विनाकारण वाद

    01-Dec-2022
Total Views |

Mangal Prabhat Lodha



मंगलप्रभात लोढा यांनी अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण उद्ध्वस्त केल्यानंतर प्रतापगडावर अफझलखान वधाचे शिल्प उभारण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा वध करतानाचा ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’ सुरू करणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींचीच इच्छा यामुळे फलद्रुप होईल, अशी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा करेल?



राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवप्रतापदिनी प्रतापगडावर केलेल्या भाषणावरून विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केल्याचे दिसते. लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून झालेल्या सुटकेशी केली असून त्यातून त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, असा ‘नरेटीव्ह’ काही माध्यमांकडून चालवला जाण्याचा प्रकारही समोर आला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या कणाकणात रुजलेले आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे आणि एखाद्या विषयावर बोलत असताना, उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारले जाते, इतके ते मराठी माणसाठी एकरुप झालेले आहेत.

पण, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला म्हणजे, त्याचा अर्थ त्यांचा अवमान करण्याचा संबंधित व्यक्तीचा हेतू आहे, असे नव्हे. मात्र, उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते समजून घेण्याची प्रगल्भता नाही. म्हणून भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला की, त्याला ‘वादग्रस्त’ म्हणून त्यावरून काहूर माजवण्याचा प्रकार विरोधकांकडून केला जातो. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना त्यांच्या अनुयायांकडून, कार्यकर्त्यांकडून अनेक वर्षांपासून ‘जाणता राजा’ म्हटले जाते. खरे म्हणजे, ‘जाणता राजा’ एकच ते छत्रपती शिवाजी महाराज. तरी त्यांना दिले गेलेले संबोधन शरद पवारांसारख्या राजकारण्यासाठी वापरले जात असेल, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा उपमर्द नव्हता का? उल्लेखनीय म्हणजे, अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी उपयोगात आणले गेलेले संबोधन शरद पवारांसमोर लावले जात असताना त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. उलट उद्धव ठाकरेंपासून संजय राऊत व इतरही अनेक नेते शरद पवारांसमोर नतमस्तकच झाल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या विधानातून कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी तुलना केली नव्हती. पण, सत्ताधारी मंडळींनी काही विधान केले की, आरोपांच्या फैरी झाडायच्या हा धंदा विरोधकांकडून सुरू आहे. वस्तुतः आज मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात गळा ओकणार्‍यांची छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची भूमिका नेमकी काय होती, यावर विचार होणे आवश्यक आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना अफझलखानाच्या फौजेची उपमा दिली होती. त्याचा अर्थ काय होतो? भाजप नेते अफझलखानाची फौज असतील तर मग उद्धव ठाकरे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजत होते का? त्यांच्या विधानातून तरी तसाच अर्थ निघतो.

पण, आज मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावरून आकाश-पाताळ एक करण्याच्या कामी लागलेली माध्यमे व पत्रकार-संपादक त्यावेळी चिडीचूप होते. नजीकच्या काळातील आणखी एक उदाहरण म्हणजे, शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचे विधान. शेकडो कुटुंबांना देशोधडीला लावणार्‍या संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आली होती. 100 पेक्षा जास्त दिवस ते कोठडीत होते. त्यानंतर त्यांची सुटका झाली व शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांचे फुले उधळून, डिजे लावून वगैरे स्वागत केले. त्यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, “संजय राऊत म्हणजे माँ जिजाऊंचा हिरा!” यातून संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे व त्यांच्या मातोश्री जिजाऊ असल्याचेच सुषमा अंधारेंनी म्हटले होते.

पण, त्यावरही कोणत्याच माध्यमांनी, पत्रकार, संपादकांनी गदारोळ केला नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यावर शांतताच बाळगली होती. म्हणजे, आपल्या बाजूच्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली तर ते चालते, पण इतरांनी तुलना केली नाही, केवळ उदाहरण दिले, तरी त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो, अशी विरोधकांची भूमिका. याच संजय राऊतांनी एकदा माध्यमांसमोरच्या पत्रकार परिषदेत बोलताना आपण शिवाजी महाराजांची औलाद असल्याचे म्हटले होते. त्यातून त्यांनाही आपण छत्रपती संभाजी महाराज व आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज असल्याचेच सांगायचे होते का? पण, तेव्हा कोणीच कावकाव केली नाही. म्हणजेच, ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे’ असा प्रकार विरोधकांकडून सुरू असल्याचे दिसते. पण, यातून विरोधकांचीच असलियत जनतेसमोर येत आहे, हेही खरेच!

पुढचा मुद्दा म्हणजे, मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. पण, स्वतःला शिवभक्त, शिवरायांचे वारस म्हणवणार्‍यांनी याप्रकरणी अवाक्षरही काढले नव्हते. उलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांनी अफझलखानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने शिवछत्रपतींनी बांधल्याचा उल्लेख करत त्या कबरीचे, त्याभोवतीच्या अतिक्रमणाचे उघड उघड समर्थनच केले होते. तरी आज मंगलप्रभात लोढांच्या विधानावरून आरडाओरडा करणार्‍यांनी आव्हाडांचा निषेध केला नव्हता. त्याआधीही अफझलखानाच्या उदात्तीकरणाचा प्रकार वर्षानुवर्षे सुरूच होता.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यात मोठीच वाढ झाली. अफझलखानाच्या नावाने उरुसही भरु लागला. तरी ते उदात्तीकरण, उरुस रोखण्याची कारवाई काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली नाही. आता मात्र, मंगलप्रभात लोढा यांनी अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण उद्ध्वस्त केल्यानंतर प्रतापगडावर अफझलखान वधाचे शिल्प उभारण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा वध करतानाचा ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’ सुरू करणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींचीच इच्छा यामुळे फलद्रुप होईल, अशी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा करेल? म्हणूनच त्यांच्या विधानावरून गोंधळ माजवणार्‍यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी पोटतिडकीने काम करणारेही दूर राहण्याचा धोका दिसून येतो.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.