सामाजिक प्रबोधन हेच ध्येय

    29-Nov-2022   
Total Views |
 
डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटी
 
 
 
 
सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम, तसेच त्याबरोबरच ‘मुलगी वाचवा’ असा संदेश देण्याचे काम ‘डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटी’ आणि ‘युथ विंग नया सवेरा’ची माध्यमातून केले जात आहे. त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
बिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटी’ आणि ‘युथ विंग नया सवेरा’ची स्थापना 2012 मध्ये झाली. संस्थेचे मूळ उद्दिष्ट होते ते म्हणजे, स्त्री-पुरूष समानतेची जाणीव आणि शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य राखणे. ‘डोंबिवली वुमन्स वेलफेअर सोसायटी’तर्फे डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात जाऊन ’मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ हे अभियान 2012 पासून राबविले जात आहे. नवजात बालिकांना व त्यांच्या मातांना कपडे, कॉटन पिशव्या, साबण, वह्या इत्यादी साहित्य दिले जाते. शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जाते, तसेच नागरिकांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली जाते. या उपक्रमाची जानेवारी 2023 मध्ये दशकपूर्ती होईल, याचा अभिमान वाटत असल्याचे संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्वाती गाडगीळ सांगतात. या उपक्रमांतर्गत आजतागायत रुग्णालयातील तीन हजारांहून अधिक बालकांना भेटवस्तू दिल्या आणि 56 हजारांहून अधिक कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले आहे. याशिवाय दि. 11 ऑक्टोबर ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन’ दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संस्थेने सामाजिक स्वच्छतेसाठी महत्त्वाची मोहीमदेखील हाती घेतली आहे.
 
 
या मोहिमेच्या माध्यमातून शहर थुंकीमुक्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दर महिन्यात शहरातील गजबजलेल्या ठिकाणी जसे रेल्वे स्थानक परिसर, भाजी बाजार, पान टपर्‍या, रिक्षा स्टॅण्ड, महत्त्वाचे पथ अशा ठिकाणी संस्थेचे सदस्य जातात. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असे तीन-चार भाषांमध्ये लिहिलेले फलक हातात घेऊन घोषणाही देत असतात. कधी पथनाट्यांद्वारे, तर कधी देशभक्तीपर गाणी गाऊन जनजागृती केली जाते आणि हे व्रत पुढेदेखील सुरूच राहणार आहे . घोषणादेखील किमान सहा भाषांमधून दिल्या जातात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, मारवाडी या भाषांचा त्यात समावेश असतो. ही मोहीम राबविताना अजून एक महत्त्वाचा संदेश संस्थेतर्फे सातत्याने गेली आठ वर्षे दिला जात आहे. तो म्हणजे पान तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा. त्याने कर्करोग होतो. प्रत्येक रिक्षाचालकाला व्यसनापासून दूर राहा. रस्त्यावर थुंकू नका आणि रिक्षात बसलेल्या प्रवाशांना पण रिक्षाचालकाने विनंती करावी की, त्यांनीसुद्धा चालत्या रिक्षांतून थुंकू नये, असे सांगून जनजागृती केली जाते. संस्थेचे सगळे सदस्य हा नियम शक्य होईल तितका पाळतात. संस्थेने ‘थुंकीमुक्त शहर’ करण्याचा जणू विडाच उचललेला आहे आणि यात सर्व नागरिकांची साथ आम्हाला मिळेल, असा विश्वास गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.
 
 
‘डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटी’ आणि ‘युथ विंग नया सवेरा’ यांच्या सौजन्याने महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने गावातील वयोवृद्ध,व्यक्ती, महिला, शालेय विद्यार्थी व इतर ग्रामस्थांसाठी थुंकण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ‘वॉश बेसिन’ लावण्यात आले आहेत. ‘स्पीट बेसिन’ प्रोजेक्ट राबविताना अनेक सरपंचांनी सहकार्य केले आहे. त्यात रत्नागिरी येथील कोतवडेचे माजी सरपंच तुफील पटेल यांचा खास उल्लेख करावासा वाटतो. कारण, त्यांनी दहा गावांमध्ये असे बेसिन बसविण्यास मदत केली आहे. ‘सर्वांनी ‘वॉश बेसिन’चा उपयोग करावा’ व ‘कृपया येथेच थुंकावे व पाणी टाकावे’ असा संदेश त्या टाकीवर लिहिलेला असतो. या ‘स्पीट बेसिन’ची सुरुवात साधारणपणे 2 ऑक्टोबर, 2021 मध्ये केली. दरवर्षी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने सामाजिक स्वच्छतेसाठी आणि थुंकीमुक्त शहर होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. दोन वर्षे मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. ‘स्पीट बेसिन’ बसवलेल्या अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईन सेशनद्वारे व्यसनमुक्ती बद्दल जनजागृती करण्याचे काम ही संस्था करीत आहेत.
 
