‘गर्जा महाराष्ट्र माझा’: ऐतिहासिक राज्य गीत

05 Nov 2022 20:59:48
 
गर्जा महाराष्ट्र माझा
 
 
 
 
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शाहीर ‘पद्मश्री’ कृष्णराव साबळे यांच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पहाडी आवाजात सर्वत्र गाजलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत राज्य गीत म्हणून जाहीर करण्याचा नुकताच निर्णय घेतला. ही अतिशय स्तुत्य बाब आहे. कारण, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि लोककलांचा मानबिंदू म्हणून शाहीर साबळे ओळखले जातात. दि. 3 सप्टेंबर रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्षही सुरू झाले आहे. या जन्मशताब्दी वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्ष ठोस कार्यक्रम हाती घेतलेले नसले तरी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताचे स्मरण सरकारला झाले ही सकारात्मक बाब आहे. त्याविषयी...
 
 
 
शाहीर साबळे यांच्यावर साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील, नाना पाटील, सेनापती बापट, गाडगे महाराज अशा मान्यवरांचे संस्कार झालेले आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी हे त्यांचे जन्मगाव. बालपणीच त्यांना संगीत भजने, भारुडे तसेच जात्यावरच्या ओव्यांची गोडी ग्रामीण भागात लागली आणि त्या संस्कारातून पुढे अमळनेरला आपल्या मामाकडे गेल्यानंतर त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. साने गुरुजींसमोर त्यांनी राष्ट्रभक्तीपर कवणे रचली. ‘वीर झाशीची राणी झाशीची राणी हिन पालथं पाडून शांन पाजलं इंग्रजा पाणी’ अशी गर्जना करणार्‍या शाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे या शाहिराचे संस्कार कृष्णराव साबळे यांच्यावर झाले. ‘चल उठ साहेबा आटप बिस्तारा नीट, विलायत गाठ नीट विलायत गाठ, बोलीची तुझी वटवट दीडशे वर्षे ऐकली नीट आर खाडीतून हलव बोट’ असे पोवाडे शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केले. त्यानंतर शाहिरांनी अनेक लोकगीते रचली, पोवाडे रचले.
 
 
 
1952 साली डॉक्टर बाबुराव बाविस्कर या आपल्या मित्राच्या प्रेरणेने शाहीर साबळे यांनी ‘आधुनिक मानवाची कहाणी’ हा पोवाडा साम्यवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी नव्हे, तर मानवी उत्क्रांतीचा इतिहास सादर करण्यासाठी रचला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शाहीर साबळे यांचा प्रत्यक्ष कृतिशील सहभाग नसला तरीही शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर, लीलाधर हेगडे, आत्माराम पाटील असे त्यांच्या समकालीन शाहिरांचे आणि शाहीर साबळे यांचे स्नेहबंध होते. त्याच काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली आणि महाराष्ट्राचा मंगल कलश आधुनिक महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली आणला. त्यावेळी या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून महाराष्ट्र गीताची निर्मिती करण्याचा संकल्प ‘एचएमव्ही’ कंपनीने सोडला होता आणि ही जबाबदारी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे देण्यात आली होती. श्रीनिवास खळे यांनी ‘महाराष्ट्र गौरव’ गीत गाण्याची जबाबदारी शाहीर अमर शेख यांच्यावर सोपविण्याचा निर्धार केला होता. पण, शाहीर अमर शेखांनी श्रीनिवास खळे यांना या संदर्भात विनयपूर्वक नकार कळविला. त्यांचे म्हणणे असे होते की, महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य वेगळी झालेली असली तरी महाराष्ट्राचा बराचसा भाग कर्नाटकात आणि गुजरातमध्ये जोडला गेलेला आहे हा भाग जोपर्यंत महाराष्ट्राला परत मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाले असे आम्हाला वाटत नाही. या विखंडित महाराष्ट्राचा पोवाडा आम्ही यशवंतराव चव्हाण आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर कसा सादर करायचा? त्यांचा हा प्रश्न तर्कशुद्ध होता.
 
