बंजारा तांड्यावरचे धर्मांतरण! वास्तव...

    17-Dec-2022   
Total Views |
धर्मांतरण


महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात गुजरातमध्ये वसलेला गोर बंजारा समाज. विविध राज्यांत समाजाला विविध नावं आहेत. मात्र, देशभर विखुरलेल्या बंजारा समाजाची एकता-समानता थक्क करणारी! हिंदू समाजातील या वैशिष्ट्यपूर्ण समाज घटकामध्येही धर्मांतराचे विष कालवण्याचा प्रयत्न होत आहे. त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या तांड्यामध्ये काय घडते? समाजाचे कार्यकर्ते, विचारवंत काय म्हणतात, याचा घेतलेला हा मागोवा...

 
क्या गेहूं, चावल, मोठ, मटर,
क्या आग धुंआ और अंगारा
सब ठाट पड़ा राहा जाएगा,
जब लाद चलेगा बंजारा


बंजारा समाजाचा तांडा म्हणजे पशूधनावर वस्तू, अन्नधान्य घेऊन प्रवास करणार्‍या लोकांचा जत्था असे आपल्याला वाटते. मात्र, तो आता भूतकाळ झाला. सध्या बहुसंख्य तांडे हे वस्ती करून राहतात. ज्या गावी ते वस्ती करतात, त्या गावाच्या नावानेच त्यांचा तांडा ओळखला जातो. मात्र, या साध्या भोळ्या लोकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्याचा विडा चर्चसंस्थेने उचलला की काय, असे वाटावे असेच वातावरण दिसते. आता वानगीदाखल हेच भजन पाहा-

मारो आंग तुच देवा
मारो आखिरी तुच येसू



बंजारा भाषेतले हे भजन. या भजनाचा अर्थ - माझे भवितव्य ही तूच देवा आणि माझे भाग्य ही तूच येसू! बंजारा भाषेतले हे भजन मात्र यामध्ये संत श्री सेवालाल किंवा पोहरागडाच्या आई अंबादेवीऐवजी देव म्हणून नाव आहे येशूचे! इतकेच काय येशू ख्रिस्तावर बंजारा भाषेमधून चित्रपटही काढण्यात आला आहे. बंजारा भाषेतून उपदेश करणारे चर्च तर आहेतच आहेत. पण, ख्रिस्ती-बंजारा वधूवर मंडळही आहे बरं का? थोडक्यात विविध माध्यमांतून बंजारा समाजाचे धर्मांतर कसे करता येईल याची अगदी जय्यत तयारी आहे. अशा परिस्थितीतही गोर बंजारा समाज स्वत:च्या अस्तित्वाविषयी विशेष महत्त्व राखून आहे. गोर बंजारा समाजाची स्वतःची मौखिक भाषा आहे. त्या भाषेत समाजाचे आदिसंत भगवान सेवा लाल यांचे वचन आणि विचारही आहेत. आपल्या भाषेवर समाजाचे खूप प्रेम आहे. आपल्या भाषेला भाषिक दर्जा मिळावा म्हणून समाजाचे मान्यवर प्रयत्नशीलही आहेत. या अशा परिस्थितीमध्ये समाजाच्या प्रिय मातृभाषेतूनच कोणी चित्रपट काढला, धार्मिक उपदेश दिले, धार्मिक गीते तयार केली, तर त्याचा परिणाम होणारच. हेच लक्षात घेऊन गोर बंजारा समाजाच्या भाषेतून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला जात आहे.

अर्थात, धर्मांतराची जी जगभरची पद्धत आहे, तीच पद्धत इथेही आहे. सेवेच्या नावाखाली तांड्यामध्ये शिरकाव करायचा. ‘आम्ही फक्त सेवा करू इच्छितो’ असे या भाबड्या लोकांना पटवून द्यायचे. गावखेड्याच्या दुर्गम भागातील लोकांना थोडीफार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची, त्यांच्या पशूधनाला झालेला आजार बरा करण्यासाठी औषधं उपलब्ध करून द्यायची. हे सगळे करताना आव असा आणायचा की, ‘तू बरा झालास ते केवळ येशूच्या कृपेने. मूल होत नाही, गरिबी आहे घरात काही कारणाने क्लेश वगैरे आहे, तर या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला येशूच दूर करू शकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त येशूच्या दयेखाली यावे लागेल... ख्रिश्चन धर्म स्वीकारा. सगळे दुःख दूर होईल. समस्यांशी लढताना थकून गेलेली व्यक्ती मग अलगद या जाळ्यात सापडते. व्यक्ती चर्चमध्ये तांड्याच्या नकळत जाऊ लागते. तिथे अतिशय मधाळ बोलणारी, आदर देणारी माणसं या व्यक्तीचे अगदी आपलेपणाने स्वागत करतात. अर्थात, हा आपलेपणा नकलीच असतो. शिकार्‍याने सावजाला टिपण्यासाठी खेळले जाणारे नाटकच म्हणा ना! तिथे काही लोक या व्यक्तीला सांगतात की, ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यापासून त्यांचे चांगले झाले. हा कमधर्म संयोगच असतो.