 
2015-16मध्ये डोंबिवली शहरात सात ठिकाणी लोकांनी स्वतःच ठरवून तयार केलेली कचर्‍याची ठिकाणं स्वच्छ केली. तेथील कचर्‍याचे ढीग महानगरपालिकेच्या मदतीने स्वच्छ करवून घेतले आणि त्या सात ठिकाणी स्वखर्चाने बगीचे तयार केले. गावातील नागरिकांनी आणि वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांनी त्याची दखल घेऊन आम्हाला प्रोत्साहन दिले. दि. 19 नोव्हेंबर या ‘जागतिक पुरुष दिवसा’चं औचित्य असं आहे की, मुलांच्या आणि पुरुषांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि राष्ट्र, संघटना, राजकारण, समाज, कुटुंब, लग्नसंस्था आणि मुलांचे संगोपन यात त्यांचा जो वाटा असतो, त्याचं त्यांना योग्य ते श्रेय मिळावं. ’डोंबिवली वुमेन्स वेल्फेअर सोसायटी’ आणि ‘युथ विंग नया सवेरा’ गेली पाच वर्षे 2018पासून ‘जागतिक पुरुष दिवस’ साजरा करीत आहे. दरवर्षी या दिवशी आम्ही दोन अशा पुरुषांचा सत्कार करतो, ज्यांनी समाजाच्या उत्थानासाठी चांगले कार्य करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. कोरोना काळात ‘फोर्टिस हॉस्पिटल’मध्ये रुग्णांना सेवा देणारे दोन प्रभाग साहाय्यकांचा सत्कार केला, त्यांना देवदूतच म्हणावे खरे! यंदाच्या वर्षी आमच्या व्यसनमुक्ती अभियानांतर्गत पुण्याच्या ‘मुक्तांगण’ संस्थेमध्ये समुपदेशनाचे काम उत्तमरित्या पार पाडणार्‍या दोन व्यक्तींचा सत्कार केला.
 
 
संस्थेने एका वर्षी ‘थुंकीमुक्त गाव’ अभियानांतर्गत ‘स्पीट बेसिन’तर्फे आपल्या गावात बेसिन बसवून घेण्यास सहकार्य केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दोन गावांच्या सरपंचांचा सत्कार केला होता. जेणेकरून त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल. वनवासी भागातील अनेक शाळांना विविध प्रकारे मदत केली आहे आणि या पुढेही करण्याचा मानस आहे. पोषक आहार, अंडी, शालेय साहित्य, खेळाचे साहित्य, कपडे, शाळेची इमारत उभी करण्यास मदत, आरोग्य तपासणी, वाचनालय, समुपदेशन, स्वच्छता, थुंकीमुक्त गाव अभियानांतर्गत ‘स्पीट बेसिन’ प्रकल्प अशी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संस्था मदत करीत आहेत. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा केला जातो. दि. 8 मार्चला डोंबिवली येथील ‘स्कायवॉक’च्या भिंतीवर भित्तीचित्रे काढून थुंकीमुक्त शहर होण्याच्या दृष्टीने संदेश दिला. या संस्थेने ठाणे जिल्ह्यातील ठाण्यापलीकडील कर्जत-कसार्‍यापर्यंतच्या उपनगरांमध्ये सुरू केलेला ‘फन स्ट्रीट’ हा उपक्रम पहिलाच आहे.
 
 
सातत्याने दिव्यांग आणि विशेष मुलांना साहाय्य केले जाते आणि त्यांच्याबरोबर सण साजरे करून त्यांच्या जीवनात आनंद पेरण्याचा प्रयत्न केला जातो.जानेवारी 2021 मध्ये ‘लॉकडाऊन’च्या काळात ’मिशन चशर्पीीीींरश्र कूसळशपश’च्या अंतर्गत गावोगाव ऑनलाईन सत्र सुरू केली, जेणेकरून वयात आलेल्या मुली आणि महिलांना पाळीच्या वेळेस घ्यावयाची काळजी आणि आरोग्य यावर प्रबोधन केलं. अनेक मुलींना ‘सॅनिटरी पॅड’चे वाटप केले आणि पैसे साठवण्यासाठी डब्बेही दिले, जेणेकरुन रोज त्यात एक रुपया टाकला, तर महिन्याच्या शेवटी त्या स्त्रीला स्वता:च्या पॅडचे पाकीट विकत घेता येईल. 11 ऑक्टोबर या ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिनी’ 2021 मध्ये ‘डोंबिवली वुमेन्स वेल्फेअर सोसायटी’ने 14 वर्षांखालील लहान मुलींचा गट ‘ब्रिलिएंट बटरफ्लाईज् क्लब’ स्थापन केला. या उपक्रमाचा उद्देश मुलींना आणि महिलांना आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मबळ याचे महत्त्व कळावे, महिलांनी स्वाभिमानाने जगावे व आपल्या मुलीलादेखील उज्ज्वल भविष्याची वाट दाखवावी, हा आहे. आपल्या मुलींना निरनिराळ्या उपक्रमांद्वारे आत्मबळ, आत्मविश्वास, आत्मसन्मान या त्रिसूत्रीचे महत्त्व पटवून द्यावे, हा संस्थेचा प्रयत्न आहे.
यंदाच्या ‘बीबीसी’ (‘ब्रिलिएंट बटरफ्लाईज् क्लब’ संचालित) च्या पहिल्याच गणेशोत्सवात त्यांना ‘निर्माल्य पेपर बॅग्स’ हा उपक्रम दिला. अडीच वर्षे ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींनी खूप उत्साहाने जुन्या वर्तमानपत्रांपासून या कागदी पिशव्या बनवल्या. ‘प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा’ हा संदेश संस्थेतील लहान मुली देत आहेत. त्यांचे गावागावात ज्येष्ठांकडून कौतुक होत आहे, याचा संस्थेला अभिमान वाटतो आणि खात्री वाटते की, या मुलांतून निश्चितच उद्याचे उत्तम नागरिक घडतील. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी, दररोज किमान 100 कागदी पिशव्या वाटण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे.
 
