बांगलादेश क्रिकेटचा हिंदू शेर...!

06 Nov 2022 20:46:32
Liton Das


 
 
सध्या ‘टी २०’ विश्वचषकाची धूम सुरू आहे. विश्वचषकात भारताचा सामना बांगलादेशसोबत झाला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर पाच धावांनी मात केली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशनेही चांगली झुंज दिली. बांगलादेशचा अगदी थोडक्यात पराभव झाला. परंतु, बांगलादेशचा फलंदाज लिटन दासने या सामन्यात २७ चेंडूमध्ये तब्बल ६० धावा काढल्या. भले बांगलादेशने सामना जिंकला नाही, परंतु, लिटन दासच्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले. विजयाच्या समीप असताना दास धावबाद झाल्याने बांगलादेश जिंकू शकला नाही. विजय भारताचा झाला, तरीही लिटन दास समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरल्याने दास नेमका कोण आहे, असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
 
 
फार कमी जणांना माहिती असेल की, लिटन हा भगवान श्री कृष्णाचा निस्सिम भक्त आहे. दास स्वतःला कृष्णाचा सेवक मानतो, जे त्याने आपल्या ‘इन्ट्राग्राम’च्या ‘बायो’मध्येदेखील लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, “जीवनात कधीही हार मानायची नाही. कारण, एका मोठ्या वादळानंतर नेहमीच इंद्रधनुष्य येत असते.” त्याचबरोबर त्याने श्रीकृष्णाचा सेवक आणि प्राण्यांशी प्रेम करणारा, असेदेखील नमूद केले आहे. २८ वर्षीय लिटन दास हिंदू असून त्याचा जन्म दि. १३ ऑक्टोबर, १९९४ साली बांगलादेशातील दिनाजपूरमध्ये झाला.
 
 
त्याने बांगलादेशसाठी आतापर्यंत ३५ कसोटी, ५७ एकदिवसीय आणि ६४ आंतरराष्ट्रीय ’टी-२०’ सामने खेळलेले आहे. यादरम्यान त्याने आतापर्यंत कसोटीत २ हजार, ११२, एकदिवसीय सामन्यात १ हजार, ८३५ आणि ‘टी-२०’मध्ये १ हजार, ३७८ धावा काढल्या आहेत. मुळात हा झाला त्याचा वैयक्तिक परिचय. परंतु, मुस्लीमबहुल देशात जन्म घेऊन आणि तेथील क्रिकेट संघासाठी खेळतानाची खिलाडूवृत्ती यामुळे दास कौतुकास पात्र आहे. मुस्लीम प्राबल्य असलेल्या बांगलादेशातही त्याने आपली हिंदू म्हणून असलेली ओळख कायम ठेवली, हे मात्र विशेष.
 
 
बांगलादेशातच काय, परंतु इतर कोणत्याही देशात राहताना अनेकदा तेथील अल्पसंख्याकांना त्या-त्या देशातील बहुसंख्येने असणार्या धर्माच्या लोकांशी, त्यांच्या परंपरा, चालीरीती यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. परंतु, बांगलादेशात राहूनही लिटन याने मात्र आपल्या हिंदू असण्याचा अभिमान बाळगत देशासाठी खेळण्यास प्राधान्य दिले. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशाचीही परिस्थिती फार काही आलबेल आहे, असे मुळीच नाही. बांगलादेशातही हिंदू मंदिरांची, देवदेवतांच्या मूर्तींची तोडफोड तसेच हिंदूंवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतात.
 
 
त्यामुळे बहुसंख्य मुस्लिमांकडून हिंदूंना कितीही घाबरवण्याचा प्रकार केला, तरीही हिंदुत्वाचा अभिमान म्हणजे काय हे लिटनकडे पाहून समजते. मुस्लीमबहुल देशात राहूनही त्याने आपली विचारधारा आणि हिंदू असल्याचा अभिमान नेहमी जपला आहे. परंतु, त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली. यंदाच्या नवरात्रीदरम्यान त्याने समाजमाध्यमांवर दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या. त्यावरही त्याला टीकाटीप्पणी सहन करावी लागली. अनेकांनी त्याला धर्मपरिवर्तन करण्याचा सल्ला दिला.
 
 
बांगलादेशात राहूनही हिंदू सण-उत्सवाच्या शुभेच्छा देणे अनेकांना रूचले नाही. त्यामुळे दास मोठ्या प्रमाणावर ‘ट्रोल’ झाला होता. त्याला अनेकांनी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. दरम्यान, याआधीही त्याने समाजमाध्यमांद्वारे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हाही त्याला प्रचंड ‘ट्रोलिंग’चा सामना करावा लागला होता. ‘ट्रोलिंग’ आणि धमकी देणार्यांमध्ये सर्वात जास्त कट्टरपंथीच आघाडीवर असतात. तसेच, सौम्य सरकार हा हिंदू क्रिकेटरही बांगलादेशसाठी खेळतो.
 
 
बांगलादेशात हिंदूवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येतात. अशा परिस्थितीतही लिटन विशिष्ट धर्मीयांच्या दबावाला तसेच कट्टरपंथीयांच्या धमक्यांना बळी न पडता बांगलादेशात हिंदूंची ओळख आणि ताकद अधोरेखित करत आहे. हिंदू असूनही त्याने बांगलादेशासाठी खेळताना आपली सर्वोत्तम खेळी करण्याचा प्रयत्न केला. देश कोणताही असो. परंतु, स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगून आपण ज्या मातीत जन्म घेतला, त्या मातीशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ कसे राहावे, याचा पाठच लिटन दासने दाखवून दिला आहे. खर्या अर्थाने लिटन दास बांगलादेश क्रिकेटचा हिंदू शेर म्हणावा लागेल.
 
Powered By Sangraha 9.0