 मात्र, खूपदा या व्यक्तींना असे सांगितले जाते की, ‘तुम्ही माझे चांगले झाले, असे बोललात तरच तुमचे चांगले होईल...’ तर ही अशी माणसं नवख्या माणसाला सांगतात की, ‘आमचे तर चांगलेच झाले, तुझे पण होईल.’ नवखा माणूस तिथे जाऊन जाऊन जुना होतो, पण त्याच्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडत नाही. त्याला सांगितले जाते की, तुझ्या भक्तीत काहीतरी कमी आहे किंवा तुझ्यावर सैतानाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे तुझ्यावर येशूची ‘मर्सी’ होत नाही. बिचार्‍याला वाटते की खरेच सैतानाची छाया असावी. त्यामुळेच चांगले होत नाही. आपले चांगले होत नाही म्हणजे सैतानाचा प्रभाव आहे, हे लोकांना कळू नये, यासाठी मग ही व्यक्तीसुद्धा लोकांना सांगत सुटते की, इथे आल्यापासून माझे बघा किती चांगले झाले. दुसरीकडे ही व्यक्ती धर्मांतरित झाली, हे तांड्याला कळलेलेही असते. समाज धर्मांतरण केलेल्या व्यक्तीला तांड्याबाहेर काढत नाही. मात्र, या व्यक्तीशी रोटीबेटी व्यवहार तोडले जातात. धर्मांतरित व्यक्तीला माहिती असते की, ख्रिस्ती धर्म स्वीकारून आपल्या आयुष्यात काही फरक पडला नाही तरी आपण मागे परत फिरू शकत नाही. कारण, समाज परत स्वीकारेल का याबद्दल त्याला खात्री नसते. याबाबतचा अभ्यास त्याचे धर्मांतरण करणार्‍यांनी केलेलाच आहेे. त्यांनी ख्रिस्ती-बंजारा विवाह मंडळही निर्माण केले.

आता प्रश्न असा पडतो की, गोर बंजारा समाजाला का लक्ष्य केले जात आहे? तर हिंदू समाजाला तोडायचे तर यातील प्रत्येक प्रमुख समाजगटाला तोडले पाहिजे, हेच देशविघातक आणि समाजविघातक घटकांचे सूत्र आहे. त्यामुळे बंजारा समाजाला हिंदू समाजापासून तोडले, तर हिंदू समाजाचे नुकसान होईल तसेच देशभरात ख्रिस्तीकरणाचे कार्य सुलभ होईल, असे समाजविघातक शक्तीला वाटते. ‘तुम्ही हिंदू नाहीच’ हे एकदा समाजाच्या मनावर बिंबवले की काम सोपे, असे यांना वाटते. त्यादृष्टीने समाजात विद्वेष पसरवणारे, फूट पाडणारेही लोक तयार केले जातात. डाव्या विचारांचे ज्यांना हिंदू समाजाच्या विविधतेतून एकतेचा भंयकर द्वेष आहे, अशा लोकांनी बंजारा समाजातल्या भोळ्या भाबड्या लोकांना चिथवायला सुरुवात केलीच आहे की, ‘तुम्ही हिंदू नाही, तर तुमचा स्वतंत्र गोर बंजारा धर्म आहे. तुमचा आणि हिंदू समाजाचा काही संबंध नाही.’
‘तुम्ही हिंदू नाही’ हे या लोकांना सांगण्यामागे या मंडळींचा अंतस्थ हेतू अर्थातच हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा आणि त्याद्वारे देशात अस्वस्थता माजवण्याचा आहे हे काय सांगायला हवे?

