विद्यादानी आर.के

    30-Nov-2022   
Total Views |
 
आर.के

 
 
 
तिसरीत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकी शिकून लाखो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक बनतो, अशा विद्यादानी राजेंद्र बबन कदम उर्फ ‘आर.के. सर’ यांच्याविषयी...
 
 
राजेंद्र कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील रायगाव या गावी झाला. बालपण उनाडक्या करण्यात, तसेच खेळण्या-बागडण्यात गेले. गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत राजेंद्र अनुत्तीर्ण झाले. कसेबसे चौथी पूर्ण झाल्यानंतर काकांनी राजेंद्रना ठाण्यात आणले. ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील ठाणे महापालिकेच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची नवी ‘इनिंग’ सुरू झाली. मस्तीखोर स्वभावामुळे नेहमी पालकांना शाळेतून बोलवणे जाई. अशातच दहावीला असताना आईचे निधन झाल्याने राजेंद्र मनातून खचले. पण, या दुःखद घटनेने त्यांना जबाबदारीचे भान आले आणि जिद्दीने दहावीत 78 टक्के मार्क मिळवून शाळेत पहिले येण्याचा मान त्यांनी मिळवला. अनेकांनी त्यांच्या या यशाचे कौतुक केले.
 
 
चांगले गुण मिळाल्याने राजेंद्र यांनी अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला, पण, उनाड स्वभाव काही त्यांचा पिच्छा सोडीना. त्यामुळे महाविद्यालयातही ‘बॅक बेंचर्स’ हा शिक्का त्यांच्यावर बसला. बारावीला असताना काकांनी त्यांना खासगी ट्युशनला टाकले होते. ट्युशनमधील गणिताच्या सरांनी केलेल्या मौलिक मार्गदर्शनामुळे गणितात रूची वाढलीच, पण बारावीला 90 टक्के गुण मिळवल्याने त्यांना बोर्डात आल्याचा आनंद झाला होता. मागच्या बाकावरील विद्यार्थ्याने असे उज्ज्वल यश संपादन केल्याचे मित्रमंडळींसह अनेकांना आश्चर्य वाटले होते. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने बारावी नंतर शिक्षण सोडून गावी जाण्याचा विचार करीत असताना, काकांच्या आग्रहास्तव राजेंद्र यांनी चिपळूण येथे इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचे 15 हजार शुल्क भरण्यासाठीही पैसे नव्हते, तेव्हा वडिलांनी गावचे घर विकून हे पैसे पाठवले होते. तिथे वसतिगृहामध्ये राहत असल्याने अभ्यासाव्यतिरिक्त बराच फावला वेळ असे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा, म्हणून त्यांनी शिकवण्याही घेतल्या. इथेच राजेंद्र कदम ते ‘आर. के. सर’ या प्रवासाची मुहूर्तमेढ झाली. या शिकवणीमुळे आमदनी झालीच, पण ‘आर. के.’ या नावालाही ‘रिस्पेक्ट’ मिळू लागला. गरिबीतील उनाड आयुष्य ते इथपर्यंतच्या विलक्षण प्रवासाची जंत्री मांडताना राजेंद्र आजही ते दिवस आठवतात.
 
 
2008 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्याच महाविद्यालयात तात्पुरत्या नियुक्तीवर आर. के. प्राध्यापक बनले. जेमतेम दोन वर्षे प्राध्यापकी केल्यानंतर 2010 साली मुंबईला येऊन नोकरीचा शोध सुरु केला. पण, सरकारी सोडाच, पण खासगी शिकवणीवाल्यांनीही त्यांना ‘रिजेक्ट’ केले. मग उदरनिर्वाहासाठी घरी शिकवणी सुरु केली. दरम्यान, अजित मोरे या मित्राकरवी विद्युत अभियांत्रिकी शिकलेल्या राजेंद्र मढवी यांच्याशी परिचय झाला. शिकवणी सुरु करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रोत्साहन दिल्याने नेरुळ येथे ‘वैष्णवी अकॅडमी’ची पहिली शाखा सुरु झाली. सुरुवातीला अवघ्या तीन विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या या अकॅडमीच्या आजघडीला ठाणे, कल्याण, दादर, मीरा रोड अशा शाखा असून तब्बल दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत. किंबहुना आजवर जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले असून जगाच्या कानाकोपर्‍यात विद्यार्थ्यांनी ‘आर. के.’ हे नाव पोहोचवल्याचे ’आर.के.’ अभिमानाने सांगतात.
 
 
राष्ट्रनिर्माणाचे काम शिक्षक करीत असतात. तेव्हा, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता व्यावसायिक शिक्षणासोबत चांगला माणूस कसे बनायचे. याकडे त्यांचा कटाक्ष असतो. गणित विषय शिकवताना तर ते वास्तव जीवनाशी सांगड घालून शिकवतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांना ’आर.के.’च्या शिकवणीची गोडी लागत असावी. त्यांचे काकादेखील याच क्षेत्रात असल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगतात. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून स्वतःही ते विद्यार्थी बनतात. फायदा-तोटा याचा विचार न करता वर्गात ते दैनंदिन जीवनाशी निगडित उदाहरणे देऊन शिकवत असल्याने विद्यार्थ्यांनाही ते भावते. आजकाल शिकवणी आणि ‘कोचिंग’चे पेव फुटले असून उथळ जाहिरातबाजीद्वारे बक्कळ कमाई करीत अनेकजण विद्यादानाच्या हेतूला हरताळ फासत आहेत. असे असताना अभियांत्रिकी तसेच तत्सम स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची पसंती मात्र, ’आर.के.’ सरांच्याच अकॅडमीला असते. त्यांचे ’आर.के. एडु अ‍ॅप’ तसेच एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेक्चर देण्याचे आणि ऑनलाईन माध्यमातून विद्यादानाचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे.
 
 
समाजाने आपल्याला काय दिले, यापेक्षा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. यासाठी ‘आर. के. फाऊंडेशन’च्या माध्यमातून ते गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासह आरोग्य शिबिरे, रक्तदान, नेत्र तपासणी तसेच शालेय व जीवनावश्यक वस्तूंची मदत करतात. नव्या पिढीला संदेश देताना आर. के, ‘’कुणाचेही भविष्य एका रात्रीत बदलत नाही, तेव्हा, कुठलेही कार्य करताना नैतिकता व प्रामाणिकपणाला मेहनतीची जोड दिली, तर 100 टक्के यश आपलेच असेल,” असे सांगतात. अशा या युवा आर. के. सरांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.