बीज अंकुरे अंकुरे भाग-18

    28-Nov-2022
Total Views |
 
मानस पथ्य
 
 
 
 
मागील लेखांमधून स्त्री शरीर व पुरुष शरीर विशेषत: प्रजननासाठी आरोग्यदायी असावेत, अशा अवयवांबद्दल, त्यांच्या प्राकृतिक कार्याबद्दल व त्यांच्यातील विकृती याबद्दल आपण सविस्तर वाचले. आरोग्य म्हणताना केवळ शारीरिक आरोग्य अपेक्षित नाही, त्याचबरोबर मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्यही इथे अभिप्रेत आहे, तसेच पथ्यापथ्यचा विचार करताना फक्त आहारीय पथ्याचा विचार करू नये, यात विहारीय व मानस पथ्यसुद्धा अपेक्षित आहे. मानस पथ्य म्हणजे नक्की काय? व सुप्रजननामधील मानस पथ्ये कोणती? याबद्दल आज जाणून घेऊयात.
 
 
पथ्य म्हटले की, काही रुग्णांची नाके मुरडली जातात. डॉक्टर नेहमीच ‘हे खाऊ नका, ते खाऊ नका’ सांगत असतात. पथ्य आणि अपथ्य/कुपथ्य या खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू. अपथ्य/कुपथ्य हे व्याधिकारक कारणे होत. उदा. ज्याला वारंवार सर्दी होते, त्याने जर रात्री आईस्क्रीम खाल्ले किंवा थंड पाणी प्यायले, सीताफळ, केळी, अतिप्रमाणात चॉकलेट्स खाल्ली, तर सर्दी हमखास होते आणि सर्दी असल्यास त्याचा जोर वाढतो. थोडक्यात काय, तर विविध रोगांच्या उत्पत्तीच्या कारणांना कुपथ्य/ अपथ्य म्हणावे व रोग होण्यासाठी तसेच वारंवार आजारी पडू नये, यासाठी घेतलेली काळजी म्हणजे पथ्य होय. या पथ्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे, केवळ ‘आहारापुरतेपथ्य’ ही कल्पना मर्यादित नाही. पथ्य म्हणजे निरोगी राहण्यासाठी, आरोग्य टिकविण्यासाठी दैनंदिन जीवनातील बदल व ‘रुटिन’ यामध्ये विहारीय, आचरणीय व मानसिक पथ्याचा ही समावेश आहे.
 
 
सुप्रजननासाठी असे एक आहारीय-विहारीय पथ्याइतकेच महत्त्वाचे पथ्य म्हणजे ब्रह्मचर्य पालन. ‘ब्रह्मचयर्र्’ या शब्दाचा हल्ली विचारात घेतला जाणार अर्थ म्हणजे शरीरसंबंधांवरील संयम. परंतु, हा एवढाच विचार आयुर्वेदात अभिप्रेत नाही. सुप्रजननासाठी शरीरसंबंधांवरील संयम फायद्याचा नाही. पण, त्याचे विविध पैलू लक्षात घेणे, आचरणात आणणे हेही तितकेच गरजेचे आहे. समागम कधी करावे, कुणाबरोबर करावे, किती वेळा करावे, त्यासाठी लागणारी शुचिता/शुद्धी. (केेवळ शारीरिक शुद्धी अपेक्षित नाही, तर मानसिक, भावनिक, बौद्धिकही शुचिता महत्त्वाची आहे.)
 
 
गृहस्थाश्रमातील ब्रह्मचर्य हे विरक्तीतील ब्रह्मचर्यापेक्षा भिन्न आहे. गृहस्थाश्रमामध्ये एक भार्या (पत्नी) किंवा एकमेव जोडीदार यांच्याबरोबर संबंध अपेक्षित आहेत. तसेच विशिष्ट वयाचे अंतर दोघांमध्ये असणे (दोन ते पाच वर्षे) गरजेचे आहे. स्त्रीचे वय 18 पेक्षा कमी व पुरुषाचे वय 21 पेक्षा कमी नसावे. हल्ली मासिक पाळी लवकर येऊ लागली आहे. लैंगिक शिक्षणही विविध माध्यमांतून खूप खुलेआम होताना दिसते. म्हणजे, शरीर वाढू लागले आहे, मनात इच्छा पण जागृत होते, पण शरीर संपूर्णपणे तयार, सक्षम झालेले नसते. (स्त्रीचे 18 वर्षांखाली, पुरुषाचे 21 वर्षांआधी) त्यामुळे या वयाच्या आधी प्रजोत्पादन टाळावे.
 