हे लोक म्हणतात की, “बंजारा समाज हा मातृपूजक आणि निसर्गपूजक आहे. या समाजाची हिंदू सनातनी म्हणून ओळख करून देऊन हिंदू गोर बंजारा समाज अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आणि रा. स्व. संघ करत आहेत.” मात्र, ख्रिस्ती धर्मांतराबाबत हे नेते काही बोलत नाहीत. ते बंजारा समाजाला हिंदू मानतच नाही असे वाटते, तर अशा प्रकारे विविध स्तरावर लोक उभी केली आहेत. जी बंजारा समाजाला संधी बघून सांगत असतात की, ‘तुम्ही हिंदू नाहीत.’याच आयामातून विदर्भातील बंजारा समाजातील एका गावच्या तांड्याचे प्रमुख डलसिंग राठोड यांना विचारले की, बंजारा समाज आणि हिंदू समाजामध्ये काही फरक आहे का? यावर डलसिंग म्हणाले की, “आम्ही वाडवडिलांपासूनच काय जन्मोजन्मीचे हिंदू आहोत. आमच्या जन्मदाखल्यावर पण हिंदू म्हणूनच लिहिलेले असते.


सेवालाल


आम्ही संत सेवालाल महाराजांचे भक्त आहोत. ते अंबामातेचे भक्त होते. असे म्हंटले जाते की त्यांच्या आईबाबांना लग्नानंतर १२ वर्षांपर्यंत अपत्यप्राप्ती नव्हती. अंबामातेला पूजल्यानंतर सेवालाल महाराजांचा जन्म झाला. सेवालाल महाराजांच्या आयुष्यात मॉ अंबेमातेने अनेकदा त्यांना दृष्टांत दिला. अंबा माता अख्ख्या हिंदुस्थानची देवता आहे. आम्ही मातेला मानतो, पूजतो. मग आम्ही हिंदू कसे नाही ते सांगा बरं? आम्ही सगळे हिंदू सण साजरे करतो. आता आता नाही, तर अगदी बापजाद्यांच्या बापजाद्यांपासून. दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो, रावणाला राक्षसच मानतो आणि होळीला तर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाची गीत गाऊन होळी साजरी करतो. हे पण आता आता नाही, तर वंशपरंपरेने! मग आम्ही हिंदू कसे नाहीत ते सांगा?” थोडक्यात, डलसिंग यांना बंजारा हे हिंदू आहेत का, या माझ्या प्रश्नाचा भयंकर राग आलेला दिसला. काहीही असो, पण या रागातून त्यांनी जे उत्तर दिले ते हिंदू धर्माचे तुकडे करू इच्छिणार्‍यांसाठी पुरेसे उत्तर आहे.

याच विषयावर प्रा. विजय राठोड यांच्याशी बोलले. विजय यांचा बंजारा समाजाच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासावर गाढा अभ्यास. ते स्वतःही तांड्यातच वाढलेले. ते म्हणतात ”संत सेवालाल महाराजांची २२ वचने आहेत. ज्या वचनांना आमचा समाज बांधिल आहे. ती वचने कोणती आहेत? तर त्यात मानवतेचे सूत्रच सांगितलेले आहे. सदाचारपूर्ण नितीयुक्त जीवनाचे सार सांगितले आहे. उदाहरणार्थ संत सेवालाल महाराजांनी सांगितले ‘जाणजो, छानजो, पचा मानजो‘ म्हणजे कोणतीही बाब माहिती करून घ्या, शिकून घ्या, त्यास पडताळून पाहा, नंतरच त्याचा अवलंब करा. तसेच ते म्हणाले, ‘केणी भजो मत, पुजो मत, बालबचियान शिकावो शाळा’ याचा अर्थ कोणाला भजू नका, पुजू नका, मुलांना शाळा शिकवा. आता संतसेवालाल महाराजांनी सांगितलेले हे विचार काय हिंदू समाजाबाहेरचे विचार आहेत का? उलट जे काही आहे ते पूर्वीपासून आहे म्हणून नाही, तर तुम्हाला पटले म्हणून स्वीकारा, ही भूमिका हिंदू विचारधारा सोडून इतर कोणत्या धार्मिक विचारांमध्ये आहे का? बंजारा समाजाशी चर्चा केली तर तुम्हाला जाणवेल की, समाज आजही रामायण-महाभारताशी संबंध सांगताना दिसून येईल. काही ठिकाणी तर सेवालाल म्हाराजांना श्रीकृष्णाचे अवतारही मानतात. मग बंजारा समाजला हिंदू न मानणे म्हणजे सत्याशी फारकतच आहे.”असो. या सगळ्या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघ समाजासाठी विविध आयामांतून उपक्रम राबवत आहेत. धर्मजागरण विभागाने एक कार्यक्रम हाती घेतला आहे.


