मुंबईचा रंग बदलण्याचे ठाकरेंचे प्रयत्न; आ. आशिष शेलार यांचा घणाघात

07 Nov 2022 17:50:17



मुंबईचा रंग बदलण्याचे ठाकरेंचे प्रयत्न; आ. आशिष शेलार यांचा घणाघात
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर भाजपकडून ठाकरे गटावर सातत्याने टीकास्त्र सोडले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपकडून रविवारी ’जागर मुंबईचा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ठाकरेंच्या ‘मातोश्री’च्या अंगणातून अर्थात या अभियानाला आ. आशिष शेलार आणि खा. पूनम महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली असून भाजप नेत्यांनी वांद्रे पूर्वच्या या सभेतून ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
रविवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी वांद्रे पूर्वच्या सरकारी वसाहतीतील ‘पीडब्ल्यूडी’ मैदानावर या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन, मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आमदार आशिष शेलार, ’जागर मुंबई’चा अभियानाचे प्रमुख आमदार अतुल भातखळकर, विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी, उत्तर मध्य मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष सुषम सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि मुंबईकर प्रचंड संख्येने उपस्थित होते.

उद्धवजी, तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे?
उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना आ. आशिष शेलार म्हणाले की, “राज्यात अडीच वर्षांची सत्ता भोगल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची सत्ता बळकाविण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईत धार्मिक तुष्टीकरण करण्याला सुरुवात केली आहे. पण, आम्ही ठामपणे सांगतो ना मराठी, ना मुस्लीम उद्धवजींना मते देणार नाहीत. सलग 25 वर्षे तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत? एकही विकासकाम केल्याचे सांगता येत नाही, म्हणून मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी रडीचा डाव खेळण्याची सुरुवात करण्यात येत आहे. उद्धवजी, तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे?” असा थेट सवाल ‘जागर मुंबईचा’ या सभेतून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

दि. 22 ऑक्टोबर रोजी ‘सामना’ दैनिकातून मराठी-मुस्लीम अशी दुही निर्माण करणारी बातमी देण्यात आली होती. या बातमीवरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लांगूलचालन करण्याच्या राजकारणाचा समाचार घेताना आशिष शेलार म्हणाले की, “आमच्या कोकणातील मराठी-मुस्लीम बांधव आजपर्यंत कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते सर्वांसोबत सणउत्सवात सुख-दु:खात मिळून मिसळून राहतात मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय?” असा थेट सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
Powered By Sangraha 9.0