आव्हाडांच्या मस्तवालपणाला जगात इलाज नाहीच!

09 Nov 2022 12:12:07


आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून महिलेच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न!
ठाणे : स्त्री दाक्षिण्य तसेच महिलांप्रती आदर दाखवण्याचे उपदेशाचे डोस जगाला पाजणारे राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या कार्यकर्त्याच्या प्रतापांनी चांगलेच अडचणीत आले आहेत. चित्रपटगृहात घडलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कुणीही ऐरा गैरा येईल, आणि चित्रपट बंद पाडेल. असा जाब विचारत तिकिटाचे पैसे परत मागितले म्हणुन आठ ते १० जणांनी पत्नीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिकार केल्याने आपणास मारहाण केल्याचे पोखरण रोड येथे राहणारे तक्रारदार परिक्षित दुर्वे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडफोड केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री झुंडशाहीचे दर्शन घडवत ठाण्यातील व्हीवियाना मॉलमध्ये हर हर महादेव या मराठी चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यानी प्रेक्षकांना मारहाण केल्याने वर्तकनगर पोलिसांनी आ.जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवुन दंगल माजवत चित्रपटाचा शो बंद पाडल्याचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान,माजी मंत्री राहिलेल्या आ. आव्हाड यांनी यापूर्वीही ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे याला आपल्या बंगल्यात नेऊन बेदम मारहाण केली होती. त्यामुळे प्रेक्षकाला मारहाण करणाऱ्या आव्हाड यांच्यावर सोशल मिडियात टिकेची झोड उठली आहे.

ठाण्याच्या विवियाना मॉल मध्ये आमदार जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे कार्यकर्ता यांनी हर हर महादेव चित्रपट शो बंद पाडला. हर हर महादेव हा शो सोमवारी रात्री १० वाजता सुरू होता. शो सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सोबत स्वतः आव्हाड यांनी प्रेक्षागृहात घुसून शो बंद पाडला. यावेळी प्रेक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये तिकिटाचे पैसे परत देण्यावरून वाद झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला धक्काबुक्की करून मारहाण केली.या प्रेक्षकासोबत असलेल्या महिलेलाही यावेळी धक्काबुक्की झाली.इतिहासाची तोडफोड सहन केली जाणारं नाही, काहीही करून इतिहास बदलण्याचे प्रयत्न सुरू असून ते आम्ही हाणुन पाडल्याशिवाय राहणार नाही. असे यावेळी आव्हाड यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या या हाणामारीनंतर, मनसेच्या अविनाश जाधव यांनी व्हीवियाना मॉलमध्ये कार्यकर्त्यासह धाव घेत पुन्हा हर हर महादेव चा शो सुरु करून चित्रपट पाहिला. दरम्यान, प्रेक्षक परिक्षित विजय दुर्वे यांच्या फिर्यादीवरून वर्तकनगर येथील पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यावर भादवि 141,143, 146,149,323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमानुसार बेकायदेशीर जमाव जमवुन चित्रपटाचा शो बंद पाडणे,दंगल माजवणे, तसेच प्रेक्षकांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सदाशिव निकम यांनी दिली.
आव्हाडांची ही कुठली संस्कृती - मनसे
आ. आव्हाडांच्या झुंडशाही बाबत मनसेचे अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देताना, “चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारझोड करणं हे कोणत्या संस्कृतीला धरून आहे? तुम्ही नेहमी संस्कृतीच्या गोष्टी करता ना? ही कुठली तुमची संस्कृती होती? चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारणं हे तुम्हाला कोणी शिकवलं?” या शब्दांत जाधव यांनी संताप व्यक्त केला. तसेच, मंगळवारी सायंकाळी दर्शकांसाठी हर हर महादेव या चित्रपटाचा मोफत शो दाखवुन एकप्रकारे आव्हाड यांनी राष्ट्रवादीलाच आव्हान दिले.
Powered By Sangraha 9.0