समाजसेवेच्या ‘संस्कारां’चा पाईक...

    01-Dec-2022
Total Views |

MahaMTB
राज्यातील १९ जिल्ह्यांत विविध क्षेत्रांत तब्बल २८ समाजशील उपक्रम-कार्यक्रम राबविणार्‍या, १००हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित ‘संस्कार प्रतिष्ठान’च्या डॉ. मोहन गायकवाड यांच्या समाजकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

डॉ. मोहन गायकवाड यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातला. पण, १९७२च्या दुष्काळात आईवडिलांबरोबर ते पुणे जिल्ह्यातील मावळमधील एका खेडेगावात स्थायिक झाले. पुढे त्यांच्या भावाने मोहन यांना सातारा येथे शिक्षणासाठी नेले. तेथून पुढे चिपळूण येथे ‘आयटीआय शिक्षक’ म्हणून मोहन यांनी कामाला प्रारंभ केला. त्यानंतर सासवड येथे नोकरी लागल्याने त्यांची पावले पुन्हा पुण्याकडे वळली. दरम्यानच्या काळात ‘टाटा’ कंपनीकडून अनेकदा नोकरीसाठी मोहन यांना विचारणा झाली. मात्र, ती नोकरी तात्पुरती असल्याने ती प्रारंभी मोहन यांनी स्वीकारली नाही. पण, मग हातात आलेली कामाची संधी सोडू नये, असा विचार करत मोहन त्या नोकरीत रुजू झाले. या कंपनीतच त्यांना खर्‍या अर्थाने समाजकार्याची आवड निर्माण झाली, ती कायमचीच!

नोकरीत आठ तासांच्या कामानंतर उरलेल्या वेळात मोहन यांनी स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतले. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ मोहन यांनी तब्बल २८ हून अधिक विविध क्षेत्रांतील सामाजिक कामांचा वसा घेतला आहे. त्या कामातून मिळालेल्या पाच सरकारी व १०० सामाजिक पुरस्कारांनी कामाचे अधिकच स्फुरण मिळत असल्याचे ते कौतुकाने सांगतात. डॉ. मोहन गायकवाड म्हणतात की, “पूर्वी काही तास सामाजिक कार्य करायचो. पण, आता दिवसाचे २४ तासही या कार्यासाठी कमी पडतात.”

‘टाटा’ कंपनीत नोकरीला असताना स्वयंसेवक म्हणून युवा संशोधक उपक्रमात मोहन यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे या सामाजिक कामातून त्यांना अधिकच आनंद गवसला. कामाचा ताण, थकवा हे सगळं काही या समाजकार्यामुळे अगदी कुठच्या कुठे पळून जातं, असं ते आजही आवर्जून सांगतात. परंतु, एवढ्यावरच न थांबता समाजकार्यातही आपल्याला आणखीन काही करता येईल का, याचा मोहन यांनी खोलवर विचार केला. त्याबाबत अनेकांशी चर्चाही केली. मग प्रारंभी घराच्या परिसरातच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यांचे मोहन यांनी आयोजन केले. या क्षेत्रातील आवड आणि कामाची जिद्द पाहू मोहन यांनी स्वत:ची समाजकार्याला समर्पित अशी संस्था सुरु करण्याचे मनाशी पक्के केले.

पोलिसमित्रांशी सक्रियपणे जोडले गेले. सण असो वा उत्सव, पोलीस बांधवांशी एकरुप होऊन ते काम करु लागले. पुढे, या कामातही अनेकांचा हातभार लागला आणि हे वटवृक्ष विस्तारत गेले. अखेरीस मोहन यांनी त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधत २००५मध्ये ‘संस्कार प्रतिष्ठान’ची स्थापना केली. प्रारंभी या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण, गरजू व अनाथ मुलांसाठी मदत आणि जनजागृती असे एकंदर कामाचे स्वरुप होते. पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सभासद असणारी ही संस्था नंतर अधिकच विस्तारत गेली. आज राज्यातील १९ जिल्ह्यांत प्रत्येक ठिकाणी ‘संस्कार प्रतिष्ठान’चा कार्यकर्ता समाजसेवेसाठी तत्पर आहे.

आज ‘संस्कार प्रतिष्ठान’च्या माध्यमातून विविध क्षेत्रांत जवळपास २८ प्रकारची कामे सुरु आहेत. तसेच कोरोनाच्या काळात तळागाळातील कामगारांसाठीही प्रतिष्ठानने विशेष मदतकार्य हाती घेतले. ‘लॉकडाऊन’ व निर्बंधांमुळे पुण्यातील कामगार, विद्यार्थी यांची होणारी आबाळ लक्षात घेता, त्यांना अन्नधान्य, जेवण पुरविण्याचा उपक्रम प्रतिष्ठानने समर्थपणे राबविला. त्या काळात जवळपास ११ हजार कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. मोहन सांगतात की, “केवळ पुण्यात काम करणारे प्रतिष्ठान इतकीच आमची ओळख होती. मात्र, ‘कोविड’ काळातील कामाच्या माध्यमातून आम्हाला इतरही जिल्ह्यांत काम करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या माध्यमांतून आम्ही काम करत गेलो. परिणामी, आज १९ जिल्ह्यांत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत आम्ही कार्यरत आहोत.”
अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना फराळ वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन, अनाथ व गरजूंबरोबर सण साजरे करणे, वृक्षारोपण, नदी स्वच्छता, वारकर्‍यांसाठी आरोग्य शिबीर यांसारखे अनेक उपक्रम दरवर्षी न चुकता प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर मद्रास येथे वादळामुळे झालेल्या हानीनंतर तेथेही एक हजार चटया, ब्लँकेट, साबण आणि सॅनिटरी नॅपकीन व औषधे प्रतिष्ठानने पाठवून संकटग्रस्तांना मदतीचा हात दिला होता.


तसेच गेल्या सात वर्षांपासून वनवासी बांधवांचा मोठा प्रकल्प प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्थानिकांसोबत आवर्जून दिवाळी साजरी करतात. या कामासाठी भारत सरकारकडून प्रतिष्ठानला ‘नेहरु युवा केंद्रा’च्या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. तसेच ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा’चा पुरस्कार, ‘गुणवंत कामगार पुरस्कार’, पिंपरी-चिंचवड महापालिका, सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन, मित्रमंडळे आणि जिल्हापातळीवर अशा १०० हून अधिक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या डॉ. मोहन गायकवाड यांना त्यांच्या पुढील समाजकार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!



- पंकज खोले
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.