शब्दांच्या विपर्यासाचे युग...

    01-Dec-2022
Total Views |

Mangal Prabhat Lodha 1


खरंतर अर्थाचा अनर्थ करणार्‍या या राजकारण्यांना जनतेनेही वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे व त्यासाठी गेल्या महिनाभरात घडलेल्या घटना पाहिल्या की त्याचे प्रत्यंतर यावे.



गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शब्दांना कात्रीत पकडण्याचा एक नवीनच धंदा अगदी जोरदारपणे सुरु झालेला दिसतो. कधी कुठल्या तरी नेत्यांची-मंत्र्यांची विधाने शब्दांच्या कात्रीत पकडली जात आहेत, तर कधी राज्यपालांची. याचे एकमेव कारण म्हणजे, शब्दांचा मूळ अर्थ समजून न घेता फक्त त्याचा अनर्थ करणे, म्हणजेच राजकारण करणे, असाच एक समज हल्ली झालेला दिसतो आणि महत्त्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या हातून राज्यातील सत्ता गेल्यानंतर या प्रकारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसते.

या प्रकाराची प्रचिती परवाच्या बुधवारी सर्वांनाच आली. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि महिला-बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर क्षेत्रात शिवप्रतापदिनानिमित्ताने प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात भाषण देत होते. प्रतापगड हा तोच किल्ला जिथे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला होता. छत्रपती शिवरायांचे हे शौर्य इतिहासात लोकप्रिय आहेच म्हणा. अफजलखान हा विजापूरचा आदिलशाहचा सेनापती होता. तसे बघायला गेले तर तो छत्रपतींपेक्षा शरीरयष्टीने मजबूत होता. हिंदवी स्वराज्याच्या ध्येयापायी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्या वाघनखांच्या साहाय्याने अफजलखानाचे पोट फाडून त्याचा कोथळाच बाहेर काढला. अफजलखानाला मारल्यानंतर त्याचं डोकं तोफेने तर उडवलचं, पण त्याचे धड प्रतापगडाच्या पायथ्याशी पुरले, जिथे त्याला ठार केले होते.


अफजलखानाच्या वधानंतर तीन शतकं तिथे काहीही झालं नाही. पण, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथे अफजलखानाच्या कबरीचे रूपांतर हळूहळू मकबर्‍यात व्हायला लागले. कॉँग्रेस सरकारच्या कार्यकाळात तर अफजलखानाच्या कबरीच्या आजूबाजूला चक्क सौंदर्यीकरण करण्यात आले. कबरीच्या वर भला मोठा मंडप उभारला गेला. तिथे काही मौलवीसुद्धा वास्तव्यास होते. ही कबर प्रतापगडाला जाताना वाटेतच असल्यामुळे पर्यटकांच्या नजरेस पडत होती आणि महत्त्वाचे म्हणजे, तिथे राहणारे मौलवी छत्रपतींच्या शौर्याचे किस्से न सांगता, त्या अफजलखानाचे किस्से ऐकवू लागले होते. हे सर्व त्याच सरकारच्या कार्यकाळात घडत होते, जेव्हा ’मराठ्यांचे कैवारी आम्हीच’ या अविर्भावात धुंद असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत वाटेकरी होता.


अफजलखानाच्या कबरीसमोर या अश्लाघ्य, बेकायदेशीर गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत होत्या, त्याचाच विरोधात स्थानिक नागरिकांनी केला. त्यांनी उच्च न्यायालयात कबरीच्या आजूबाजूच्या अनधिकृत बांधकामांविरोधात दाद मागितली. उच्च न्यायालयानेही या विषयाची गांभीर्याने दखल घेत, निर्णय देताना तातडीने अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. पण, अनेक कारणांमुळे या न्यायालयाच्या निर्णयाचेही पालन केले गेले नाही. पण, जेव्हा राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तारुढ झाले, तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा फौजफाटा तैनात करत त्या कबरीच्या बाजूचे अतिक्रमण जमीनदोस्त करून टाकले. आतापर्यंत या अतिक्रमणाचे मूकसमर्थन करणारे राजकीय पक्षसुद्धा या कारवाईच्या निमित्ताने सरकारचे समर्थनही करताना दिसले नाही. पण, आज हीच मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या कोणत्याही गोष्टी, विधाने यांना पकडून अर्थाचा अनर्थ करण्यात धन्यता मानताना दिसतात.


