पाकिस्तानने काश्मीर मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी कधीही सनदशीर, शांततामय मार्गाचा पुरस्कार केला नाही. त्यासाठी त्याने युद्ध आणि युद्धात मार खाल्ल्यानंतर दहशतवादाचा अवलंब केला. त्याच्या याच धोरणामुळे जम्मू-काश्मीर रक्तरंजित झाले, काश्मिरी नागरिकांबरोबरच सीमेवर तैनात भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा झाले अन् दहशतवादी हल्ल्यांत सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडले.
पाकिस्तानचे नाव घेतले की, आपल्या डोळ्यासमोर इस्लामी कट्टरता, जिहाद, फिदायीन हल्लेखोर आणि दहशतवादाचे चित्र उभे राहते. त्याच पाकिस्तानने नुकतेच जम्मू-काश्मीरबाबत वक्तव्य केले अन् त्यावर भारताने दिलेल्या उत्तराकडे जग पाहतच राहिले. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य करावे, अशी मागणी सध्या केली जात आहे. याचदरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो म्हणाले की, “काश्मीर मुद्दा अजूनही सुटलेला नाही. जर तुम्हाला (भारत) बहुपक्षवादाचे यश पाहायचे असेल, तर काश्मीर मुद्द्यावर तुम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव लागू करण्याची परवानगी देऊ शकता. तुम्ही सिद्ध करू शकता की, बहुपक्षवाद यशस्वी झाला. तुम्ही हे सिद्ध करा की, तुमच्या (भारत) अध्यक्षतेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आमच्या क्षेत्रात (काश्मीर) शांतता आणू शकते.” बिलावल भुट्टो यांनी हे वक्तव्य केले अन् संपूर्ण जगाने त्यानंतर भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे रौद्र रुप पाहिले.
बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यावर एस. जयशंकर म्हणाले की, “जो देश ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करत होता, ज्या देशाने आपल्या शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला केला, तो देश संयुक्त राष्ट्रांसारख्या शक्तीशाली मंचावर उपदेश देण्याच्या योग्यतेचा नाही.” यासोबतच त्यांनी संयुक्त राष्ट्रांत नकाराधिकाराचा वापर करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बचाव करणार्या चीनलाही फटकारले. ते म्हणाले की, “स्वाभाविकपणे आपण आज बहुपक्षवादात सुधारणांवर लक्ष केंद्रित करत आहोत. त्याबाबत आपापला दृष्टिकोन असू शकतो. पण, एक सर्वसहमती तयार होत आहे. किमान आपण त्यात उशीर करता कामा नये. जग दहशतवादाविरोधात संघर्ष करत आहे आणि अशा काळात काही लोक दहशतवादी हल्ले करणार्या, षड्यंत्र रचणार्यांना योग्य ठरवत आहे, त्यांना वाचवण्यासाठी जागतिक मंचाचा दुरुपयोग करत आहे.” पुढे ते म्हणाले की, “आपण मार्ग शोधत आहोत.
त्यावेळी असे धोके सामान्य असल्याचे सांगणार्या प्रयत्नांचा स्विकार करता येणार नाही. आतापर्यंत हा प्रश्न उपस्थित झाला नाही की, ज्या गोष्टीला संपूर्ण जग स्वीकारत नाही, तिला न्यायोचित म्हणण्याचे प्रयत्न का होत आहेत? हे सीमेपलीकडील दहशतवाद, दहशतवादाला प्रोत्साहन देणार्यांवरही लागू होते.” एस. जयशंकर यांनी आपल्या या सर्वच विधानांतून पाकिस्तानला तर धुतलेच, पण चीनलाही सुनावल्याचे दिसते.कोणत्या ना कोणत्या जागतिक मंचावर काश्मीर मुद्दा उपस्थित करून पाकिस्तान भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो. पण, पाकिस्तानने काश्मीर मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी कधीही सनदशीर, शांततामय मार्गाचा पुरस्कार केला नाही. त्यासाठी त्याने युद्ध आणि युद्धात मार खाल्ल्यानंतर दहशतवादाचा अवलंब केला. त्याच्या याच धोरणामुळे जम्मू-काश्मीर रक्तरंजित झाले, काश्मिरी नागरिकांबरोबरच सीमेवर तैनात भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा झाले अन् दहशतवादी हल्ल्यांत सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडले.
