लाचखोरीमुळे ‘खा’ की बदनाम

11 Dec 2022 14:35:20

नौपाडा पोलीस ठाणे 
 
 
 
 
 
 
 
ठाणे : गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप माळवे याच्याविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात अत्याचाराचे कलम न लावण्यासाठी ३५ हजारांची लाच स्वीकारणार्‍या साहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंब्रा पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. तेव्हा, ‘सदक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीद मिरवणारी खाकी लाचखोरीमुळे पुरती बदनाम होऊ लागली आहे.
 
 
 
 
नौपाडा पोलीस ठाण्यातील लाचखोरीच्या प्रकरणातील तक्रारदार ठाण्यात राहतात. त्यांच्याविरोधात एका व्यक्तीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. दुकान भाड्याने देत असल्याचे सांगत त्या व्यक्तीकडून तक्रारदाराने ३ लाख, ७५ हजार रुपये घेतल्याचे अर्जात म्हटले होते. या अर्जाची चौकशी हवालदार दिलीप माळवे यांच्याकडे होती. त्यावेळेस माळवे याने ‘तुमच्यावर ‘४२०’ कलमांतर्गत गुन्हा दाखल करतो,’ असे धमकावत गुन्हा दाखल करायचा नसेल, तर २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले.
 
 
 
या घटनेनंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याप्रकरणाची विभागाने तपासणी केली असता, कारवाई टाळण्यासाठी माळवे याने तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार माळवे याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
 
दरम्यान, मागील आठवड्यात मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अत्याचाराचे कलम न लावण्यासाठी ३५ हजारांची लाच पोलीस ठाण्यातच स्विकारणार्‍या रमेश लाहीगुडे या साहाय्यक पोलीस निरीक्षकालाही रंगेहाथ पकडले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0