समाजहिताचा वसा...

16 Dec 2022 21:05:53
Akshay Phatak


बुद्धी आणि सातत्यपूर्ण कष्ट यांच्या साहाय्याने समाजाच्या विविध समस्या सोडविणारे अक्षय फाटक. त्यांच्या कार्याचा इथे घेतलेला संक्षिप्त मागोवा...


२०१८ ची घटना. अग्रेलखामध्ये चुकीचा संदर्भ दिला गेला होता. त्याचे परिणाम समाजमनावर झाले होते. मात्र, डोंबिवलीतील युवकाने त्या अग्रेलखाविरोधात कायदेशीररित्या आवाज उठवला. एक बलाढ्या संस्था विरूद्ध सत्याची कास धरणारा एक युवक अशीच लढत होती. तीन-चार महिने त्या युवकाने सलग लढा दिला. त्यावेळी अनेकांनी त्याला म्हटले की, “अरे कशाला हे तू करतोस? तुला काय करायचे आहे?” पण एखाद्या कामाची सुरूवात केली तर त्याचा शेवटपर्यंत यशस्वी पाठपुरावा करायचाच, असे त्या युवकाचे म्हणणे. त्यामुळे न थकता युवकाने हाती घेतलेले काम पूर्ण केले. ‘प्रेस कौन्सिल’ने त्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखाचा निषेध नोंदवला. त्या वर्तमानपत्राच्या इतिहासातली ही पहिलीच घटना होती. युवकासाठी हा मोठा विजय होता. कारण, वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याने रा. स्व. संघाच्या शाखेत एकच मंत्र शिकला होता, तो म्हणजे सत्याचा नेहमी विजय होतो. सत्याचा विजय होताना पाहून युवकाचा हुरूप वाढला. सामाजिक कार्यात बुद्धीचा आणि कष्टाचाही उपयोग करत हा युवक अविरतपणे सामाजिक कार्य करू लागला. ही व्यक्ती आहे, डोंबिवलीचे अक्षय फाटक.

डोंबिवलीच्या सेवावर्तुळामध्ये, समाजशील जागृतीमध्ये अक्षय फाटकहे नाव वगळणे अशक्य आहे. डोंबिवलीच्या नागरी सुविधा आणि बुद्धिवादी संवेदनशील समाजकार्यात अक्षय यांचा सक्रिय सहभाग आणि नेतृत्व नसेल, असे होणे शक्यच नाही. विविध उपक्रमांमध्ये अक्षय कार्यरत आहेत. ‘विवेकानंद सेवा मंडळ’, ‘ईशान्य वार्ता मासिक’, ‘टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ’, ‘गणेश मंदिर’, ‘नववर्ष स्वागत यात्रा’ या सर्वांमध्ये अक्षय यांचे मोठे योगदान आहे. अर्थात, वरील सर्व संस्था किंवा कार्यक्रम म्हणजे डोंबिवलीची सन्मानपूर्ण ओळख आहेत. ही अस्मिता टिकवण्यासाठी अक्षय सदैव कार्यरत आहेत.उच्चशिक्षित अक्षय यांचे वडिल चंद्रकांत खासगी कंपनीत कामाला, तर आई अनिता सरकारी नोकरीत. हे कुटुंब मूळचे सांगलीचे. मात्र, अनेक दशक डोंबिवलीत स्थायिक झालेलेअक्षय यांचा जन्म डोंबिवलीचाच. अनीता यांचे राष्ट्र सेविका समितीशी ऋणानुबंध तर चंद्रकांत हे रा. स्व. संघाच्या देशनिष्ठ विचारांचे समर्थक. त्यामुळेच त्यांनी अक्षय यांना वयाच्या पाचव्या वर्षी संघ शाखेत नेले.

 अक्षय इयत्ता पाचवीमध्ये असताना पहिल्यांदा रा. स्व. संघाच्या तीन दिवसांच्या शिबिराला गेले. पहिल्या दिवशी का कोण जाणे, त्यांना भरपूर ताप भरला. त्या रात्री त्यांचे संघशिक्षक मुंशी रात्रभर त्यांच्याजवळ बसले होते. मिठाच्या पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवत होते. आईच्या मायेने सेवा करत होते. तो एक क्षण, त्या क्षणाने अक्षय यांचे अवघे आयुष्य रा. स्व. संघाशी जोडले गेले. पुढे अक्षय यांच्याकडे संघाच्या विविध जबाबदार्‍या आल्या. आपली प्रत्येक कृती समाजहिताचीच असेल याकडे अक्षय यांचा कटाक्ष होता आणि आहे. पुढील काळात समाजाच्या हितासाठी अखंड कार्यरत राहण्याचा वसा त्यांनी घेतला.नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी दक्ष नावाची संघटना उभी केली. आज या संस्थेच्या विविध उपक्रमामध्य एक हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी आहेत. रस्त्यावरचे खड्डे, अस्वच्छता, प्रदूषण या समस्या दूर करण्यासाठी ‘दक्ष संस्थे’सोबत हे नागरिक सामील झाले आहेत. अक्षय यांनी समस्येविरोधात आवाज उठवला ना मग ती समस्या सुटणारच, असा विश्वास लोकांना वाटतो.

लोकांच्या या अशा वाटण्याला कारणही आहे. कारण, अक्षय फाटक हाती घेतलेले काम कधीच अपूर्ण सोडत नाहीत.परिसरात राजमार्गावर सहा वर्षांपासून एक मोठा खड्डा होता. राजमार्ग असल्याने या मार्गावरून मान्यवरांची जा-ये होतीच. हा खड्डा सहा वर्षांपासून भरला गेला नाही. कारण, पीडब्ल्यूडी आणि एमआयडीसी या दोघांचाही या खड्ड्यांबाबत समन्वय नव्हता. अक्षय यांनी सोशल मीडियाची मदत घेतली. फेसबुक ‘लाईव्ह’ केले आणि रस्त्यावरचा तो खड्डा दाखवत त्यांनी जाहीर केले की आजपासून हा खड्डा ते तीन महिन्यांसाठी दत्तक घेत आहेत. त्यानंतर तो खड्डा भरण्यासाठी अक्षय यांनी अक्षरशः जंगजंग पछाडले. संबंधित शासकीय यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे रस्त्यावरचा खड्डा बुजवण्यासाठी पाठपुरावा केला.

 त्यासाठी शासकीय चौकटीतले पत्र लिहिणे, तरतुदी पूर्ण करणे, सगळे सगळे केले. खड्ड्यांसंदर्भात काय पाठपुरावा केला आणि त्याबाबत काय प्रगती झाली, या संदर्भात दर दहा दिवसांनी ते सोशल मीडियावर माहिती देत. सोशल मीडियावर माहिती येत असल्यामुळे आणि सगळेच पारदर्शक असल्यामुळे कदाचित पण प्रशासकीय स्तरावर सहा वर्षे रखडलेले काम तीन महिन्यांत पूर्ण झाले.अशाच प्रकारे अक्षय यांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्नांना वाचा फोडली. रस्त्यांसंदर्भातही ‘दक्ष’ संस्थेच्या माध्यमातून अक्षय यांनी भरीव कामगिरी केली. ’आपण समाजाचे काही देणे लागतो ते फेडलेच पाहिजे. समाज आपले कुटुंब आहे. त्याला होणारा त्रास निवारण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे,’ असे अक्षय यांचे मानणेे. येणार्‍या काळातही समाजाच्या हितासाठी आणि परिसराच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचा वसा अक्षय यांनी घेतला आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!




Powered By Sangraha 9.0