विमान विमान...

    28-Nov-2022
Total Views |
 
पुणे
 
 
 
पुणे शहराची जागतिक ओळख कायम टिकवून ठेवण्यासाठी कालानुरूप बदल करीत राहणे आवश्यक असते. भारताकडे ‘जी 20’चे अध्यक्षपद आल्यानंतर आपण विश्वकल्याणावर भर देणार असल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच ’मन की बात’ मधून सांगितले. त्यामुळे आपसूकच पुण्याचं ऐतिहासिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आता अत्याधुनिक वैभव चिरंतन ठेवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे, त्यात ‘जी 20’चे पाहुणे पुण्यातदेखील दाखल होणार आहेत.
 
 
पुण्याची ओळख आता झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून होत आहे. पायाभूत सुविधांचा विकास ही त्याची पहिली पायरी आहे. त्यादृष्टीने बदलते परिमाण लक्षात घेऊन प्रगतीचे टप्पे गाठले जात आहेत. त्यासाठी आता पुण्याच्या विमानसेवेवर लक्ष केंद्रित केले जात आहे. कारण, विमानसेवेच्या माध्यमातून हवाई कनेक्टिव्हिटी वाढविणे हे प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्वाचे म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून या हालचाली होताना दिसत आहेत. दि. 12 नोव्हेंबरपासून पुणे-बँकॉक थेट विमान सेवा सुरू झाली. आता गुरुवार, दि. 1 डिसेंबरपासून पुणे-सिंगापूर विमान उड्डाण घेणार आहे. येथील धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. देशाचे विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया अलीकडील काळात पुण्यात दोन-तीन भेटी देऊन गेले. त्यामुळे या शहरातील विमानसेवा, निगडित अन्य प्रकल्प, सोईसुविधा कामांना गती मिळत आहे. या विमानतळावर अत्याधुनिक असे ‘मल्टिलेव्हल पार्किंग’चा शुभारंभही सिंधियांनी नुकताच केला. त्यावेळी त्यांनी पुण्यात देशांतर्गत आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय करणार असल्याचे सांगितले. नव्या टर्मिनलचा विस्तार मे 2023 पर्यंत केला जाणार आहे. या विमानतळावरील गर्दी कमी करणे आणि प्रवासी सुविधेसाठी आठ वरून 14 स्लॉट करण्यात आले आहेत. या विमानतळावर सुरुवातीला 20 ते 25 विमानांची देशांतर्गत उड्डाणे होत होती, आता दिवसागणिक 160 ते 170 विमाने रोज उड्डाणे घेतात, यातून जवळपास 25 हजार प्रवासी प्रवास करतात. पुण्याचा संपर्क नियमित जागतिक पातळीवर होत राहावा आणि ‘लोकल टू ग्लोबल’ हे सूत्र खर्‍या अर्थाने यशस्वी व्हावे, ही अपेक्षा आता करायला हरकत नाही.
 
 
बस बस...
 
 
पुण्याच्या गतिमान समाजजीवनाला दिलासा देणारी पुणे महानगर प्राधिकरणाची शहर बससेवा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. तथापि, याचा सकारात्मक भाग लक्षात घेतला तर रोज आपल्या महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी प्रवाशांना वेळेत नेऊन पोहोचविणारे ‘पीएमपीएमएल’चे सेवाकार्य पुणेकरांच्या सोयीचे तर आहेच. मात्र, यामुळे सार्वजानिक वाहतूक व्यवस्थादेखील या गतिमान काळात किती उपयुक्त ठरते, याचा आदर्शदेखील या सेवेने निर्माण केला आहे, याची दखल यासाठी घ्यावी लागत आहे. कारण, यामुळे या व्यवस्थेला आपल्या सेवा बंद केलेल्या मार्गांवर पुन्हा सुरू करण्याचा फेरविचार तर करावा लागतच आहे. मात्र, शहरातील प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन नव्या मार्गांवरदेखील बस सेवा सुरू करणे भाग पडले आहे. अलीकडील काळात या महानगरातील चतुश्रृंगी ते कोथरूड आणि गोखले नगर ते डेक्कन जिमखाना या मार्गावर बस सेवा सुरू झाली. यामुळे सेनापती बापट रस्ता, नळ स्टॉप पौड रस्ता, वनाज, लॉ कॉलेज रस्ता, आनंद नगर शिवाय आयसीसी टॉवर्स, मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, भांडारकर रस्ता, विश्राम बाग सोसायटी, शिवाजी सोसायटी आणि सभोवतालच्या परिसरातील नागरिकांना सुविधा झाली आहे. या शिवाय कालपासून पुणे स्टेशन ते डिफेन्स कॉलनी अशी बस सेवा सुरू झाली. आता 2 हजार, 142 शहर बस धावत आहेत. यात ‘सीएनजी’ 1 हजार, 594, इलेक्ट्रिक 398 आणि डिझेलवरील 150 गाड्या धावत आहेत. विशेष म्हणजे, एसटी संप होता, त्यावेळी ग्रामीण भागातील प्रवाशांना या शहर बस सेवेने मोठा हातभार लावला होता. मात्र, एसटीचे नुकसान होऊ नये, म्हणून अशा 11 मार्गांवरील सेवा बंद केली होती. परंतु, या भागातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ही सेवा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. त्यात महिला प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना योग्य सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून 19 मार्गांवर 24 महिला बसेसदेखील सुरू झाल्या आहेत. तेव्हा, पुणेकरांनीही ‘स्वच्छ पुणे, हरित पुणे’ हा नुसता नारा न देता, प्रत्यक्ष सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पुणेकरांनीही आपला सहभाग नोंदवणे तितकेच महत्त्वाचे!
 
 
 
- अतुल तांदळीकर
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.