 
मुलींच्या गटाचं यश बघून मुलांनासुद्धा स्फूर्ती आली आणि त्यांच्या आई माझ्याकडे बरेच दिवसांपासून करत असलेल्या मागणीनुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी, 9 सप्टेंबर रोजी 14 वर्षांखालील मुलांचा गट स्थापन केला. त्याचे नाव ‘सनशाईन क्लब’ असे ठेवले आहे आणि त्यांची ‘टॅगलाईन’ ‘स्माईलिंग रेज् शायनिंग वेज्’ अशी आहे. एप्रिल 2022 मध्ये हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे गेले असताना तेथील लोकांमध्ये अन्य व्यसनांबरोबर अमली पदार्थांचे व्यसन ही चिंताजनक बाब झाल्याचे लक्षात आले आणि त्यांच्या ’मिशन डी अ‍ॅडीक्शन’ची सुरूवात झाली. व्यसनमुक्तीच्या कार्याला वेग आला. नवरात्रीचा पहिला दिवस, प्रतिपदा, घटस्थापना झाली आणि स्वाती यांनी मनात देवीला म्हणाले की, “मी नऊ दिवस रोज नऊ ठिकाणी ’मिशन डी अ‍ॅडीक्शन’ची सत्रे घेईन आणि त्यांनी त्यांची सुरूवात केली. पहिली तीन सत्रे डोंबिवलीमधील महावीर रुग्णालयाच्या तीन ‘ओपीडी’ मध्ये झाली. रुग्ण आणि नातेवाईक अगदी मनापासून सहभागी झाले. त्यामुळे त्यांना हुरूप आला. चौथे सत्र रेल्वे स्थानकाजवळच्या रिक्षा स्टॅण्डजवळ झाले. त्यानंतर डोंबिवली रेल्वे पोलीस चौकीमध्ये ते गेले. त्यांनी खूप छान सहकार्य केले आणि तिथे असेच नऊ दिवस काम जोमाने सुरू राहिले आणि नऊ दिवसांत 83 व्याख्याने झाली.
 
 
हे काम करणे शक्य होईल तोपर्यंत लोकांना व्यसनमुक्त होण्यास मदत करणार आहे आणि त्या अनुषंगाने ‘थुंकीमुक्त भारत’ अभियानदेखील यशस्वी होईल. हे सगळे कार्य देवीचरणी अर्पण केले आहे. या सत्रांमध्ये स्वाती सामान्य माणसांना त्यांना समजेल, अशा भाषेत व्यसनांचे दुष्परिणाम सांगतात आणि व्यसन सुटण्यासाठी काय करावे, ते समजावून सांगते.कुंजल कदम, प्राजक्ता बनकर, शंतनु बनकर, श्रीकृष्ण गवस, तारकेश जोशी, सुनंदा राणे, शीतल कदम, सुनीता नेहेते, आरती सडेकर, दक्षा ठक्कर, आशा पांडे, आशा ठणवी, जयश्री मेनन, प्रियांका कोरगावकर, विभावरी दळवी, राजश्री धावडे, दिपाली महिंद्रे अशी अनेक नावं घेता येतील, पण सगळ्यांचा उल्लेख करता आला नाही, तरी प्रत्येक सदस्य आमच्या संस्थेचा खांब आहे आणि असंख्य देणगीदार ज्यांनी वेळोवेळी उदार मनाने सढळ हस्ते मदत केली म्हणूनच आम्हाला नियोजित कार्य पार पाडणे शक्य होत आहे. अशा सगळ्यांच्या ऋणात राहणे इष्ट. कारण, त्यांची उतराई होऊ शकत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास अवघड जबाबदारीसुद्धा सहज पेलता येते, हे आमच्या संस्थेने सिद्ध केले आहे आणि सातत्याने मनापासून काम केल्यास ध्येय साध्य होते, हे निश्चित!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.