गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या बोर्डाच्या धर्तीवर एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ

२४व्या वर्षात पदार्पण ; ९७०० विद्यार्थ्यांचा सहभाग, ७२ शाळा; २७ केंद्रे, तीन भाषा माध्यम

    01-Dec-2022
Total Views |

गणेश नाईक
 
 
 
 
 
 
नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती दूर करून दहावीच्या मुख्य परीक्षेत त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविणारी श्री. गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एसएससी बोर्डाच्या धर्तीवर आयोजित श्री. गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ ३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी दीड वाजता तेरणा मेडिकल डेंटल कॉलेज ऑडिटोरियम, सेक्टर २४ , नेरूळ येथे होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे सचिव आणि ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
 
 
या उपक्रमाचे मुख्य समन्वयक अनंत सुतार, प्राचार्य प्रताप महाडिक, ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र म्हात्रे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाची सुरुवात, आजवरची प्रगती आणि भविष्यातील योजनांविषयी संदीप नाईक यांनी प्रसिद्ध माध्यमांशी संवाद साधला. दरवर्षी दहा ते पंधरा लाख विद्यार्थी एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असतात. या परीक्षेचे महत्त्व पाहता एक प्रकारचे दडपण आणि भीती बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मनात असते.‌ त्यामुळे त्यांच्या मनातील ही भीती नाहीशी करून आत्मविश्वास भरण्यासाठी आम्ही एसएससी सराव परीक्षेचा उपक्रम लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रेरणेने सुरू केला.
 
 
 
 
24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1998 साली एसएससी सराव परीक्षेची सुरुवात ऐरोली येथे झाली. सुरुवातीला दोनच केंद्रे होती. साधारणपणे 500 ते 600 विद्यार्थी परीक्षेला बसायचे. आज या परीक्षेला दरवर्षी सरासरी नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान विद्यार्थी बसतात.
 
 
 
 
आतापर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. यावर्षी ३ डिसेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये सराव परीक्षा पार पडणार आहे. यावर्षी ९७०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे. मागील वर्षी ९५०० विद्यार्थी बसले होते. यावर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत, परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील वर्षी २५ परीक्षाकेंद्र होती. यावर्षी ती २७ झाली आहेत. नवी मुंबईतील सर्वच विभागातून तब्बल ७२ शाळांचा यावर्षी सहभाग असणार आहे.
 
 
 
 
महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या एसएससी सराव परीक्षा या एक किंवा दोन भाषा माध्यमातून होतात परंतु नवी मुंबईतील सराव परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा माध्यमातून घेतली जाते. एसएससी बोर्डप्रमाणे हॉलतिकीट, परीक्षा केंद्रे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्या तपासणे अशी सर्व कामे तज्ञ शिक्षकांमार्फत केली जातात. अशाप्रकारे व्यापक स्वरूपात सराव परीक्षेचा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असावा.
 
 
 
 
एसएससी सराव परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत देखील गुणवत्ता यादीमध्ये झळकतात हा आजवरचा अनुभव आहे.‌ या सराव परीक्षेच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना विषयानुरूप ते कुठे कमी पडत आहेत, उत्तरांमधील उनिवा काय आहेत, या बाबी समजतात. त्यामध्ये विद्यार्थी सुधारणा करतात. आणि अधिक आत्मविश्वासाने मुख्य परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादित करतात.
 
 
 
 
एसएससी सराव परीक्षेमुळे नवी मुंबईच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी देखील वाढल्याचे शिक्षक सांगतात. बघता-बघता एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने 24 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून पुढील वर्षी हा उपक्रम रजत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. याचा आम्हाला विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन संदीप नाईक यांनी केले.
या उपक्रमाच्या सफलतेसाठी परिश्रम करणारे गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य, पदाधिकारी, नवी मुंबईतील विविध शाळा, विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक अशा सर्व घटकांना सहकार्यासाठी संदीप नाईक यांनी धन्यवाद दिले.
 
 
 
सराव परीक्षा ॲप
 
 
 
श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी देखील विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक ॲप भेट देण्यात येणार आहे. या ॲपमध्ये हजारो प्रश्नपत्रिका असून त्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांना करता येईल. याशिवाय व्हिडिओ ट्युटोरियल आहे. अभ्यासाचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
 
 
 
उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी
 
 
 
परिस्थिती अथवा काही कारणास्तव विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी वेळेवर नावनोंदणी करता आली नाही. किंवा विद्यार्थी उशिराने नाव नोंदणीसाठी आले तरी त्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे त्यांच्यासाठी ट्रस्टच्या वतीने नाव नोंदणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी करायची आहे. त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
 
 
 
९२२१२६७८०१/९९२००२८५२५/८३६९९७७१२५
एसएससी सराव परीक्षेच्या माध्यमातून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील प्रायोगिक तत्त्वावर ही परीक्षा सुरू करण्याचा मानस आहे.
 
 
- संदीप नाईक, सचिव ( श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट)
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.