 
प्रजोत्पादनाच्या उद्देशानेच शारीरिक संबंध ठेवणे अपेक्षित आहे. यासाठी स्त्रीच्या मासिकचक्रावर ‘सेफ पीरिएड’ आणि ‘फर्टाईल पीरिएड’ ठरविला जातो. गर्भ राहणे टाळायचे असल्याने, कॉनस्पेशन होऊ नये, यासाठी ‘सेफ पीरिएड’मध्ये संबंध ठेवल्यास दिवस राहत नाही. अर्थात, हे समजण्यासाठी मासिक पाळी नियमित असणे (नियमित अंतराने व ठरावीक दिवसांच्या अवधीत असणे) महत्त्वाचे आहे. ‘सेफ पीरिएड’मध्ये संबंध ठेवल्यासही गर्भधारणा क्वचित होऊ शकते, हे मात्र ध्यानात ठेवावे. स्त्रीच्या मासिक धर्माच्या वेळेस (सुरू असताना) शारीरिक संबंध ठेवू नयेत. आयुर्वेदातया दिवसांमध्ये शारीरिक संबंध निषिद्ध मानले आहेत. मासिकपाळीच्या चक्रामध्येदेखील विशिष्ट तीन-चार दिवस असतात, ज्यात गर्भधारणा राहण्याची सर्वात अधिक शक्यता असते. त्याच दिवसांमध्ये संबंध ठेवणे व इतर दिवसांमध्ये टाळणे हे गृहस्थाश्रमातील ब्रह्मचर्येचे पहिले पाऊल आहे.
 
 
गर्भधारणा झाल्यानंतर शारीरिक संबंध गर्भिणी अवस्थेपुरते टाळावेत. हादेखील ब्रह्मचर्येतीलएक नियम आहे. संभोग टाळणे हे केवळ शारीरिक नसून, त्याला मानसिक, भावनिकही आयाम आहेत. शारीरिक क्रिया-चेष्टा टाळली व विचार, वाचन, चिंतन, श्रवण, दर्शन इ. विविध ज्ञानेद्रियांमार्फत या संवेदनांचे ग्रहण व कर्मेंद्रियांमार्फत त्यावर आचरण हेदेखील एक प्रकारे संभोगच होतो. ब्रह्मचर्येचे पालन म्हणजे असे आचरण टाळणे होय. हस्तमैथुन व अन्य क्रिया करताना बरेच काल्पनिक व्यक्ती/ठिकाण/वस्तू यावर विचार केला जातो. ध्वनिचित्रफीत, मासिके इत्यादींचा वापर अधिक केला जातो. पण, यावर कितीही वेळा व कोणी हे नियम आहेतच. अतिहस्तमैथुनाने विविध स्थानिक तक्रारी तर उत्पन्न होतातच, त्याचबरोबर अन्य शारीरिक व मानसिक तक्रारीदेखील उद्भवतात. चीडचीड वाढणे, कामात लक्ष न लागणे, लक्ष केंद्रित करण्यास कठीण जाणे इ. लक्षणे उद्भवतात व शुक्रवेग आला असता धारण केल्याने अन्य त्रास होतात. म्हणजेच काय, तर संयम हा केवळ शारीरिक क्रियेचा नव्हे, तर मानस, भावभावनांचा असावा लागतो.
 
 
या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असल्यास सर्वप्रथम असे वाड्मय, दृक्श्राव्य चित्र इ.पासून लांब राहावे. शारीरिक, अंग मेहनत करावी-व्यायाम करावा. चांगले ऐकावे, चांगले बघावे. राजसिक-तामसिक आहार व वातावरणापासून दूर राहावे. हस्तमैथुन करायचे झाल्यास ते वारंवार केले जाणार नाही, याची दखल व काळजी घ्यावी. कारण, त्याची ‘व्यसनाधीनता’ कधी होईल, ते सांगता येत नाही. मानसिक लगाम/नियंत्रण सगळ्यात महत्त्वाचे ठरते. म्हणून याला ‘मानस पथ्य’ म्हटल्यास चुकीचे होणार नाही. एकच जोडीदार हल्लीच्या ‘फास्ट लाईफ’मध्ये आयुष्यभर असेलच असे नाही. पण, कुठल्याही नवीन नात्याची सुरुवात करतेवेळी पहिल्या नात्यातील ताटातूट संपूर्ण झाली आहे की नाही, हे मात्र प्रत्येक व्यक्तीने नक्की तपासून बघावे. केवळ शारीरिक ‘ब्रेक-अप’ नाही, तर ‘इमोशनल ब्रेक-अप’ही महत्त्वाचा आहे. शुचिता ही केवळ शारीरिक नाही, तर भावनिकही लागते. एक पती-पत्नी व्रत असणे संपूर्णपणे महत्त्वाचे!
 
 
बरेचसे ब्रह्मचर्य पालनातील नियम बदललेले नाहीत. पण, काही आयामांची त्यात अधिक भर नक्कीच पडली आहे. म्हणून गृहस्थाश्रमातील ब्रह्मचर्य पालन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. (क्रमश:)
 
 
 
-वैद्य कीर्ती देव
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.