कौटुंबिक संस्कृतीपासून दुरावाच ‘लिव्ह-इन’, घटस्फोटाला जबाबदार

14 Dec 2022 19:01:54
Live-in


विभक्त कुटुंबाने स्वातंत्र्याची खोटी भावना निर्माण केली असली, तरी वास्तविकता दर्शवते की, बहुतेक महिला या व्यवस्थेला बळी पडतात. नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आजारांमध्ये वाढ, घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ आणि स्वतःवर आणि मुलांवर नकारात्मक परिणाम, अमली पदार्थांचे सेवन, ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकणे आणि महान भारतीय संस्कृती आणि परंपरेपासून दूर जाणे, हेसुद्धा यावरुन दिसून येते.


भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती. कारण, भारत हा प्रामुख्याने हिंदू देश आहे. भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृतीचे एक रूप आहे. ही संस्कृती इतकी पूजनीय आहे की, प्राचीन संस्कृत साहित्यात तिचा उल्लेख ’सा प्रथम संस्कृत विश्वावरा’ असा आहे. म्हणजे जगातील पहिली आणि सर्वोच्च संस्कृती, असा आढळतो. सर्व वैदिक तत्त्वज्ञानांपैकी सर्वोत्कृष्ट तत्त्वज्ञान भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारणपणे समाविष्ट केले गेले आहे आणि ते जगात आजही तितकेच प्रासंगिक आहे.

प्राचीन काळापासून कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजातील एक विशेष व महान पद्धती आहे आणि भारताच्या सामूहिक संस्कृतीचे एक विशिष्ट प्रतीक आहे. शहरीकरण आणि पाश्चात्त्य प्रभावाचा घरावर आणि घरातील व्यवस्थेवर परिणाम होईपर्यंत संयुक्त कुटुंब व्यवस्था किंवा विस्तारित कुटुंब हे भारतीय संस्कृतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. नवीन कौटुंबिक व्यवस्था विशेषतः शहरांमध्ये रुजली आहे, जेथे विभक्त कुटुंबे सर्वसामान्य प्रमाण बनली आहेत. सामाजिक-आर्थिक घटक (औद्योगिकरण, शहरीकरण आणि स्थलांतर) संयुक्त कुटुंब व्यवस्था कमकुवत होण्यास कारणीभूत आहेत, हे नाकारता येणार नाही.

आजच्या जगातली बदलती परिस्थिती


विविध समाजशास्त्रज्ञांनी गेल्या काही वर्षांतील त्यांच्या अभ्यासात पुष्टी केली आहे की, भारतातील एक जोडपे आणि त्यांची अविवाहित मुले यांचा समावेश असलेल्या विभक्त कुटुंबांचा उदय वाढत्या प्रमाणात शहरी भागात दिसून येत आहे. २० ० १च्या जनगणनेनुसार, ९.९८ कोटी, १९.३१ कोटी कुटुंबांपैकी म्हणजेच ५१.७ टक्के विभक्त कुटुंबे होती. २० ११च्या जनगणनेत, १२.९७ कोटी विभक्त कुटुंबांसह हा हिस्सा ५२.१ टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या २४.८८ कोटी अशी कुटुंबे आहेत. मात्र, शहरी भागात विभक्त कुटुंबांचे प्रमाण थोडे कमी झाले आहे, असे दिसते. २० ० १ मधील ५४.३ टक्के शहरी विभक्त कुटुंबांची टक्केवारी ही २० ११ मध्ये ५२.३ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. याउलट, ग्रामीण भागातील विभक्त कुटुंबांचे प्रमाण ५० .७ टक्क्यांवरून ५२.१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही नवीन संकल्पना लग्नाऐवजी वेगाने वाढत आहे. तसेच घटस्फोटाची प्रकरणेही वाढत आहेत. जिव्हाळ्याचे बंध, काळजी आणि नि:स्वार्थी मदत या भावना झपाट्याने कमी होताना दिसतात. मोठ्या प्रमाणात किमती वाढूनही, मद्यसेवनात वाढ होत आहे. तंबाखूचे विविध प्रकार आणि अमली पदार्थांच्या सेवनात झपाट्याने वाढ होत आहे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हा खरंतर स्वार्थ आणि खोटा अहंकार पूर्ण करण्याचा करार आहे, जो आपल्याला किती स्वातंत्र्य आहे आणि आपण किती स्वतंत्र आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये निःस्वार्थ प्रेम नाही, फक्त शारीरिक आकर्षण आहे, असेच दिसून येते. जेव्हा शारीरिक आकर्षण कमी होते तेव्हा द्वेष, अविश्वास, मानसिक अस्थिरता, भांडणे, अमली पदार्थांचे सेवन, एकटेपणा आणि जीवनातील अनास्था प्रकर्षाने जाणवू लागते.

