विकास विरुद्घ चर्च

    28-Nov-2022
Total Views |
 
Wizingham International Seaport
 
 
 
 
केरळच्या विझिंगममध्ये अदानी समुहाकडून उभारल्या जात असलेल्या ‘विझिंगम सीपोर्ट’च्या विरोधामागे आणखी एक अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे, ख्रिश्चन चर्च व त्यांच्या म्होरक्यांना संबंधित परिसरात आपला प्रभाव कमी होण्याची वाटणारी भीती.
 
 
केरळमध्ये उद्योगपती गौतम अदानी 900 दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या ‘विझिंगम इंटरनॅशनल सीपोर्ट’ची उभारणी करत आहेत. मात्र, याविरोधात गेल्या 120 दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. त्यातच शनिवारी पोलिसांनी विरोध करणार्‍या पाच जणांना अटक केली. त्याला विरोध म्हणून रविवारी लॅटिन कॅथलिक चर्चच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन जमावाने विझिंगम पोलीस ठाण्यावर हल्ला केला. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर लाठ्या-काठ्यांनी व दगडांनी हल्ला केल्याच्या चित्रफितीही ‘व्हायरल’ झाल्या आहेत. त्या सर्वांचेच म्हणणे, ‘विझिंगम इंटरनॅशनल सीपोर्ट’ प्रकल्प रद्द करावा, असेच आहे.
 
 
आता याप्रकरणी आर्चबिशप थॉमस जे. नेट्टो, फादर ख्रिस्तुदास, फादर यूगिन परेरा यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर नियमानुसार, कारवाई होईल व सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली असूनही प्रकल्पाला विरोध केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाचीही कारवाई होईल. पण, या घटनाक्रमातून ख्रिश्चन चर्चचा, तिथल्या पाद्य्रांचा विकासविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. याआधीही जिथे जिथे ख्रिश्चन लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होती वा आहे, तिथे निवडक ख्रिश्चन समुदायाने विकासविषयक कामांना, प्रकल्पांना मोठा विरोध केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्या विरोधामागे अनेक कारणे आहेत.
 
 
विकासप्रकल्प सुरळीतपणे राबवले गेल्यास संबंधित परिसरात समृद्धीचा प्रवेश होत असतो. बर्‍याचदा ख्रिश्चन चर्च, पाद्री वगैरे धर्मप्रचाराच्या नावाखाली गाव, शहरे, किनारपट्टीलगतच्या अविकसित, वंचित-शोषित समुदायाच्या भागात जात असतात. तिथे सर्वसामान्यांच्या समस्यामुक्तीचा एकमेव उपाय आमच्याकडे असून तुम्ही चर्चमध्ये या, असे आवाहन केले जाते. त्याला भुलून त्या त्या ठिकाणी राहणारे लोक चर्चमध्ये जातात व त्या ठिकाणी ख्रिश्चन पाद्य्रांकडून धर्मांतराचे जाळे फेकले जाते. धर्मांतर केल्यास तुमचे दारिद्य्र, आजारपण दूर होईल, असे आमिषही त्या समूदायांना दाखवले जाते.
 
 
अर्थात, चर्चमध्ये गेल्याने नव्हे, तर मेहनत केल्याने, हाताला काम देणारे प्रकल्प उभे ठाकल्याने, शाळा-महाविद्यालयांत आधुनिक शिक्षण घेतल्यानेच दुःख-दैन्य दूर होत असते. पण, त्याच्याशीच गरिबीत जगणार्‍या समुदायांचा परिचय होऊ नये या उद्देशाने ख्रिश्चन चर्चचे काम सुरू असते. म्हणूनच ठिकठिकाणच्या विकासविषयक प्रकल्पांना विरोध करण्यात ख्रिश्चन चर्च व निवडक ख्रिश्चन समुदाय आघाडीवर असतो. केरळच्या विझिंगममध्ये अदानी समुहाकडून उभारल्या जात असलेल्या ‘विझिंगम सीपोर्ट’च्या विरोधामागे हेदेखील एक कारण आहे. मात्र, विरोधामागचे हे एकमेव कारण आहे, असे नव्हे. विकासप्रकल्पाला विरोध करण्यामागचे त्यापेक्षाही आणखी एक अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे, ख्रिश्चन चर्च व त्यांच्या म्होरक्यांना संबंधित परिसरात आपला प्रभाव कमी होण्याची वाटणारी भीती.
 
