‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ला जाहीर केलेला पुरस्कार रद्द

मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांची माहिती

    13-Dec-2022
Total Views | 80

फ्रॅक्चर्ड फ्रीडम

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करणार्‍या कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम ः तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारां’तर्गत ’तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर त्यावर साहित्य क्षेत्रातून टीकेची झोड उठवण्यात आली. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने दि. ९ डिसेंबर रोजी यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम प्रकाशित केले होते. त्याचवेळी अखिल भारतीय मराठी परिषदेचे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी सदर पुरस्कार रद्द करा, अशी मागणी केली होती.

तसेच मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधत राज्य शासनाची नेमकी भूमिका काय, हेदेखील प्रकाशित केले होते. त्यानंतर आता दीपक केसरकर यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम ः तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या कोबाड गांधी लिखित पुस्तकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ’ यांनी गठीत केलेली परीक्षण समिती प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार’ देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येत होती. सन २०२१च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परीक्षण समितीकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम ः तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला होता. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही, अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मराठी भाषामंत्री दीपक केसरकर दिली होती.





 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121