 
 
राजा बढे यांचे ‘महाराष्ट्र गौरव गीत’ 1960च्या आधी लिहिले गेले होते हे गीतच ‘एचएमव्ही’ने निवडले आणि त्याला संगीताचा साज चढविण्याची जबाबदारी श्रीनिवास खळे यांच्याकडे दिली असता, त्यांनी अमर शेखऐवजी शाहीर साबळे यांच्याशी संपर्क साधला आणि शाहिरांनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा’ या राजा बढे यांच्या गीताला आपला पहाडी आवाज दिला. शाहीर साबळे यांच्या प्रत्येक कार्यक्रमात मग ती ‘महाराष्ट्राची लोकधारा’ असो अथवा प्रहसने मुक्त नाट्य असोत त्याच्या आधी राजा बढे यांच्या लेखणीतून उतरलेले हे ‘महाराष्ट्र गौरव गीत’ सादर होऊ लागले आणि पुढे केवळ शाहीर साबळेच नव्हे, तर पुढच्या पिढीच्या अनेक शाहिरांनी ‘महाराष्ट्राचे गौरव गीत’ म्हणून ‘गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला अभिमान गीताचा दर्जा दिला.
 
 
 
एकदा एका सभेत महाराष्ट्र गीत सुरू असताना यशवंतराव चव्हाण यांनी या गीताच्या वेळी प्रवेश केला, त्यावेळी शाहीर साबळे गात होते. ‘दिल्लीचे हे तक्त राखीतो महाराष्ट्र माझा...’ यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या हाकेला ओ देत दिल्लीला गेले. देशाचे संरक्षणमंत्री झाले, जणू सह्याद्रीने हिमालयाची पाठराखंड केली असा आशय असणार्‍या ‘दिल्लीचेही तक्त राखीतो महाराष्ट्र माझा’ या ओळींनी प्रत्यक्ष सभेत यशवंतरावदेखील भारावून निघाले. शाहीर साबळे त्यांनी आपली शाहिरी कोणत्याही राजकीय विचार प्रणालीच्या दावणीला बांधली नाही अथवा कोणत्याही राजकीय नेत्याचे अवाजवी गुणगान केले नाही अथवा भाटगिरीही केली नाही. त्यांनी रशियाचा दौरा केला. साम्यवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून त्यांचा गौरव झाला. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शाहीर साबळे यांचा गौरव त्यांनी केला. यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, कॉम्रेड डांगे, अशा अनेक मान्यवर नेत्यांकडून शाहीर साबळे यांचा सन्मान झाला. शाहीर साबळे यांचे ‘आंधळ दळतय’ आहे हे मुक्त नाट्य म्हणजे शिवसेनेच्या प्रसव वेदना होत असे गौरवोद्गार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी काढले होते.
 
 
 
शाहीर साबळे यांनी मराठी रंगभूमीवर जशी मुक्तनाट्याची नवी देणगी दिली, तसेच एक म्हणजे मोबाईल थिएटरचे ते जनक ठरले आणि दुसरे म्हणजे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम त्यांनी मराठी रंगमंचावर आणला. त्यातून ‘महाराष्ट्राच्या लोककले’ची दौलतच रंगभूमीवर उभी केली. शंभू मित्र यांनी बोलविलेल्या एका महोत्सवाच्या ‘कलकत्ता युथ क्वायर’ हा कार्यक्रम शाहिरांनी पाहिला. या कार्यक्रमाने शाहीर साबळे विलक्षण प्रभावित झाले. त्यातून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ उभी राहिली. या कार्यक्रमामुळे जागरण-गोंधळासारखी विधीनाट्ये, वासुदेव, कोकेवाला, जोशी, पिंगळा यासारखी विथीनाट्ये, कृषी संस्कृतीतील भलरी गीते, कोळी बांधवांची गीते व नृत्ये, तमाशातील लावणी- बतावणी, मर्दानी पोवाडे, भजने आणि भारुडे असे लोकप्रकार मुख्यधारेमध्ये आले. आजही, त्यांचे ‘अरे अरे वैराळा’ हे कोकेवाल्याचे गीत, ‘बाईला माझ्या नाद पाण्याचा’ आहे कोळीगीत, ‘मल्हारवारी मोत्यानं’ हे खंडोबाचे गीत, ‘अनादि निर्गुण प्रगटली भवानी’ हे देवीचे गीत, ‘शुभमंगल चरणी गण नाचला’ हा तमाशातील पठ्ठे बापूराव यांचा गण आजही लोकांच्या मुखी आहे. ‘महाराष्ट्राची लोकधारा’तील लोकगीते आणि लोकनृत्ये हे महाराष्ट्राचे लोकसंचित आहे. त्याची मोहिनी आजही मराठी लोकमानसावर आहे.
 
