किशोरी पेडणेकरांविरोधात ४२० अंतर्गत गुन्हा दाखल होणार! सोमय्यांची तक्रार

04 Nov 2022 19:10:16

मुंबई : भाजप नेते, किरीट सोमय्या यांनी आज 'एसआरए' घोटाळा संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अनेक ठिकाणी एसआरएचे गाळे बेकायदा ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. पेडणेकरांनी केलेल्या एसआरए घोटाळाप्रकरणाचे सर्व कागदपत्रे, पुरावेही पोलिसांना दिल्याचे सोमय्यांनी सांगितले.
 
 
सोमय्या म्हणाले की, "मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एस. आर. ए. प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांची फसवणूक करून अनेक गाळे स्वतःच्या ताब्यात घेतले. यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, राज्य शासनाचे गृहनिर्माण विभागासह तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात पेडणेकरांवर गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करावी. २०१७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीत किशोरी पेडणेकर यांनी जे निवडणूक शपथ पत्र भरले, त्यात त्या स्वतः गोमाता जनता एस. आर. ए च्या सहाव्या मजल्यावर राहत आहे असे लिहिले आहे." असे सोमय्या म्हणाले.
पेडणेकरांच्या कुटुंबाचाही समावेश असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले, "किशोरी पेडणेकर यांना कोणताही गाळा देण्यात आलेला नाही. त्या तेथे झोपडपट्टीत राहत नव्हत्या. तसेच, किशोरी पेडणेकर व त्यांच्या परिवाराने अशाच पद्धतीने स्वतःची किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने गोमाता जनता एस. आर. ए मधील तळमजल्यावरील गाळा क्र. ४ व गाळा क्र. ५ ही ताब्यात घेतला. हा गाळा अन्य लोकांच्या नावाने असताना किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर, त्यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी खोट्या पद्धतीने या गाळ्यावर कब्जा केला." अशी माहिती सोमय्या यांनी दिली.
 
 
या संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांनी या तीनही गाळ्यांच्या विरोधात नोटिसा दिल्या आहेत. फसवणुकीने हे गाळे पेडणेकर परिवार वापरत आहेत, म्हणून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तरी पोलिसांनी आता पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करावी. असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
Powered By Sangraha 9.0