मुफ्तींना लापिडचा कळवळा!

मुफ्तींना लापिडचा कळवळा!

    01-Dec-2022   
Total Views |

news
मुफ्तींना लापिडचा कळवळा!



‘इफ्फी’चा ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माता नदाव लापिड याने ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या नावाने काश्मिरी हिंदूंच्या बलिदानाची खिल्ली उडवली. लापिड हा डाव्या विचारसरणीचा इस्रायली चित्रपट निर्माता असून त्याने आतापर्यंत एकूण १३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि या लापिडकडे इस्रायलचा द्वेष करणारी व्यक्ती म्हणूनच पाहिले जाते. ‘द काश्मीर फाईल्स’ची खिल्ली उडवल्यानंतर लापिडवर टीकेची झोड उठली. परंतु, असे असतानाही जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मात्र लापिडच्या वक्तव्याचे समर्थन करत त्याला पाठिंबा दिला आहे. आता मुफ्ती यांनी लापिडला आपला पाठिंबा जाहीर करणे, यात आश्चर्यचकित होण्यासारखे काहीच नाही. मेहबूबांनी ट्विट केले की, “शेवटी कोणीतरी या चित्रपटाचे नाव घेतले, ज्याचा प्रचार सत्ताधारी पक्षाने मुस्लिमांना, विशेषत: काश्मिरींना बदनाम करण्यासाठी आणि काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांमधील दरी वाढवण्यासाठी केला होता. आता सत्य बोलून दाखविण्यासाठी मुत्सद्दी माध्यमांचा वापर केला जात आहे हे खेदजनक आहे.” केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. प्रथमच भाजपने ‘पीडीपी’सोबत सत्ता स्थापन केली होती. ‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री, तर भाजपकडे उपमुख्यमंत्री पद आले. परंतु, त्यानंतर भाजपने सत्तेवर पाणी सोडत ‘पीडीपी’ची साथ सोडली. परंतु, त्यामागे ‘३७० कलम’ रद्द करणे हा सर्वात मोठा उद्देश होता. त्यानंतर चवताळलेल्या मेहबूबा यांनी भाजपवर टीकेची एकही संधी सोडली नाही. कारण, ज्या मुद्द्यावर मुफ्तींचे राजकारण चालत आले, तो मुद्दाच भाजपने निकाली काढला. मुळात या चित्रपटाने कधीही समोर न आलेला इतिहास लोकांसमोर मांडला. त्यामुळे त्रास होणे साहजिकच. या नरसंहारासाठी आधी काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांना दोषी ठरवण्यात आले. पण, ज्यांनी शस्त्रे उचलून काश्मिरी हिंदूंची हत्या केली, त्यांच्याबद्दल कुणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. परंतु, या चित्रपटाने तब्बल तीन दशकांहून अधिक काळ लपवल्या गेलेल्या सत्याचा भांडाफोड केला. त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शनाला विरोध झाला. परंतु, समस्त हिंदूंनी हा विरोध मोडीत काढत चित्रपट ‘सुपरडुपर हिट’ केला. हीच खरी मुफ्ती आणि त्यांच्यासारख्या हिंदुत्वद्वेष्ट्यांची खरी पोटदुखी!...

पुन्हा माथी ‘हेल्मेट’सक्ती


नाशिक, ‘हेल्मेट’सक्ती आणि वाद हे समीकरण आता नवीनाही. दि. १ डिसेंबरपासून पुन्हा एकदा नाशिक शहरात दुचाकीचालकांना ‘हेल्मेट’सक्ती करण्यात आली आहे. गाडी चालवताना ‘हेल्मेट’ न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार, कारवाई होणार असून ५०० रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे आता नाशिककरांना दुचाकीवर घराबाहेर पडताना ‘हेल्मेट’सोबत बाळगणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘हेल्मेट’सक्तीचा निर्णय याआधीही घेण्यात आला. अनेकदा वेगवेगळ्या मोहिमा राबवूनही एकही मोहीम फार काळ टिकली नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त पांडे यांनी ‘जनप्रबोधनपर अभियान’राबवत मागील वर्षी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’चा आदेश काढत भरारी पथकांची नियुक्ती केली होती. ’हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही,’ अशा आदेशाने हा प्रयोग काहीसा वादात सापडला होता. त्यानंतर शहरातील शासकीय आस्थापना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयात ’हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ हा प्रयोग राबवण्यात आला. मात्र, पोलीस आयुक्त पांडे यांच्या बदलीनंतर हे अभियान थंडावले. त्यानंतर हेल्मेटसक्तीची कारवाईही थंडावली. मात्र, आता पुन्हा पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेटसक्तीची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून शहरात हेल्मेट न वापरणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. दुचाकीस्वारांना चांगल्या प्रतीचे हेल्मेट वापरणे बंधनकारक असून, थंडावलेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेला नाशिककर सहकार्य करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, वाहतूक नियम तोडणार्‍यांवर नाशिक शहर पोलिसांनी अजबगजब युक्त्या शोधून काढल्या होत्या. हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकी चालकांची परीक्षा घेणे, त्यांना प्रबोधनपर वर्गांना बसवणे अशा अनोख्या क्लुप्त्या शहर पोलिसांनी राबवल्या. परंतु, त्याने शहरवासीयांची दमछाक झाली ती वेगळी. कारण एक-दोन तासांच्या प्रबोधनपर वर्गांमुळे दुचाकीचालकाची महत्त्वाची कामे राहून जात. यामुळे पोलीस आणि दुचाकीचालकांमध्ये खटके उडत होते. नियम कितीही कठोर केला तरीही त्यातून पळवाटही शोधली जाते. त्यामुळे डोईजड होईल अशी सक्ती केल्याने त्याचा परिणाम उलट होण्याची शक्यता असते. चोर्‍या, दरोडे, खूनांचे प्रमाण वाढत असताना त्याकडेही पोलीस प्रशासनाने तितकेच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.