. या शिवलिंगासारख्या आकाराचा पाणी जाण्याचा मार्ग हादेखील उत्तरेकडे जाणारा आहे. त्यामुळे हे शिवलिंग असावे का, असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो. येथे आपण सोयीसाठी त्याला शिवलिंग असेच म्हणूया. या शिवलिंगाच्या वरच्या व खालच्या भागात गोपद्मासारख्या विशाल आकृत्या काढलेल्या आहेत. याच्या उत्तरेकडील गोपद्मात दोन बाजूला दोन मानवाकृती व मधल्या भागात सुंदर नक्षी कोरली आहे, तर दक्षिणेकडील गोपद्मात पूर्व व पश्चिम दिशेला तोंड करून दोन कावळे कोरले आहेत. काही जणांना यातील एक पक्षी हा पोपट असल्याचा भास होतो. पण, एकंदर चित्र पाहता व सर्वच चित्राचा भाग समान रीतीने कोरण्याचा अज्ञात कलाकाराचा हेतू पाहता, हे दोन्ही पक्षी कावळे असण्याची शक्यता आहे.

आपल्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्‍यावर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगा या लक्षावधी वर्षांपूर्वी भूखंडांचे स्थलांतरण, भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेगातून तयार झालेल्या आहेत. या सह्याद्री पर्वतांच्या माथ्यावर ज्वालामुखातील लाव्हा रसाचे थरावर थर पसरुन ‘लँटराईट’ या प्रकारच्या जांभ्या दगडाचे सपाट पठार तयार झालेले आहेत. ‘लँटराईट’ने बनलेल्या या सपाट कातळी भागालाच कोकणात ‘सडा’ असे म्हटले जाते. ज्या गावच्या शेजारी हे पठार असेल, ते त्या गावच्या नावाने ओळखले जाते. जसे जामसंडे सडा, दाभोळे सडा, कुणकेश्वर सडा इत्यादी. या भागातील पठारांची नावे अशीच पडलेली पाहायला मिळतात.

कोकणातील या परिसरात घरांच्या बांधकामांसाठीदेखील याच जांभ्या कातळातील चिरे कातून काढून वापरले जातात. हा कातळ तासून काढायला अतिशय कठीण व कष्टदायी असतो. हा ‘लँटराईट’चा जांभा दगड काही ठिकाणी अत्यंत कडक जांभळट, काळ्या रंगाचा असलेला आढळतो. वरच्या थराचा हा भाग अत्यंत कठीण थरांचा बनलेला असतो आणि अशा प्रकारच्या कठीण भागावरील सपाटीलाच अनेकदा कोरून तासून तयार केलेली कातळचित्रे आढळतात. यांना पुरातत्वीय भाषेत ‘पेट्रोग्लिफ्स’ असे म्हणतात. या प्रकारची कातळचित्रे आता रत्नागिरी राजापूरपासून पार गोव्यापर्यंतच्या सर्वच दक्षिण कोकणात सापडू लागली आहेत.

रत्नागिरीपासून गोव्यापर्यंतच्या परिसरातील ही कातळचित्रे कधी खणली? कोणी खणली? का खणली? कशासाठी खणली? हा कुतूहलाचा विषय आहे. अनेक ठिकाणी ही कातळचित्रे स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडली आहेत. ‘पांडवांचो सारीपाट’, ‘लिवलेला काप’, ‘महापुरुष’ अशा वेगवेगळ्या नावांनी ही कातळचित्रे ओळखली जातात. खरे तर या प्रकारच्या चित्रांना ‘कातळशिल्प असे अनेक संशोधक म्हणतात. पण ही शिल्प नसून केवळ रेषा कोरून काढीत काढलेली रेखाचित्रे आहेत. यांना ‘कातळशिल्प’ म्हणण्यापेक्षा ‘कातळचित्रे’ म्हणणे अधिक योग्य आहे. ही उठावाची चित्रे आहेत. ही कातळचित्रे मानवाला शिल्प घडविता येण्यापूर्वीची प्राथमिक पायरी असली पाहिजे. त्यामुळे यातील काही कातळचित्रे ही काही हजार वर्षांपूर्वीची असू शकतात. चित्रकलेकडून शिल्पकलेकडे प्रवास करताना मधल्या काळात कधी तरी मानवाने या कातळचित्रांच्या निर्मितीस सुरुवात केलेली असली पाहिजे.