विभक्त कुटुंबाने स्वातंत्र्याची खोटी भावना निर्माण केली असली, तरी वास्तविकता दर्शवते की, बहुतेक महिला या व्यवस्थेला बळी पडतात. नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आजारांमध्ये वाढ, घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ आणि स्वतःवर आणि मुलांवर नकारात्मक परिणाम, अमली पदार्थांचे सेवन, ’लव्ह जिहाद’मध्ये अडकणे आणि महान भारतीय संस्कृती आणि परंपरेपासून दूर जाणे. कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्याने अनाथाश्रमांमध्ये वाढ होत आहे, हेसुद्धा यावरुन दिसून येते.
वैदिक काळात भारतीय स्त्रियांना जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये पुरुषांच्या बरोबरीचे स्थान होते. परंतु, भारतीय उपखंडावरील इस्लामच्या शासनामुळे त्यांनी त्यांचा दर्जा आणि आदर गमावला, ज्यामुळे भारतीय समाजात ‘पर्दा’ प्रथा आली. आधुनिक भारतात परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. शतकानुशतके, भारतातील महिलांच्या स्थितीत अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. महिलांच्या हक्कांना भारतीय संविधानाने हमी दिली आहे.

विशेषत: समानता, सन्मान आणि भेदभावापासून स्वातंत्र्य, याव्यतिरिक्त भारतात महिलांच्या हक्कांवर नियंत्रण करणारे विविध कायदे आहेत. १९५० च्या उत्तरार्धापर्यंत हिंदू धर्मात घटस्फोटाची प्रथा नव्हती, तथापि, सद्य:परिस्थितीत भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. शहरांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात ८० टक्के घटस्फोट स्त्रियांकडून मागितले जातात. घटस्फोट म्हणजे काय, यावर मते भिन्न आहेत: पुरातनमतवादी लोकांसाठी, घटस्फोटाची वाढती संख्या सामाजिक बंधने तुटणे दर्शवते. काही आधुनिकतावाद्यांसाठी, ते महिलांसाठी निरोगी नवीन सक्षमीकरणाची सुरुवात दर्शवतात.


घटस्फोट


विवाह पद्धती महत्त्वाची का आहे?


विवाह ही केवळ एक अशी व्यवस्था नाही, ज्यामध्ये विरुद्ध लिंगाचे दोन भागीदार एकत्र येतात, तर सामाजिक आणि सांस्कृतिक अखंडतेसाठी प्रेमाच्या बंधनाने दोन भागीदारांना एकत्र आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. विवाह हा केवळ लैंगिक क्रिया किंवा पुनरुत्पादनासाठी नसतो, जरी जैविक संकल्पनेच्या दृष्टीने, प्रजातींच्या निरंतरतेसाठी पुनरुत्पादन आवश्यक आहे. परंतु, जोडपे पालक आणि पूर्वजांकडून मिळालेला महान सांस्कृतिक वारसा वाहतात आणि पुढे चालू ठेवतात, जे सामाजिक बंधन, अखंडता आणि वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे. सुसंस्कृत समाजासाठी, विवाह कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांचे सातत्य सुनिश्चित करतो, तसेच मूल्य-आधारित व्यवस्थेमध्ये नवीन पिढ्यांचे संगोपन करतो.

