भारतीय संविधानातील चित्रांचे औचित्य

    29-Nov-2022
Total Views |
 
संविधान
 
 
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा पूर्ण झाल्यानंतर हे संविधान उत्तमरित्या सुलेखन करून कलात्मक पद्धतीने सादर व्हावे, असा विचार तेव्हा पुढे आला. ज्येष्ठ चित्रकार नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसेच, प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे ब्योहर राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे. संविधानाच्या सुलेखनाचे श्रेय प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना जाते. विख्यात चित्रकार नंदलाल बोस यांनी संविधानातील सगळी 22 चित्रे रेखाटली असून त्यांना विश्वरूप, गौरी, जमुना, पेरूमल, कृपाल सिंह या शांतिनिकेतन येथील मंडळींनी मदत केली. या प्रत्येक चित्राचे कलात्मक रसग्रहण करून एक स्वतंत्र लेख लिहिता येऊ शकेल. त्या चित्रांचे औचित्य इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान होय. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतींमध्ये असलेल्या अत्यंत बोलक्या चित्रांबद्दल फार कमी बोलले व लिहिले गेले आहे. भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता, तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी इत्यादी बोलकी चित्रे संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये संम्मिलित करण्यात आली होती. अजिंठा वेरूळ येथील अक्षर लेण्यांच्या रूपाने भारतीय कला अजरामर झालेली आहे. संविधानाचा पहिला भाग सुरू होण्यापूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये प्रसिद्ध असलेले नाणे चित्रीत करण्यात आले आहे. या नाण्यावर बैल चितारला असून हडप्पा मोहेंजेदडो संस्कृतीचे अधिकृत प्रशासकीय नाणे म्हणून हे चित्र ओळखले जाते. संविधानाचा दुसरा भाग नागरिकत्वाबद्दल प्रकाश टाकतो. हा भाग सुरू होण्यापूर्वी वैदिक परंपरेतील गुरुकुलाचे बोलके चित्र चितारले गेले आहे. भारतीय जीवन प्राचीन काळी कसे होते हे गुरुकुलाच्या माध्यमातून दाखवून नागरिकत्वावरील भाग सुरू झाला आहे. संविधानाचा तिसरा भाग ‘मूलभूत हक्क’ या विषयावर प्रकाश टाकतो. मूलभूत हक्क वर्णन करण्यापूर्वी भगवान श्रीराम,लक्ष्मण व सीता यांचे चित्र रेखाटलेले आहे. ’रामादिवत् वर्तितव्यम् न रावणदिवत्’ असे म्हटले जाते; अर्थात रामासारखे वागले पाहिजे रावणासारखे नव्हे. रामाचे त्यागमय जीवन भारतीयांनी आपल्या जीवनाचा मूलभूत भाग बनवला पाहिज, असे संविधान निर्मात्यांना वाटले असावे. यावरून संविधानाचा मूळ आत्मा भारतीय आहे हे ठसठशीतपणे पुढे येते. संविधानाचा चौथा भाग ‘मार्गदर्शक तत्व व राज्याची धोरणे’ या विषयावर प्रकाश टाकतो या भागाच्या सुरुवातीला कुरुक्षेत्रामधील अर्जुन व कृष्णाच्या संवादाचे चित्र रेखाटले आहे. ’यतो धर्मस्ततो जय:’ : जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे हा भाव या चित्रातून अधोरेखित होतो.
 
 
 
संविधानाचा पाचवा भाग संघराज्याच्या राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या कार्यावर प्रकाश टाकतो. हा भाग सुरू होण्यापूर्वी तथागत गौतम बुद्धांचे अत्यंत बोलके चित्र चितारले गेले आहे. या चित्रात हरीण, मोर इत्यादी प्राणी व पक्षी गौतम बुद्धांच्या आसपास मुक्त संचार करत असून त्यांचे पाच शिष्य त्यांच्यासमोर बसलेले दिसतात. राष्ट्राचा प्रमुख हा नि:संग, तपस्वी व निर्वाण प्राप्त झालेला सम्यक संबुद्ध असावा, असे या चित्रातून प्रतीत होते. संविधानाचा सहावा भाग ‘राज्य सरकार’ या विषयावर प्रकाश टाकतो. या पृष्ठावर वर्धमान महावीर यांचे चित्र रेखाटलेले आहे. पद्मासनातील महावीरांची मुद्रा व त्यांच्या जवळ मोराने चोचीमध्ये कमळ घेतलेले आहे असे चित्र रेखाटले आहे. ’चरत भिक्खवे बहुजन हिताय बहुजन सुखाय’ म्हणत लोककल्याणासाठी बाहेर पडलेल्या या महात्म्यांना नंदलाल बोसांनी योग्य ठिकाणी चपखल चितारलेले आहे. संविधानाच्या सातव्या व आठव्या भागाच्या सुरुवातीला मौर्य व गुप्त काळातील चित्रे रेखाटलेली आहेत. संविधानाचा नववा भाग ‘पंचायती राज’ या विषयावर प्रकाश टाकतो. याच्या सुरुवातीला राजा विक्रमादित्याच्या सभेचे सुंदर चित्र चितारलेले आहे.
 
