नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

    30-Nov-2022
Total Views |

kotapalle
 
 
मुंबई : जेष्ठ साहित्यिक लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज ३० नोव्हेम्बर रोजी पहाटे २ वाजता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण साहित्यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे तसेच साहित्य संमेलनाचे ध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
 
कोत्तापल्ले मूळचे मराठवाड्यातील रहिवासी. नांदेड जिल्यातील मुखेड गावी त्यांचा जन्म झाला. त्याचे शिक्षणही मराठवाड्यातच पूर्ण झाले. पदव्युत्तर शिक्षण घेताना विद्यापिठून त्यांनी सुवर्णपदकही जिंकले होते. मराठवाड्यातील साहित्य चळवळीतही त्यांनी महत्वाचा हातभार लावला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. १९९३च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.
 
शिक्षण विषयाच्या निमीत्ताने त्यांचे मराठवाडा विभागाशी चांगले संबंध होते. विद्यापीठातील कुलगुरू पद प्राप्त झाल्याने ते अजून दृढ बनले. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात शिक्षण घेताना त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरी केली. साहित्य परिषदेच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींची त्यांना जाणीव होती. या जाणिवेतूनच त्यांनी 'कमवा व शिका' ही योजना सुरु केली. यातून विद्यार्थ्यांचे मानधन वाढले. त्यांच्या निर्णयाचा कित्येक विद्यार्थ्यांना लाभ झाला.
 
मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. 'राजधानी', 'वारसा', 'सावित्रीचा निर्णय' या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. 'गांधारीचे डोळे', 'मध्यरात्र', 'पराभव' या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. महात्मा फुले यांज्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा 'ज्योतीपर्व' हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. साहित्यसेवा करतानाच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.