बंजारा


या कार्यक्रमाबद्दल अखिल भारतीय धर्मजागरण बंजारा परियोजनाचे अध्यक्ष गोवर्धन राठोड यांच्याशी चर्चा केली. दि. २५ ते ३० जानेवारीदरम्यान जळगावमधील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. सहा दिवस चालणार्‍या कुंभात दररोज दोन-अडीच लाख भाविक येण्याची शक्यता आहे. अर्थात, आता ज्यांना बंजारा समाजाचे हिंदू म्हणून अस्तित्व आवडत नाही, अशा लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, बंजारा समाजाची काशी म्हणजे पोहरादेवी गड. इथे कुंभ न भरवता गोद्री येथे का नियोजन केले, तर याला पोहरागडाचे पिठेश्वरांनीच उत्तर दिले की, ”गोद्रीनंतर याहीपेक्षा मोठा कुंभ पोहरागड येथे आयोजित केला जाईल आणि तेव्हा तर देशभरातील गोर बंजारा आणि संबंधित सर्वच समाजाने यावे.”

पोहरादेवीगडाच्या पिठेश्वरांनीच गोद्री येथील कुंभाचे समर्थन केल्यामुळे या कुंभाला विरोध करणार्‍यांची पंचाईत झाली. या कुंभाला विरोध का असावा? तर या कुंभामध्ये मुरारीबापू, राममंदिर ट्रस्टचे गोविंदगिरी महाजन, साध्वी ऋतंभरा देवी, योगगुरू रामदेवबाबा, महंत रघुमणी, दमदमी टकसालचे प्रमुख बाबा हरनामसिंगजी, गुरू शरणानंदजी, नंदबाबा, श्री रविशंकर, पोहरादेवी संस्थानचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, पाल येथील गोपाल चैतन्य महाराज, तेलंगणचे संत रामसिंग महाराज, सुरेश महाराज, लबाडा समाजाचे मध्य प्रदेशातील महंत चंद्रसिंग महाराज, प्रसन्नसिंग महाराज, संचालन समितीचे श्याम चैतन्य महाराज यांच्यासह १०० संत-महंत उपस्थित राहणार आहेत. ते उपस्थित समाजबांधवांशी धार्मिक अध्यात्मिक संवाद साधणार आहेत.

तुमचे धर्मगुरू कुठे आहेत? तुम्हाला धर्माची काय माहिती आहे? असे विचारत धर्म सोडा, असे भोळ्या-भाबड्या बंजारा व्यक्तीला सांगणारे लोक यानंतर कुठच्या तोंडाने समाजाला विचारतील की, तुमचे धार्मिक वैचारिक गुरू कधीतरी तुम्हाला भेटले का? थोडक्यात, धर्म-अध्यात्माच्या नावावर फसवणूक करून धर्मांतर करणार्‍यांच्या अवैध कृत्याला या कुंभामुळे अडथळा निर्माण होणार आहे. समाज अध्यात्मिक आणि नैतिकदृष्ट्या हिंदू समाजापासून दूर कसा राहील, असेच या समाजविघातक मंडळीचे प्रयत्न असतात. पण, या कुंभामुळे त्यांना जे पाहिजे ते शक्य होणार नाही. विषयांतर झाले. संत सेवालाल महाराजांच्या चरणी लिन होणारा आणि धर्म अस्तित्वासाठी, समाज संघटनेसाठी सदैव तत्पर असलेला गोर बंजारा समाज धर्मांतराच्या षड्यंत्राला समजून घेईल आणि त्यावर मात करेल, असे नक्कीच वाटते. कारण, मुस्लीम आक्रमक असोत की इंग्रज, या परकीय दमनकारी शक्तींच्या विळख्यात असातनाही गोर बंजारा समाज हिंदू गोर बंजारा समाजाच राहिला, तर आता गोष्टच वेगळी.अंबामातेच्या आशीर्वादाने संत सेवालाल गोर बंजारा अधर्म शक्तीपासून समाजाचे रक्षण नक्कीच करतील. जय संत सेवालाल

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभमेळा


जानेवारी २०२३च्या या मेळ्याला लाखो लोक हजेरी लावणार आहेत. समाजबांधवांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालत या कुंभाच्या तयारीला वेग दिला. त्यामुळे या गावाशी जोडणार्‍या परिसरातील ४० गावांचे प्रमुख रस्ते, पुलांची कामे दहा कोटींच्या निधीतून युद्धपातळीवर केली जात आहे. अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी एक हजार कुटुंबांच्या या गावात हेलिपॅडही तयार केले जात आहे. कार्यक्रमांसाठी काही ठिकाणी निवास व्यवस्था केली जाईल. यात बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीवर आधारित प्रदर्शने असतील. प्रत्येकी सात हजार लोकवस्तीची तांडा संकल्पेनवरील गावे उभी केली जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी १५ हजार स्वयंसेवक, तर आयोजनासाठी पाच हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत. धर्मजागरण समन्वयकडून आयोजनासह जागरणाचेही काम केले जात आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.