प्रेमाच्या गुलाबाचे काटेरी वास्तव

28 Nov 2022 20:20:10
 
श्रद्धा वालकर
 
 
 
 
लोक अशा हिंसक आणि अपमानास्पद नातेसंबंधात का राहतात, हा प्रश्न बरेचदा पडतो. अर्थात, जे लोक अशा नात्यात राहतात, याचा अर्थ ते त्यासाठी जबाबदार आहेत, असं त्यात सुचविण्यासारखे आहे. जे सारासार विचार करतात, तथ्यात्मक वाटत नाही. त्याऐवजी हानी करणार्‍या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराला सोडून जाण्यापासून कसे रोखतात? यासारखे प्रश्न किंवा अशी हिंसा करणारे गुन्हेगार, ज्या व्यक्तीवर प्रेम करत असल्याचा दावा करतात, त्यांना इतक्या क्रूरपणे का छळतात? या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणे अधिक योग्य ठरेल.
 
 
श्रद्धा वालकरच्या तिच्या मित्राने केलेल्या भेसूर हत्येनंतर अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले. श्रद्धासारखी अत्यंत चैतन्यशील आणि चपळ मुलगी आपली विकृत आफताबच्या तावडीतून सुटका कशी करुशकली नाही, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. क्रूरकर्मा आफताब श्रद्धाला छळत होता, मारत होता. त्याशिवाय तो तिचे मानसिक शोषणही करत होता. असे तिच्या ‘चॅट्स’मधून समोर आले आहे. श्रद्धाचा एक जुना फोटो ‘व्हायरल’ होतोय, यामधून आफताबची क्रूरता दिसत आहे. तिच्या मित्रांनी तिच्या शरीरावर या छळाच्या खुणा पाहिल्या होत्या, असे आता समोर आले आहे. तिने लिहिलेल्या पत्रात आफताबने आपल्यावर अनेक वेळा हल्ला केला होता आणि तो आपल्याला मारेल, अशी भीतीदेखील व्यक्त केली होती.
 
 
एकदा तिने पोलिसात याबाबत तक्रार केली आणि ती नंतर मागेही घेतली होती. तिच्या मित्रांकडून असेही कळले की, आफताब भावनिकरित्या तिला ‘ब्लॅकमेल’ करायचा आणि तिने त्याला सोडल्यास आत्महत्या करून मरण्याची धमकी द्यायचा. इतकंच नव्हे तर श्रद्धा तिच्या मित्र-मैत्रिणींशी फोनवर बोलत असे. पण, नंतर नंतर तिची हत्या होण्याच्या काही दिवस आधी, मे-अखेरपर्यंत श्रद्धाने आपल्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणेदेखील बंद केले होते. या प्रकरणात पुढे येणारे हे सर्व मुद्दे हेच दर्शवितात की, आफताब आणि श्रद्धाचे संबंध अत्यंत अस्वस्थ, विखारी, अविश्वासावर आधारित होते, ज्यात श्रद्धासारख्या जाणत्या मुलीला तिच्या ‘रोमॅण्टिक’ नात्यात अनेक लाल झेंडे दिसले असणारच. तिच्या वडिलांनी तिला यातून बाहेर पडण्याचे सुचविले होते, असे ते सांगतात. मात्र, त्यातून बाहेर कसे पडायचे, हे तिला कळत नव्हते. आज जगात अनेक महिलांनाही असाच सामना करावा लागतो. पण, विवाहित किंवा ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधातील ही हिंसक बाजू ओळखणे तितके सोप्पे नाही आणि ते बर्‍याच वेळा गुंतागुंतीचेही असू शकते. कधीकधी स्त्रिया अशा रौद्र विषारी नातेसंबंधांमध्ये जास्त काळ टिकून राहतात आणि काही वेळा तर त्या खूप लवकर किंवा कारण नसतानाही सोडून देतात.
 
 
 
अशा प्रकारचे हिंसक आणि अपमानास्पद नातेसंबंध एखाद्याला मानसिक आणि शारीरिकरित्या हैराण करू शकतात. ज्या व्यक्तीशी ते प्रेमसंबंध निर्माण करण्याचा निर्णय घेतात, त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी महिलांना जाणीवपूर्वक वेळ काढावा लागतो. अशा हिंसक नात्यात व्यक्तीचे भावनिक शोषण हे खूप खोल आहे. कारण, ते केवळ बुद्धीलाच नाही, तर आत्म्यालादेखील प्रभावित करते.
 
