आनंदी राहा. ही खूप छान भावना आहे. जर आपण सर्वांनी काळजी करणे थांबवले आणि आनंदी राहणे निवडले, तर ती खूप मोठी आश्चर्यकारक, पण प्रसन्न गोष्ट आहे.
नवी व्यवहाराची मूलभूत धारणा अशी आहे की, लोक आनंदाचा पाठलाग करणे पसंत करतात आणि वेदनेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, तर मग, काही माणसे त्यांच्या दुःखात रमण्यात समाधान मानत आहेत. आपले दुःख कसे एक प्रकारचे मानाचे चिन्ह आहे, अशी फुशारकी मारत असतात. त्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना संधी मिळाली तरीसुद्धा ते सतत रडगाणे गात राहणे पसंत करताना दिसतात.
असमाधानी असण्यात कधी कधी एक प्रकारची सोयीस्कर जाणीव असते का, जी बदलताना व्यक्तीला बेचैन बनवते. आनंदाची एक झलक मिळाल्यावर, काही लोक पुन्हा एकदा दुःखाच्या पाढ्याची उजळणी का करायला लागतात. का पुन्हा नकारार्थीचा सूर लावतात? दुःख ही एक तात्पुरती भावनिक अवस्था आहे, ज्याचे एक स्पष्ट कारण असते. उदाहरणार्थ, मोठी निराशा, आपल्या प्रिय व्यक्तीचे नुकसान किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल वाईट बातमी मिळणे.अशा प्रकारच्या प्रसंगातून येणारे दुःख कमी-जास्त होऊ शकते. काही मर्मभेद क्षणांमध्ये, भावनिक ओझे विशेषतः जड वाटू शकते. तुम्ही अनेकदा मनातून रडत असता, सुन्न असता किंवा तुम्हाला अगदी ग्लानी आल्यासारखे वाटू शकते.
पुन्हा आपले लक्ष सुखदायक गोष्टींकडे केंद्रित करण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट दिवस पुन्हा पुन्हा येत असतात. जोडीदारासोबत वेदनादायक वाद होतो. प्रिय पाळीव प्राणी गमावतो. प्रचंड आर्थिक नुकसान होते आणि इतर दैनंदिन निराशा-आपल्याला भयंकर वाटू शकते. पण, दुःख ही एक सामान्य भावना आहे, जी कालांतराने नाहीशी झाली पाहिजे. परंतु, जेव्हा ती उदासीनता फार काळ पिच्छा सोडत नाही, तेव्हा नैराश्याचा धोका क्षितिजावर दिसू शकतो. दु:खी वाटणे आणि ते कुठून येत आहे, हे समजून घेणे सामान्य आहे. कधीकधी या आपल्या बालपणापासून खोलवर रुजलेल्या आठवणी असतात किंवा अशी एखादी वेदनादायक परिस्थिती असते, जी कदाचित तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जाणिवेतून अडवली असेल.
जरी दुःखी असण्याने तुम्हाला निराश वाटत असेल, जरी ते मनाला सुन्न करणारे असले, तरी माणसाने वेळोवेळी दुःखी होणे ठीक आहे. प्रत्येक मनुष्याला अनेक प्रकारच्या भावनांचा अनुभव येतो आणि दुःख हे त्यापैकी एक आहे. काहीवेळा आपल्याला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय खिन्नता आणि निरस वाटते. काहीवेळा जेव्हा सर्व काही ठीक चाललेले असते, तेव्हा कारणाशिवाय मनी रिक्तपणाची भावना असते.
प्रत्येकाने स्वतःला कधी कधी एक प्रश्न विचारायला हवा की, आपल्याला कशामुळे आनंद होतो?क्षणभर थांबा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात, याचा विचार करा. क्षणभर ‘आनंदी’ ही संकल्पना आपण विसरून जाऊ वा सोडून देऊ. तुम्ही कशात रमत जाता? तुम्हाला काय करायला आवडते? तुम्हाला भावणारे काही छंद कोणते आहेत? या सगळ्या गोष्टी आठवणे खरेच कौतुकास्पद आहे. लक्षात ठेवा की, या जगात प्रत्येकाची परिस्थिती तशी वेगळी असते. परंतु, जर तुमच्या मनात मी कधीच आनंदी का नाही? असा प्रश्न येत असेल, तर जीवनात मिळणार्या अनेक मूलभूत गोष्टींचा विचार करा, ज्यासाठी तुम्ही खरेतर देवाचे मनापासून खूप आभार मानायला हवेत.
आपल्याकडे निवारा, भरपूर अन्न, वस्त्र, चांगले शिक्षण, चांगले काम, चांगले पालक, चांगले मित्र, आवडते पाळीव प्राणी, सुरक्षितता, विश्वास, उत्तम आरोग्य यापैकी अनेक गोष्टी आहेत. यांच्यापासून जगातले अनेकजण वंचित आहेत. बरेच लोक त्यांचे शुभाशीर्वाददेखील ओळखतात. परंतु, स्वतःचे मूर्ख, अनाडी, लाजिरवाणे, त्रासदायक, दुर्दैवी असे वर्णन करतात. या विशेषणांमध्ये अडकून राहणे, व्यक्तीसाठी अत्यंत निराशाजनक असू शकते. अशा विनाकारण दुःखाची काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे ओळखता येतात.
उत्साहाचा अभाव : तुमचे काम आता तुम्हाला प्रेरित करत नाही का? तुम्ही त्यात समाधानी नाही आहात का? जर तुमचे आयुष्य तुम्हाला नीरस भासत असेल, तर ते तुमच्या कंटाळवाणेपणाचे आणि पोकळ वाटणार्या भावनेमागील कारण असू शकते. सगळं काही ठीक चाललेले असतानाही येणार्या उद्याकडे पाहण्यासारखं तुमच्याकडे काहीही नसल्यामुळे आणि तुमचं काम करण्याचा उत्साह तुम्ही गमावल्यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकतं. त्यामुळे काहीतरी नवीन शिकण्याची आणि नवनूतन आव्हान स्वीकारण्याची हीच वेळ आहे.
एकाच वेळी खूप काही करणे : आनंद मिळविण्यातील आणखी एक अडथळा म्हणजे खूप वेगाने अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करणे. महत्त्वाकांक्षी असणे आणि यशस्वी होण्यासाठी प्रवृत्त होणे, खूप चांगले आहे. तथापि, एका वेळी एक पाऊल उचलायला पाहिजे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण एकाच वेळी सर्वकाही करू शकत नाही. आपण सगळे आज एका वेगवान जगात राहत आहोत, जिथे आपल्यावर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वाभाविकपणे दबाव येत असतो. आपण सर्वकाही चुटकीसरशी नॅनो सेकंदांमध्ये करण्याची अपेक्षा करतो.
गोष्टी झटपट पूर्ण करणे, हे वास्तववादी नाही. लक्षात ठेवा की, यश मिळवण्यासाठी वेळ लागतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयांवर टप्प्याटप्प्याने काम करू शकता. काळजी करू नका. आनंदी राहा. ही खूप छान भावना आहे. जर आपण सर्वांनी काळजी करणे थांबवले आणि आनंदी राहणे निवडले, तर ती खूप मोठी आश्चर्यकारक, पण प्रसन्न गोष्ट आहे. परंतु, काही लोकांसाठी ते इतके सोपे नाही. आपल्या सर्वांना आनंद मिळवण्याची इच्छा असते, तरीही काही वेळा ते अप्राप्य असल्याचे दिसून येते. (क्रमशः)
-डॉ. शुभांगी पारकर