आजपासून ‘गोवर’साठी विशेष लसीकरण

01 Dec 2022 16:17:06
गोवर
 
 
 
 
 
 
 
मुंबई : ‘गोवर’ संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, मुंबईत गुरुवार, दि. 1 डिसेंबरपासून मोहिमेला सुरुवात होत आहे.
 
 
 
केंद्राने दि. 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे ‘गोवर’-‘रुबेला’च्या लसीचे विशेष लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील 33 आरोग्य केंद्रांमधील नऊ ते पाच वर्ष वयोगटातील तब्बल 1 लाख, 34 हजार, 833 बालकांना ‘गोवर’-‘रुबेला’च्या लसीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे.
 
 
 
तसेच, नऊ महिन्यांपेक्षा कमी वय असणार्‍या आणि ‘गोवर’ संसर्गाचे दहा टक्के प्रमाण असणार्‍या 3 हजार, 496 बालकांना ही विशेष मात्रा देण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. एकूण 53 लाख, 66 हजार, 144 घरांचे सर्वेक्षण झाले असून ताप आणि अंगावर पुरळ येणार्‍या रुग्णांची संख्या ही चार हजारांच्या पार गेली आहे. तसेच, ताप आणि अंगावर पुरळ येणार्‍या रुग्णांना ’अ’ जीवनसत्त्वाच्या दोन मात्र या 24 तासांच्या अंतराने देण्यात येत असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
 
 
 
‘गोवर’ संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण पूर्ण होणे सर्वांत महत्त्वाचे असून ज्या प्रभागांमध्ये संसर्गाचा उद्रेक होत आहे, तेथे लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. ‘गोवर’ संसर्ग हा राज्यातील ग्रामीण भागांसह शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ‘गोवर’च्या लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना समजणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेकडूनही विविध माध्यमांतून जनजागृती करत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 15 गोवर रुग्णांचे निश्चित निदान झाले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0