संयुक्त कुटुंब पद्धतीचे महत्त्व


आज आपल्याकडे अशी लोकांची पिढी आहे, ज्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्यानंतर विभक्त कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एका विस्तारित कुटुंबात वाढणारी मुले केवळ सहिष्णुता, संयम आणि इतर लोकांच्या दृष्टिकोनाचा स्वीकार करण्याची लोकशाही वृत्ती शिकत नाहीत, तर भावंडं आणि चुलत भावांसोबत खेळताना खेळ भावना विकसित करतात. कौटुंबिक व्यवस्था ही अनेक प्राचीन परंपरा, चालीरीती आणि जीवनशैलीचा उगम आहे. कुटुंबव्यवस्था ही खरेतर सामाजिक एकात्मतेची आणि लोकशाही विचाराची बीजे पेरते. कुटुंब वृद्ध, विधवा, अविवाहित प्रौढ आणि दिव्यांगांची काळजी घेते, बेरोजगारीच्या काळात मदत करते आणि सुरक्षितता आणि समर्थन आणि एकत्रतेची भावना प्रदान करते.

संयुक्त कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्यांना भेडसावणार्‍या समस्येचे निराकरण करण्यासाठी एकत्र काम करणे, आजच्या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणातही तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी राहण्यात आश्चर्यकारक काम करते. समाजीकरण ही समाजाचा स्वीकृत सदस्य होण्याची प्रक्रिया आहे. घर ही पहिली शाळा असते आणि आई ही पहिली शिक्षिका असते, असे अनेकदा म्हटले जाते. एक मूल त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून स्वच्छता, खाण्याच्या सवयी इत्यादी नियम शिकतो. व्यक्तीमध्ये त्याच्या कुटुंबाकडून संस्कार होतात. व्यक्तींची मूल्ये दृढ श्रद्धा म्हणून परिभाषित केली जाऊ शकतात. कुटुंबात मोठ्यांचा आदर, मुलांना मदत करणे, एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी इत्यादी मूल्ये रुजवली जातात. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या कुटुंबावर खूप प्रभाव पडतो.

 वैयक्तिक वागणूक त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करते. उदाहरणार्थ, अतिरेक करणारी मुले हट्टी आणि गर्विष्ठ बनू शकतात. दुसरीकडे, जर कौटुंबिक सदस्यांनी इतरांबद्दल काळजी दाखवली, तर मूल हे वर्तन शिकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या वागणुकीत दिसून येते.आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रार्थना. प्रत्येक कृती ही एक अर्पण आहे आणि हा भाव किंवा वृत्ती आपल्याला सर्वशक्तिमान देवाला प्रार्थना करण्याच्या भावनेने कार्य करण्यास सक्षम करते, तसेच प्रत्येक गोष्टीपासून अलिप्ततेचा विचार ठेवते. कारण, आपला विश्वास आहे की देव हाच खरा कर्ता आहे आणि आपण फक्त त्याचे साधन आहोत, आनंदाने व व्यवस्थित कार्य करणे, हेच आपल्या हातात आहे.

ही ती मूल्ये आहेत, जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिली. स्वयंपाक करणे आणि खाणे यांसारख्या सांसारिक दैनंदिन क्रियादेखील जेव्हा आपण समर्पणाने करतो तेव्हा पवित्र बनतात. अंघोळ, स्वयंपाक, खाणे इत्यादी प्रत्येक कृतीसाठी श्लोक आहेत. आपले जीवन शेवटी एक सुंदर देऊळ बनते.संपत्ती, सामर्थ्य आणि प्रसिद्धी तुम्हाला शांती, आनंद आणि आनंदी सामाजिक जीवनाची हमी देऊ शकत नाही. परंतु, महान भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेने हे सिद्ध केले आहे. म्हणून चिंतन आणि पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.



-पंकज जयस्वाल





Powered By Sangraha 9.0