बाबासाहेबांनी सांगितलेला इतिहास चुकीचा असं म्हणता येणार नाही!

राज ठाकरेंच्या भेटीनंतर इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची प्रतिक्रीया

    30-Nov-2022
Total Views |

Raj Thackeray 1


राज ठाकरे जयसिंगराव पवार



कोल्हापूर :
ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. कोल्हापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पवार-ठाकरे अचानक भेटले. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल उल्लेखही राज ठाकरेंनी केला, अशी माहितीही त्यांनी दिली. बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या सर्वच्या सर्व इतिहासाबद्दल मी कधीही आक्षेप घेतलेला नाही. काही गोष्टींच्या उल्लेखाला फक्त त्या त्यावेळी विरोध दर्शविला अशी प्रतिक्रीया जयसिंगराव पवार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

जयसिंगराव म्हणाले की, "राज ठाकरेंबद्दल कुठल्या विषयावर चर्चा होणार याबद्दल काही ते ठरवून आले नव्हते. माझं आयुष्य इतिहासाला वाहिलेलं आहे. त्यामुळे चर्चाही इतिहासावरच होणार हे निश्चित. खरा इतिहास नेमका काय? त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृती नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ते मान्यही केले. अर्थात बाबासाहेबांनी मांडलेला सर्वच इतिहास हा चुकीचा आहे, असं म्हणता येणार नाही. शेवटी कागदोपत्री मांडता येतो तो खरा इतिहास. त्यावेळी बाबासाहेबांच्या काही गोष्टी मला स्वीकाराव्याश्या वाटल्या नाहीत. त्या त्या वेळी मी ते स्पष्ट केलेलं आहे. पण आज त्याची उजळणी करण्याची काही कारण नाही. तसा विषयही काही निघाला नाही."
"बाबासाहेबांबद्दलची आठवण त्यांनी दोनदा काढली. तसेच शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्यातील चर्चेबद्दलही त्यांनीही सांगितलं.", असेही ते म्हणाले. "सामान्य माणसांना तुम्ही उपक्रम पूर्ण करावेत, अशी तूमची अपेक्षा आहे. उदा.भोंग्याचा विषय आहे तोही पूर्ण करावा, अशी अपेक्षा आहे.", असं आवाहन मेहंदळेंनी केल्यानंतर राज ठाकरेंनीही होय आम्ही संपूर्णपणे भोंगे बंद करणारच, अशी प्रतिक्रीया पवार यांना दिली आहे.
राज ठाकरे सत्यनिष्ठ माणूस : पवार


"राज ठाकरे हा सत्यनिष्ठ माणूस आहे. उगाच लोकांच्या आशा पल्लवीत करणारा नाही. अशा माणसांच्या हाती सत्ता गेली, तर काहीतरी भरीव त्यांच्या हातून होईल, अशी मला अपेक्षा आहे. आमच्यासारखी माणसंही त्यांना सत्ता आल्यानंतर त्यांच्या भूमिकांबद्दल विचारू शकतात. तुम्ही सत्तेत नसताना असं म्हणाला होता, तर त्याबद्दल आता काही करावं, असं आम्हीही सांगू.", असंही ते म्हणाले.

"...तर आपल्यासारखे करंटे आपणच!"


राज ठाकरे आणि जयसिंगराव पवार यांच्यात महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाबद्दलही चर्चा झाली. यावेळी जयसिंहराव पवारांनी राज ठाकरेंना ग्रंथ दिला. त्यातील प्रस्तावना राज ठाकरेंना वाचायला लावली. यावेळी त्यांनी प्रस्तावनेतील एक किस्सा सांगितला. "रिचर्ड इटन नावाचे प्राध्यापक माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं. तुम्ही सर्व जग फिरुन आला. तर मला एक गोष्ट सांगा. महाराणी ताराबाईसाहेब एक २५ वर्षांची विधवा राणी. औरंगजेबासारख्या बलाढ्य सत्ताधीशाशी सात वर्षे संघर्ष केला. काबूल कंधाहारपासून आसामपर्यंत पोहोचलेलं राज्य त्याच्याशी लष्करी लढाई लढणाऱ्या महाराणी ताराबाई साहेबांसारखी व्यक्ती जगात कुठे झाली नाही, असं रिचर्ड इटन म्हणाले होते.", असेही ते म्हणाले. जगाच्या इतिहासात जिच्यासारखी शूरवीर महाराणी नाही, तिच्या इतिहासाबद्दल आपल्याकडच्या तरुणाईला मुलींना माहिती नाही, याच्यासारखे करंटे आपल्यासारखे दुसरे कुणीही नाही, अशी खंतही त्यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली. राज ठाकरेंनीही ताराराणी साहेबांचा इतिहासाविषयी समजून घेतल्याचेही ते म्हणाले.
कोण आहेत जयसिंगराव पवार?


डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचा जन्म सांगलीतील तडसरमध्ये झाला. ‘Chh.Rajaram Maharaj and the Maratha State’ हा शिवपुत्र राजाराम महाराजांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा पीएचडीचा प्रबंधही त्यांनी सादर केला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील जगाच्या पाठीवरील अतुलनीय स्त्रीकर्तव्य सिद्ध करणारा ‘महाराणी ताराबाई’ हा संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला आहे. मराठ्यांच्या या राणीचे कर्तृत्व सिद्ध करणारा महाराष्ट्रातील पहिला ग्रंथ ठरला.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.