शिवाजी महाराजांच्या इतिहासावर नवा चित्रपट; अशॊक समर्थ साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजर

    30-Nov-2022
Total Views |

guj
 
मुंबई : मराठी सिनेमांमध्ये ऐतिहासिक चित्रपट निर्मितीला सध्या चांगले दिवस आहेत. शिवाजी महाराजांच्या इतिहासावर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. महाराष्ट्राबरोबरच अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट ही तर तमाम आबालवृद्धांना पर्वणीच असते. सहकुटुंब पहावे असे हे चित्रपट असतात. अशातच ‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
 
 
चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे? कोण कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात असताना, स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे. स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.
 
सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसत आहेत. पोस्टरवर सरसेनापतींच्या गौरवार्थ "निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते" अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेलं असताना युद्ध करताना दिसतायेत. शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत.
 
या पोस्टरवरून ‘रावरंभा’चे नेमके कथानक काय आहे ? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच यातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून ‘रावरंभा’ ही भव्यदिव्य ऐतिहासिक कलाकृती पहाण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.