कै. वि. श्री. जोशी यांची माहिती मी या सदरात पूर्वी दिली आहेच. मुंबई येथे वास्तव्य असलेले जोशी यांनी आपल्या आयुष्याची सुमारे 50 वर्षे केवळ क्रांतिकारक या एकाच विषयाचे संशोधन आणि लेखन यासाठी वाहिली होती. त्यांच्या या अथक परिश्रमातून अनेक अज्ञात क्रांतिकारकांची नावे लोकांना माहीत झाली - त्यांची इतिहासात कागदोपत्री व्यवस्थित नोंद झाली. क्रांतिकारी चळवळीवर इंग्रजांची कडक नजर असल्याने ती अतिशय गुप्तपणे चालविली जायची. त्यामुळे त्यात गुंतलेले कार्यकर्ते स्वत:ची नावे गुप्त तरी राखत किंवा दुसर्याच नावाने काम करत असत. त्यामुळे याबाबतचे संशोधन करणे खूपच कष्टाचे काम होते. पण जोशी यांनी ते करून एकूण 15 ग्रंथांचे लेखन केले. त्यापैकी तीन पुस्तके म्हणजे स्वा. सावरकरांचे तीन खंडात लिहिलेले चरित्र आहे. त्यांची माहिती या सदरात आधी दिलेली आहेच. उरलेल्या 12 पुस्तकांची शीर्षके अशी आहेत - 1) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, 2) मृत्युंजयांचा आत्मयज्ञ, 3) कंठस्नान आणि बलिदान, 4) वडवानल, 5) अग्निपथावरील परागंदा, 6) वणवा हिंद देशीचा, 7) प्रलयातील पिंपळपाने, 8) झाशीची राणी लक्ष्मीबाई , 9) शृंखला खळाखळा तुटल्या, 10) क्रांतिकारकांच्या 202 साहसकथा, 11) ज्वालामुखीचे अग्निनृत्य आणि 12) पूर्णाहुती आणि वाताहात. यापैकी पहिल्या पुस्तकाचा इंग्रजीमध्येही अनुवाद झाला आहे. जोशी यांच्या या पुस्तकांचे एक वैशिष्ट्य आहे- ते म्हणजे परिशिष्टामध्ये त्यांनी प्रमुख 114 क्रांतिकारकांच्या फाशीच्या/चकमकीतील मृत्यूच्या तारखा दिल्या आहेत. या तारखांना त्यांनी यथार्थपणे ‘आत्मयज्ञ दिन’ असे म्हंटले आहे. या 12 पुस्तकांपैकी काही पुस्तकांची ओळख आपण करून घेऊया.
‘मृत्युंजयांचा आत्मयज्ञ’ हे वि. श्री. जोशी यांचे गाजलेले पुस्तक. सुमारे 442 पानांचे हे पुस्तक मुंबईच्या राजा प्रकाशन संस्थेने 1951 मध्ये प्रथम प्रसिद्ध केले. या पुस्तकात एकूण 13 प्रकरणे असून त्यात पुढील ज्ञात / अज्ञात वीरांनी गाजविलेला पराक्रम वर्णन केला आहे - तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू आणि रानडे, खुदिराम बोस - प्रफुल्ल चाकी - सत्येंद्रनाथ बोस - कन्हैयालाल दत्त (सर्वजण बंगालमधील), मदनलाल धिंग्रा (पंजाब), अनंत कान्हेरे-कर्वे - देशपांडे, वान्छिनाथन अय्यर (तामिळनाडू), मास्टर अमीरचंद - भाई बालमुकुंद - अवधबिहारी - वसंतकुमार विश्वास (दिल्ली कटातील आरोपी ), विष्णू गणेश पिंगळे, पंडित रामप्रसाद ‘बिस्मिल’ - अशफाकुल्लाखान - ठाकूर रोशनसिंग - राजेंद्रनाथ लाहिरी, चंद्रशेखर आझाद - भगतसिंग - राजगुरू - सुखदेव, सरदार उधमसिंग (पंजाब) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. यातील काहीच नावे -तीही महाराष्ट्रातील - आपल्याला माहीत आहेत. पण देशभर असे कितीतरी योद्धे होऊन गेले ज्यांनी अत्यंत नि:स्वार्थी भावनेने आपल्या सर्वस्वाचा होम केला. अशा कितीतरी गाथा आपल्याला इथे वाचायला मिळतात.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एखादा क्रांतिकारक फासावर गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे किती हाल झाले, त्यांच्या नातेवाईकांचा कोणताही अपराध नसताना त्यांना किती यातना सोसाव्या लागल्या याचाही शोध वि. श्री. जोशी यांनी या पुस्तकात घेतला आहे. नाशिकचा जिल्हाधिकारी जाक्सन याचा वध केल्याबद्दल / कटात सामील झाल्याबद्दल अनंत कान्हेरे, अण्णा उर्फ कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे हे तीन कोवळे तरुण फासावर चढले. ही तारीख होती 19 एप्रिल 1910. अण्णा कर्वे हे त्यांच्या वडिलांचे एकुलते एक अविवाहित चिरंजीव. त्यामुळे ते फासावर गेले आणि त्या कुटुंबाचा निर्वंश झाला!
अण्णा यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांना नोकरीतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आणि त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न उभा राहिला. देशपांडे विवाहित होते. ते फासावर गेले आणि त्यांच्या पत्नी दुर्गाबाई यांच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यावेळी त्या वयाने अगदीच लहान होत्या. त्यांचे अतोनात हाल झाले. काही काळ त्या कुठे आहेत याचीही कल्पना नव्हती. पुढे त्या पंढरपूर येथे अनाथाश्रमात असल्याचे कळले. नंतर त्या मुंबईत आल्या. स्वैपाकीण म्हणून काम करून त्यांनी आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवला. आयुष्याच्या अखेरीस त्या सोनांबे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्या 45 वर्षे जगल्या. या गावात गावकर्यांनी त्यांचे छोटे स्मारक उभारले आहे.
कान्हेरे कुटुंबाला जो छळ सोसावा लागला त्याची माहिती घेऊया पुढील लेखात. (क्रमश:)
-डॉ. गिरीश पिंपळे