त्या पाकिस्तानने काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठीच दहशतवादाला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यातूनच ओसामा बिन लादेनसारखा दहशतवादी तयार झाला. त्याने अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर दहशतवादी हल्ला केला. विशेष म्हणजे, दहशतवादाविरोधात अमेरिकेला मदत करत असल्याचे नाटक वठवतानाच पाकिस्तानने ओसामा बिन लादेनलाही आपल्याकडे आश्रय दिला. त्याची सर्वप्रकारची बडदास्त ठेवली. याच जोडीला पाकिस्तानने हाफिज सईद, अयमान अल जवाहिरी आणि इतरही अनेक क्रुरकर्मा दहशतवाद्यांना पोसण्याचे काम केले. तो पाकिस्तान भारताला उपदेश देण्याच्या पात्रतेचा कधीपासून झाला? पाकिस्तानची सध्याची लायकी फक्त कटोरा घेऊन देशोदेशांपुढे, विविध जागतिक संस्थांपुढे भीक मागण्याचीच आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या याच योग्यतेमुळे थेट शब्दांत त्याला संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुनच फटकारले.
पुढचा मुद्दा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव लागू करावा असे म्हटले. तसेच, काश्मीर या आमच्या क्षेत्रात शांतता कधी नांदेल, असाही प्रश्न केला. पण, मुळात जम्मू-काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करायची असेल, तर पाकिस्तानने आधी त्याने कब्जा केलेल्या भूमीवरून सर्वप्रकारची माघार घेणे गरजेचे आहे. त्यावर मात्र पाकिस्तान कधी बोलत नाही वा कृतीही करत नाही. सारेकाही भारताने करावे, अशी अपेक्षा मात्र तो देश करत असतो. पुढे त्याने काश्मीरला आपले क्षेत्रही म्हटले. पण, भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर पाकिस्तानचे कधी झाले? महाराजा हरीसिंग यांनी जम्मू-काश्मीर भारतात विलीन केले होते, पाकिस्तानमध्ये नव्हे. उलट पाकिस्तानने मुस्लीम बहुसंख्येच्या आधारे तिथे टोळीवाल्यांना घुसवले अन् जम्मू-काश्मीरचा काही भाग बळकावला. त्याने केलेली ही कृती अनधिकृत असून आता ती दुरूस्त करण्याची वेळ आलेली आहे.
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळातच पाकव्याप्त काश्मीर भारतात परतण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाकिस्तानने जम्मू-काश्मीरला आमचा प्रदेश वगैरे न म्हणता शांततामय मार्गाने कब्जा केलेला भाग सोडावा अन्यथा तो परत मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय भारतापुढे खुले आहेत.पुढे एस. जयशंकर यांनी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याच्या, त्यांचा बचाव करण्याच्या मुद्द्यावरून चीनलाही सुनावले, ते योग्यच. चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून त्या देशाने अनेकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाचा नकाराधिकार वापरून विरोध केला आहे. आज अवघे जग दहशतवादाविरोधात एकजूट होत आहे. दहशतवादाचा खात्मा कसा करता येईल, यावर विचारविनिमय केला जात आहे, धोरण आखले जात आहे. अशा परिस्थितीत चीनसारखा देश मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असूनही दहशतवाद्यांना, दहशतवादाला पाठीशी घालत असेल तर ते खपवून घ्यायला नको. एस. जयशंकर यांनी आपल्या विधानांतून तेच केले व चीनलाही फटकारले.