सेवानिवृत्त 'अग्निवीर' भारतीय संरक्षण उद्योगांमध्ये सक्रिय होणार

    01-Dec-2022
Total Views |

नवी दिल्ली
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलांमधील 'अग्निवीरांचा' कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी खासगी संरक्षण उत्पादन उद्योगांच्या प्रतिनिधींसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
 
 
संरक्षण मंत्रालयातर्फे उद्योगांच्या कॉर्पोरेट भरती योजनेअंतर्गत हे सत्र आयोजित करण्यात आले होते. त्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने हे होते. त्याचप्रमाणे एल अँड टी, अदानी डिफेन्स लिमिटेड, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड, अशोक लेलँड आणि इतर आघाडीच्या भारतीय संरक्षण उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला होता. 'सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स'तर्फे या बैठकीसाठी पुढाकार घेण्यात आला होता.
 
 
 
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सैन्यदलांसोबतच्या कार्यकाळामध्ये 'अग्निवीरांनी' आत्मसात केलेल्या कौशल्यांचा लाभ उद्योगांना होणार आहे. सैन्यदलांमध्ये कार्यरत असलेल्या 'अग्निवीरांना' संरक्षण कौशल्यांसह व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि अन्य प्रशिक्षण प्राप्त होणार आहे. त्यामुळे सैन्य दलांतील 'अग्निवीरांचा' कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या कौशल्यांचा लाभ प्रामुख्याने संरक्षण उद्योगांना करता येणार आहे.
 
 
 
 
त्यांचा समावेश उद्योगांमध्ये करण्यासाठी संरक्षण उद्योगांनी उत्सुकता दर्शविली असून पहिल्या तुकडीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची भरती विविध उद्योगांद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी या उद्योगांनी 'अग्निवीरांसाठी' कॉर्पोरेट भरती योजनेअंतर्गत लवकरच धोरणाची घोषणा करावी, असे आवाहन केंद्रीय संरक्षण सचिवांनी केले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.