 
मुंबईतील आरे वसाहतीमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये म्हणून गेल्या काही काळामध्ये आंदोलने करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा आव आणून मेट्रो कारशेडमुळे हजारो झाडांची कत्तल होईल, मुंबईचा श्वास कोंडेल, अशी भीती दाखवली गेली. त्या आंदोलनाची सूत्रे हलवणार्‍यांमध्ये ख्रिश्चन चर्चचा सहभाग होता. ‘आरे वाचवा’ असे म्हणत त्यांनी आपल्या शाळांना व शाळकरी मुलांनाही रस्त्यावर उतरवले होते. त्याआधी ख्रिश्चन चर्चने गोव्यापर्यंत जाणार्‍या कोकण रेल्वेलादेखील विरोध केला होता. कोकण रेल्वेच्या विरोधामागेही दिखाव्यासाठी पर्यावरणाची हानी होईल, असे कारण सांगितले गेले. तरीही कोकण रेल्वेची उभारणी झाली. पण, रेल्वे असूनही गोव्याचे राजधानीचे ठिकाण मात्र रेल्वेने जोडले गेलेच नाही. आजही पणजीला रेल्वे जात नाही, तर करमळी रेल्वे स्थानकावर उतरून तिथे जावे लागते. आरेतील मेट्रो कारशेड असो वा कोकण रेल्वेला विरोध करण्यामागचे सर्वात मोठे कारण त्या त्या ठिकाणचे लोकसंख्येचे संतुलन बिघडू नये, हेच होते. गोव्यामध्ये तर पोर्तुगीजांनी राज्य केल्याने ख्रिश्चनांची संख्या मोठी आहे. म्हणजे, मतदारांतही ख्रिश्चनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
 
 
पण, रेल्वे आली तर त्यात बसून उत्तर भारतापासून इतरत्रचे लोकही गोव्यात येतील, पणजीत येतील व कालांतराने इथेच स्थायिक होतील. त्याने गोव्यातील लोकसंख्येचे गणित बिघडेल व ख्रिश्चन मतदारांची संख्या कमी होईल, म्हणजेच ख्रिश्चन समुदायाचा राजकीय प्रभाव संपू लागेल, अशी भीती ख्रिश्चन चर्च व ख्रिश्चन समुदायाला होती. म्हणून त्यांनी कोकण रेल्वेला विरोध केला. इतकेच नव्हे, तर इतरही ठिकाणच्या विकास प्रकल्पाला विरोध करण्यामागेही ख्रिश्चन समुदाय पुढाकार घेतो, तो याच कारणामुळे.
 
 
केरळमधील ‘विझिंगम सीपोर्ट’ला विरोध करणार्‍यांतही ख्रिश्चन समुदाय, ख्रिश्चन चर्चचा सहभाग असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट होते. सीपोर्टची निर्मिती झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आजूबाजूच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होईल. तसेच, सीपोर्टमध्ये काम करण्यासाठी येणार्‍यांची, संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या भागातील कामगारांचीही संख्या वाढेल. त्यांचे विचार ख्रिश्चन चर्चशी मिळते-जुळते असतीलच असे नव्हे. त्यातून ख्रिश्चन चर्चला आव्हान दिले जाऊ शकते. अनेक मतदारसंघात ख्रिश्चन समुदायांचे प्राबल्य असते व तिथला उमेदवार कोण असावा हेदेखील त्यांच्या कलानुसार ठरवले जाते. तसेच ते ज्यांना मतदान करतील तो विजयीही होतो व ख्रिश्चन चर्च आणि ख्रिश्चन समुदायाला पूरक ठरतील, असे निर्णय घेत असतो.
 
 
पण, विकास प्रकल्पांमुळे तसे होण्याची शक्यता संपुष्टात येते. ‘विझिंगम सीपोर्ट’मुळे तसे होऊ शकते. म्हणूनच त्याच्या विरोधासाठी ख्रिश्चन चर्च व ख्रिश्चन समुदाय रस्त्यावर उतरल्याचे दिसते. गेल्या 120 दिवसांपासून इथे त्यामुळेच आंदोलन सुरू आहे. त्यांच्या अन्य मागण्या सरकारने मान्यही केलेल्या आहेत, पण सीपोर्टची उभारणीच करू नये, ही मागणी मान्य करण्याच्या मनःस्थितीत सरकार नाही. त्यामुळेच आता पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. ख्रिश्चन चर्चचा हा चेहरा सर्वांनी ओळखला पाहिजे व विकासप्रकल्पांना व्यापक समर्थन दिले पाहिजे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.