नाग, ससा, खेकडा, सांबर, कोल्हा, चित्ता, हत्ती, रानडुक्कर, अनेक प्रकारचे मासे व पक्षी यांसारखी अनेक चित्रे यात आढळतात. प्रामुख्याने यात पाळीव प्राणी आढळत नाहीत. फक्त जंगलात शिकार केले जाणारे प्राणी या कातळ चित्रांमध्ये आढळतात. त्यामुळे ही चित्रे शिकार करून त्यावर आपला निर्वाह करणार्‍या मानव समूहाने कोरली आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो.अनेक ठिकाणी अनाकलनीय भौमितिक रेखाटणे आढळतात. ठोस वैज्ञानिक पुरावे सापडत नसल्याने साम्य अनुमानांवर आधारितच अभ्यास करणे भाग पडते. अशावेळी काहीजण या चित्रांमधे चुना किंवा खडू टाकून रंगवून फोटो काढतात. पण, हे अत्यंत चुकीचे आहे. कारण, यामुळे त्या चित्राला तर हानी पोहोचतेच, पण त्याचबरोबर आपण ते चित्र रंगवून आपल्याला त्याचे जे आकलन झाले आहे, तेच कायम होऊन बसते. तसेच त्या मूळ रेखाटनाचे निरीक्षण करून नवीन तर्क करण्याला वाव उरत नाही. आज या सर्व कातळचित्रांचे फोटोग्राफ्स, अचूक रेखाटने, नकाशे तयार करून एकत्र करण्याची गरज आहे. बरे हे एकट्या दुकट्याचे किंवा एखाद्या संस्थेचेही काम नाही. सर्वांनी एकत्र येऊन, एकमेकांना माहितीचे आदानप्रदान करीत, चर्चा करीतच हे काम करावे लागेल.

ही कातळचित्रे कोणत्या काळातील आहेत, हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या फारच अवघड आहे. नवाश्म युगापासून अगदी आधुनिक काळापर्यंतच्या रचना यात असू शकतात. फार मोठ्या काळात कोरल्या गेलेल्या या अनंत रचना आहेत. त्या सर्व एकत्रित करून, त्यांची साम्य स्थळे लक्षात घेऊन त्यांचा अभ्यास करावा लागेल आणि तरच काही ठोस संशोधन हाताशी लागू शकेल. आज ही कातळचित्रे कोकणातील पर्यटनासाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. भावी काळात परदेशी पर्यटक खेचून आणण्याची क्षमता या कातळचित्रांमध्ये आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने त्याचे संशोधन, संवर्धन करून त्यांचे योग्य प्रकारे ‘प्रेझेंटेशन’ करावे लागेल. यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता सर्वांनीच या कातळचित्र संशोधन व संवर्धनाच्या कामाला हातभार लावावयास हवा आहे.

‘कोकण इतिहास परिषदे’च्या माध्यमातून गेले एक तप मी इतिहासाच्या अभ्यासात गुंतलो होतो. अजित टाककर या माझ्या मित्रामुळे या कामाने अधिक वेग पकडला. पुढे अनेक मंडळी आमच्यासोबत सहकार्य करण्यास सरसावली व त्यातून ‘देवगड इतिहास संशोधन मंडळा’ची स्थापना झाली आहे. यातूनच पुढे कातळचित्र शोधमोहिमेला अधिक गती प्राप्त झाली. आता जवळजवळ १५-२० गावांमध्ये जवळपास ५०-६० कातळचित्रे देवगडात असावीत, असे वाटू लागले आहे.या संशोधन मोहिमांमध्ये अजित टाककर, महेंद्र देवगडकर, लक्ष्मण पाताडे, योगेश धुपकर, सुमेध दीक्षित आदी मंडळींचा नेहमीच सक्रिय सहभाग लाभला आहे. याशिवाय अनेक गावातील ग्रामस्थ, अनेक मित्र यांच्या मदतीने हे काम वेगाने पुढे सरकत आहे. या प्रयत्नातून कातळचित्र पाहाण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर व आणखीनही अनेक ठिकाणची मंडळी येऊ लागली आहेत. गावातील लोकांनी पुढे येऊन या कातळचित्रांच्या साफसफाईसाठी व योणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुखसोई उभ्या करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लवकरच कातळचित्र पर्यटनाची चांगली पायवाट कोकणात निर्माण होईल, यात शंका नाही.



-रणजित हिर्लेकर

(लेखक भारताच्या प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्वज्ञान-अर्थात ‘भारतविद्या’ अथवा ‘प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)