 
 
 
गर्जा महाराष्ट्र माझा
 
 
 
 
एक दिवशी, एका कार्यक्रमांमध्ये संगीत दिग्दर्शक सलील चौधरी आणि शाहीर साबळे यांना एकत्र रंगमंचावर बोलविण्यात आले. तेव्हा निवेदक अमीन सयानी म्हणाले, ‘देखो बंगाल महाराष्ट्र के गले लग रहा हैं...’ म्हणूनच शाहीर साबळे, महाराष्ट्राच्या लोककला आणि महाराष्ट्राची अस्मिता या तिन्ही गोष्टी एकच आहेत, असे केवळ मराठीजनांनाच नाही; तर संपूर्ण भारताताला वाटत होते. शाहीर साबळे म्हणजे साक्षात लोककला विद्यापीठच होते. प्रशांत दामले, किशोरी शहाणे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, आदेश बांदेकर, चारुशीला साबळे, प्रदीप पटवर्धन, देवदत्त साबळे, यशोधरा साबळे, वसुंधरा साबळे, मंगेश दत्त, केदार शिंदे, विवेक ताह्मणकर अशा अनेक कलावंत या विद्यापीठामध्ये घडले. व्यक्तिगत पातळीवर शाहिरांचा आणि माझा स्नेहबंध सुमारे 30 वर्षांचा होता. त्यांचं आत्मकथन शब्दबद्ध करण्याचा संकल्प आम्ही दोघांनी सोडला होता. ‘झिलकरी’ हे त्याचं नावदेखील निश्चित झालं होतं. इतकंच काय प्रकाशन समारंभही ठरला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन आणि लता मंगेशकर प्रमुख पाहुण्या असे सर्व काही ठरले होते. या आत्मकथनाची दोन प्रकरणे दिवाळी अंकात छापूनही आली होती. पण, काही कारणाने हा संकल्प सिद्धीस गेला नाही. त्याची चुटपुट शेवटपर्यंत त्यांना आणि मला राहिली. आमच्या मुंबई विद्यापीठाच्या ‘लोककला अकादमी’च्या सल्लागार मंडळावर शाहीर साबळे होते.
 
 
 
शाहीर साबळे निश्चितच महाराष्ट्राच्या लोककलावंतांचे आणि लोककलांचे मुकुटमणी होते. त्यांची शाहिरी मर्दानी होती. त्यांच्या शाहिरीत विचार होते आणि त्यांच्या अन्य लोकगीतांमध्ये प्रासादिकता होती. चित्रपट सृष्टीतूनही अनेकांनी शाहिरांना ‘ऑफर’ दिली होती, पण शाहिरांनी ती नम्रपणे नाकारली. ते सतत म्हणायचे की, “मी माझ्या शाहिरीचे आणि मुक्तनाट्याची साथ कधीच सोडणार नाही.” महाराष्ट्र शासनाने शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोककलेच्या क्षेत्रासाठी अनेक पथदर्शी योजना कार्यन्वित कराव्यात, हाच शाहीर साबळे यांच्या शाहिरीला मानाचा मुजरा ठरेल. शाहीर साबळे म्हणजे मराठी रंगभूमी आणि लोक रंगभूमी यांचा सुंदर समन्वय होत. महाराष्ट्र गौरवगीताप्रमाणेच अनेक अविट गोडीची लोकगीते त्यांच्या पहाडी आवाजातून आणि प्रसंगी गोड गळ्यातून गायली गेली आहेत. भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार, भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’, ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’, सातारा येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद असे अनेक सन्मान शाहीर साबळे यांना प्राप्त झाले त्यांची प्रहसने मुक्त नाट्य त्यांची लोकगीते यांची मोहिनी आजही मराठी लोकमानसावर आहे.
 
 
 
-प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
 
 
Powered By Sangraha 9.0