 
आज अनेकजण, वार्ताहर, राजकीय नेते, सामान्य माणूस सगळेच एकच प्रश्न, या प्रकरणात वारंवार विचारीत आहेत की, श्रद्धाने क्रूर आफताबला का सोडले नाही? काहींनी श्रद्धाला घरी पुन्हा न बोलावल्याबद्दल तिच्या वडिलांनाही दोष दिला. काहींनी श्रद्धासारखी चमकदार मॉडर्न मुलगी आपल्या रितीभाती ना पाळता, आपले घर सोडून, रितीभातींची सीमा ओलांडून अशा हिडीस प्रियकराच्या मागे सहज निघून जाण्याचे धाडस करते म्हणून आधुनिक संस्कृतीवर आरोप केले आहेत, तर काहींनी स्त्रीवादाला आणि स्त्रीच्या मानसिकतेला दोष दिला.
 
 
लोक अशा हिंसक आणि अपमानास्पद नातेसंबंधात का राहतात, हा प्रश्न बरेचदा पडतो. अर्थात, जे लोक अशा नात्यात राहतात, याचा अर्थ ते त्यासाठी जबाबदार आहेत, असं त्यात सुचविण्यासारखे आहे. जे सारासार विचार करतात, तथ्यात्मक वाटत नाही. त्याऐवजी हानी करणार्‍या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराला सोडून जाण्यापासून कसे रोखतात? यासारखे प्रश्न किंवा अशी हिंसा करणारे गुन्हेगार, ज्या व्यक्तीवर प्रेम करत असल्याचा दावा करतात, त्यांना इतक्या क्रूरपणे का छळतात? या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणे अधिक योग्य ठरेल.
 
 
बर्‍याच वेळा ‘सामाजिक कलंक’ किंवा ‘सोशल स्टिग्मा’ समाजात या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. अगदी शहरे आणि गावांमध्येसुद्धा जेव्हा स्त्रिया, अशा हिंसक विषारी नातेसंबंधातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात, तेव्हा बरेच पालक व इतर नातेवाईक त्यांना परत घेतील का नाही, ही शंका असते. श्रद्धाच्या बाबतीत आंतरधर्मीय कारणामुळे ‘लोग क्या कहेंगे’ हा प्रश्न होताच. श्रद्धाच्या दुर्दैवी खुनानंतर सर्व पालकांसाठी एक धडा शिकण्यासारखा आहे. विशेषत: घरातील तरुण कन्या तुमच्या मूल्यांच्या विरोधात आहेत, तुमच्या मनाविरुद्ध अशा गोष्टी करतात, म्हणून मुलांना समाजाच्या व नीतिमूल्यांच्या नावाखाली सोडून देऊ नका. त्यांच्यासाठी आपल्या घराचा दरवाजा कधीही बंद करू नका. त्यांना गोंधळ घालण्याचा अधिकार द्या, त्यांना गडबड करू द्या आणि त्यांच्या चुका आणि दुःखातून शिकू द्या आणि लवचिक होऊ द्या. श्रद्धासारखे अत्याचाराचे अनेक बळी, घरगुती हिंसाचाराचे बहुतेक बळी हिंसा, भीती आणि अपराधीपणाच्या चक्रात अडकतात. त्यांच्याकडे तर्कशुद्धपणे सारासार विचार करण्याचा दृष्टिकोन किंवा मानसिकता सहसा नसते. कोणत्याही प्रकारच्या अवहेलनाबद्दल गुन्हेगाराच्या तत्काळ प्रतिक्रियेची भीती, नकारात्मक सामाजिक प्रतिक्रिया आणि कलंकाची भीती पुराणमतवादी समाजांमध्ये आढळणारे सत्य आहे.
 
 
शारीरिक आणि मानसिक शोषण करणार्‍या जोडीदाराला सोडणेही तितकेच धोकादायक असू शकते. जर त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला तर हिंसाचार अनुभवत असलेल्या जोडीदाराला वास्तविकपणे अशी भीती वाटते की, त्यांना तो अपमान वाटून ते अधिक हिंसक आणि प्राणघातक बनतील. अत्याचार करणार्‍या जोडीदाराने वेळोवेळी त्यांना मारून टाकण्याची किंवा त्यांचे मूल, कुटुंबातील सदस्यांना इजा करण्याची धमकी दिलेली असते. बर्‍याच वेळी श्रद्धासारख्या व्यक्तीच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना या शोषणाविषयी खोलवर माहिती नसावी किंवा ते तिला सोडून येण्यास समर्थन देत नसतील किंवा तिच्याकडे मागे वळण्यासाठी कोणीही आधाराला नसू शकते. कारण, हा हिंसक जोडीदार या व्यक्तीला इतरांपासून तोडण्यात व तिला एकटं पाडण्यात यशस्वी झालेला असतो. आफताबने हेच केलेले दिसून येते. (क्रमश:)
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0