न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ!

    09-Nov-2022
Total Views |
dhanjay

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये बुधवारी सकाळी १० वाजता झालेल्या एका समारंभात डॉ. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथविधी पार पडला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.


देशाचे ५० सरन्यायाधीश म्हणून डॉ. न्या. धनंजय चंद्रचूड यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली.न्या. चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. त्यांनी १९८२ साली दिल्ली विद्यापीठातून एलएलबी आणि १९८३ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केले. त्यापूर्वी १९७९ साली त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज येथून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1986 मध्ये हार्वर्डमधून डॉक्टर ऑफ ज्युरीडिकल सायन्सेस (एसजेडी) पदवी प्राप्त केली.



त्यांची २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होईपर्यंत त्यांनी तेथे काम केले. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झाली.




तेव्हापासून त्यांनी अनेक उल्लेखनीय निवाडे लिहिले आहेत ज्यात सत्ताधारी व्यवस्थेविरुद्ध मतमतांतरे आहेत. नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठातील ते एकमेव असहमत न्यायाधीश होते ज्यांनी आधार कायदा वित्त विधेयक म्हणून संमत होण्यासाठी घटनाबाह्य ठरवला होता. न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कोर्ट समितीने भारतातील न्यायालयीन कामकाजाच्या थेट-प्रवाहासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, विशेषत: अशा वेळी जेव्हा सुनावणीवर करोना साथीच्या रोगाचा वाईट परिणाम झाला होता.