बुधवारीसुद्धा अशाच एका गोष्टीचा विपर्यास करण्यासाठी विरोधक एकवटलेले दिसले. महाराष्ट्रात अफजलखानाचा वध म्हणून ‘शिवप्रताप दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो (तिथीच्या भ्रमापायी काही लोक शिवप्रताप दिन हा 10 नोव्हेंबरला साजरा करतात, तर काही दि. 30 नोव्हेंबरला). पण, राज्य सरकारच्यावतीने प्रतापगडावर यंदा दि. 30 नोव्हेंबर रोजी 363वा शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमवेत अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले गड-किल्ले व दुर्गांना सुरक्षित करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही केली.

सोबतच विशेष स्वरूपात प्रतापगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी व सौंदर्यीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा प्रस्तावदेखील ठेवला. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्वरित 25 कोटी रुपये पर्यटन मंत्रालयामार्फत देण्याचे जाहीर करून टाकले व ते यावेळी बोलताना म्हणाले की, “जिथे अफजलखानची कबर आहे तिथे अफजलखानाचा कोथळा काढतानाचे छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा उभारण्यात येणार आहे.” भाषण चालू असताना ते सहजपणे म्हणाले, “ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून गनिमीकावा करून निसटले होते, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा त्याच पद्धतीने निसटले.”


झाले.... लोढा यांच्या एवढ्याच विधानाचा विरोधकांनी विपर्यास केला व बोंबाबोंब करायला सुरुवात केली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवरायांसोबत केली, असे अतार्किक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, त्यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेली नाही. त्यांनी तर फक्त आग्र्यात एक घटना घडली, त्याची बरोबरी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली त्यासोबत केली. पण, शेवटी शब्दांचा विपर्यास करणार्‍यांचे कोणीच हात पकडू शकत नाही किंवा त्यांचे तोंडही बंद करू शकत नाहीच म्हणा!


खरंतर अर्थाचा अनर्थ करणार्‍या या राजकारण्यांना जनतेनेही वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे व त्यासाठी गेल्या महिनाभरात घडलेल्या घटना पाहिल्या की त्याचे प्रत्यंतर यावे. महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकारने तर अफजलखानाचे गोडवे गाणार्‍यांना त्याच्या कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करुन सणसणीत चपराक लगावलीच. शिवाय शिवरायांची ही महती, त्यांचा हा ऐतिहासिक पराक्रम अधोरेखित करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रतापगडावर 100 कोटी रुपये खर्च करण्याची योजनादेखील आखली. या कृतीतून राज्य सरकारने जे राजकारणी फक्त शिवरायांच्या नावावर फक्त गेली कित्येक वर्षे राजकारणच करत होते, त्यांना तर जोरदार उत्तर दिले. याच सर्व गोष्टी विरोधकांच्या मात्र पचनी पडलेल्या दिसत नाही. महात्मा गांधी यांनी रामराज्याचा गोष्टी केल्या, तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाही सरकारची संकल्पना मांडली. पण, त्यांच्या अशा बोलण्याने भगवान रामाची तुलना छत्रपती शिवरायांसोबत कधीही झाली नाही. मग त्याचप्रकारे शिवरायांच्या आदर्श विचारधारेचा प्रत्यक्ष कृतीतून अवलंब करणं हा शिवरायांचा अपमान कसा काय होऊ शकतो?



- आचार्य पवन त्रिपाठी
(लेखक मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.