 
 
भारतीय इतिहासामध्ये विक्रमादित्य हा अत्यंत न्यायप्रिय व कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या गेला आहे. संविधानाचा दहावा भाग ‘अनुसूचित जाती, जनजाती व आदिवासी’ या विषयावर प्रकाश टाकतो. त्याच्या सुरुवातीला नालंदा विद्यापीठाचे चित्र रेखाटले असून अनेक विद्यार्थी हातात ग्रंथ घेऊन शास्त्रार्थ करत आहेत, असे दाखवलेले आहे. विद्यापीठांच्या इमारतीवर पक्षी मुक्तपणे संचार करत आहेतअसे चितारले आहे. ’सा विद्या या विमुक्तये’ म्हणजे विद्या प्राप्त झाल्यावर व्यक्ती पक्ष्यासारखा मुक्त होतो हे यातून सुचित होते. संविधानाचा अकरावा भाग ‘केंद्र व राज्यातील संबंध कसे असावे’ यावर प्रकाश टाकतो. याच्या सुरुवातीला ओडिसा येथील मूर्ती कलेचा नमुना म्हणून सिंह आणि घोडा विशिष्ट पद्धतीने चितारला गेला आहे. राज्यघटनेच्या बारावा विभाग ’वित्त, महसूल’ या विषयावर प्रकाश टाकतो. हा भाग सुरू होण्यापूर्वी शिल्प शास्त्रामध्ये वर्णन केलेला ब्रांझ धातूमधील चोल काळातील नटराज मूर्ती चितारली आहे. नटराज हे समतोल साधण्याचे प्रतीक आहे. संविधानाच्या तेराव्या भागात ‘वित्त, वाणिज्य व आंतरराज्य संबंध’ या विषयाची चर्चा असून महाबलीपुरम येथील मूर्तीकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले चित्र रेखाटलेले आहे. या चित्रांमध्ये एक व्यक्ती तपाचरण करत आहे. ती व्यक्ती म्हणजे तज्ज्ञांच्या अर्जुन आहे, तर काही तज्ज्ञांच्या मते गंगा पृथ्वीतलावर यावी म्हणून तपश्चर्या करत असलेला भगीरथ रेखाटला आहे.
 
 
 
निवडणूक आयोगाची चर्चा पंधराव्या भागात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व गुरुगोविंद सिंग यांची वीर मुद्रेतील चित्रे रेखाटले आहेत. दोघांच्याही हातात शस्त्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व गुरु गोविंद सिंह यांनी उत्तम प्रशासन व योग्य व्यक्ती हेरून त्यांच्यात नेतृत्वगुणांचा विकास घडवून आणला. या दोन्ही युगपुरुषांनी आपल्या राज्यशासनातून न्याय दिला होता हे या चित्रातून अधोरेखित होते. कार्यालयीन भाषा व आणीबाणी विषयक तरतुदी या अनुक्रमे 17 व्या व 18 व्या भागाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांची चित्रे रेखाटले आहेत. सतराव्या भागाच्या सुरुवातीला दांडी यात्रेसाठी निघालेले गांधीजी व 18 व्या भागाच्या सुरुवातीला नौखाली येथील दंगली उसळल्यानंतर सांत्वन करावयास गेलेले गांधीजी चितारले आहेत. या चित्रांचा अभ्यास केल्यानंतर व योग्य ठिकाणी त्यांची योजना केलेली पाहिल्यानंतर कोणालाही हे सहज लक्षात येईल की संविधानाचा आत्मा हा खर्‍या अर्थाने अस्सल भारतीय म्हणजेच हिंदू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षाही तथागत गौतम बुद्धांच्या विचार दर्शनातून अधिक स्पष्टपणे प्रकट होतात. जो या धर्मसंस्कृतीशी जोडलेला आहे तो संविधानाशीदेखील जोडलेला आहे; कारण येथील सनातन संस्कृतीमध्येच संविधानातील मूलभूत तत्वे पेरलेली आहेत. प्लुटार्क या ग्रीक तत्ववेत्त्याने म्हटलं आहे की, रिळपींळपस ळी र्ाीींश िेशीीूं, िेशीीूं र ीशिरज्ञळपस ळिर्लीीींश अर्थात चित्र म्हणजे मूक कविता असते आणि कविता म्हणजे बोलके चित्र असते. भारतीय संविधानामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांची चर्चा करताना चित्रांची योजना करून महत्त्व अधोरेखित करणार्‍या कलाकारांचे हे योगदान वाखाणण्याजोगे आहे. संविधानाकडे एका चित्रकाराच्या रसिक नजरेतून पाहणे अगत्याचे ठरेल.
 
 
 
- डॉ. प्रशांत धर्माधिकारी
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.