महिला सशक्तीकरणाचे दुसरे नाव बुधरी ताती

28 Nov 2022 21:38:32
 
बाया कर्वे पुरस्कार
 
 
 
 
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यावर्षी दंतेवाडा, छत्तीसगढ येथे कार्यरत ‘मां शंकिनी महिला उत्थान केंद्र, हिरानार आश्रम विकास खंड, कार्यक्षेत्र - गीदम, छत्तीसगढ’च्या डॉ. बुधरी ताती यांना जाहीर झाला आहे. गेली 33 वर्षे अत्यंत कठीण अशा भौगोलिक, नक्षलग्रस्त वनवासी क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व आत्मनिर्भरता या विषयात त्या कार्यरत आहेत. आज या पुरस्कार वितरणानिमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यावर्षी दंतेवाडा, छत्तीसगढ येथे कार्यरत ’मां शंकिनी महिला उत्थान केंद्र, हिरानार आश्रम विकास खंड, कार्यक्षेत्र - गीदम, छत्तीसगढ’च्या डॉ. बुधरी ताती यांना जाहीर झाला आहे. गेली 33 वर्षे अत्यंत कठीण अशा भौगोलिक, नक्षलग्रस्त वनवासी क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व आत्मनिर्भरता या विषयात त्या कार्यरत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना अत्यंत आदरपूर्वकरित्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने पुणे येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘अ‍ॅम्फी हॉल’मध्ये ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते दि. 29 नोव्हेंबर रोजी सायं 5. 30 वाजता सन्मानित करण्यात येत आहे. एक लाख एक हजार रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
125 वर्षांपूर्वी भारतरत्न महर्षी कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या शताब्दी वर्षापासून म्हणजेच 1996 पासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना महर्षी कर्वे यांच्या पत्नी आनंदी बाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचा नावे देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. समाजाच्या उत्थानाकरिता, संबंधित समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता एखाद्या सामजिक प्रश्नाचा पाठपुरावा करीत, त्या प्रश्नावर असामान्य व अद्वितीय असे प्रेरणादायी कार्य उभ्या करणार्‍या महिलांचा सन्मान यानिमिताने संस्थेमार्फत केला जातो. या कामासह, या महिलांनी या कार्य उभारणीत पेललेली आव्हाने व अडचणींची ही विशेष ओळख यानिमित्ताने समाजाला करून दिली जाते.
 
 
डॉ. बुधरी ताती यांनी वयाच्या 15व्या वर्षीच आपले जीवन हे वनवासी समाजाच्या उत्थानाकरिता समर्पित करण्याचा निश्चय केला. वनवासी कल्याण आश्रमाच्या कामातून प्रेरणा घेत त्यांनी पूर्णकालीन कार्यकर्ती म्हणून दायित्व स्वीकारले. पुढे राष्ट्र सेविका समितीच्या संपर्कात आल्यामुळे, महिलांचे म्हणून जे विशेष प्रश्न असतात, ते हाती घ्यावेत, असे त्यांना वाटू लागले. महिलांचे प्रश्न हाताळताना लागणारी विविध कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी राष्ट्र सेविका समितीमार्फत आयोजित प्रशिक्षण वर्गातून अनेक विषयांवर प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणांमुळे त्यांचा स्वत:वरील व हाती घेऊ इच्छित कामावरील विश्वास वाढीसच लागला. 1980च्या दशकात त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली.
 
 
पदोपदी गोळ्या, स्फोटके, एन्काऊंटर, पोलीस नक्षली संघर्ष या सगळ्यातून मोठ्या धाडसाने त्यांनी आपल्या कार्यातून, एका दुर्लक्षित अशा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची किमया केली. अबुझमाड या भागातील 400 गावांचा व गावातील महिलांचा नेमका प्रश्न समजून घेण्याकरिता त्यांनी या गावांना पायी प्रवास करीत भेटी दिल्या. वनवासी भाग व त्यात नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे अनेकदा त्यांचा सामना नक्षलवाद्यांशी झाला. मात्र, मनाचा निश्चय व या कामाप्रति असलेल्या निष्ठा व प्रेमामुळे, अशा अनेक प्रसंगांतून त्या अधिकच खंबीर व धीट झाल्या. म्हणूच या परिसरात त्यांना महिला मोठ्या मायेने ‘बडी दीदी’ असे संबोधतात. अशा अनेक प्रसंगातून त्या, हाती घेतलेल्या कामाशी समरस होत गेल्या. आपण सगळेच जण त्यांना त्यांच्या नावाने ओळखतो. मात्र, दक्षिण बस्तरमध्ये त्या ’महिला सशक्तीकरणाचे’ दुसरे नाव आहे.
 
  
आपले काम, हाच आपला प्रपंच हे मानणार्‍या बुधरीजींनी अविवाहित राहण्याचा संकल्पच केला. त्यांच्यासह काम करणार्‍या सर्वच कार्यकर्त्या या अविवाहित राहून वनवासी समाजाची सेवा करण्याचा संकल्प करतात, हेही विशेष. वनवासी क्षेत्रातील 500हून अधिक महिलांना शिवण-विणकाम, कुटीर उद्योगांचे प्रशिक्षण देत त्यांना आत्मनिर्भरतेच्या वाटेवर चालायला शिकविले. त्यांच्या जगण्यातील आत्मविश्वास वाढविला. अज्ञान, दारिद्—य इ. कारणांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या महिलांना भेटून, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून, अनेक महिलांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणले. अंधश्रद्धा, अज्ञान, अशिक्षितपणा, यामुळे वनवासी समाजात अनेक चुकीच्या समजुती असतात. रोज अंघोळ न करणे, व्यक्तिगत स्वच्छतेचा अभाव, देवीचा प्रकोप होईल, या भीतीपोटी औषधे खाण्यास नकार अशा अनेक बारीकसारीक सवयी व चुकीच्या पद्धतींवर त्यांनी काम केले. या कामातून अनेक वनवासी कुटुंबांची त्या ‘आरोग्य सखी’ झाल्या.
 
 
गावपातळीवरील कामाच्या अनुभवातून पुढे त्यांनी संस्थात्मक कामाची मुहूर्तमेढ रोवली. सन 1990 मध्ये हिरानार-दंतेवाडा येथे एक कन्या छात्रावास व एक वृद्धाश्रम सुरु केला. परिसरातील मुली-वृद्ध महिलांना आधार व निवारा दिला. आपल्या कार्याची व्याप्ती वाढत असताना, आज ही त्या एकल अभियानातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व अभिभावक म्हणून काम करतात.
दृढ निश्चयाचे एक अप्रतिम, परंतु तितकेच आव्हानात्मक कार्य त्यांनी स्वतःवरील विश्वास, कामातील निष्ठा व समाजाप्रति असलेले उत्तरदायित्व जपत उभे केले. ज्या वनवासी समाजाकरिता एकल अभियान समर्पित आहे, त्याच समाजातील या तेजपुंजास सन्मानित करताना, संस्था म्हणून आम्ही ही गौरान्वित झाल्याचे नक्कीच अनुभवीत आहोत.
 डॉ. बुधरी ताती यांच्या कार्याला शतश: प्रणाम व वंदन!
 
यापूर्वीच्या बाया कर्वे पुरस्काराच्या मानकरी....
 
 
कै. गंगुताई पटवर्धन, कै. निर्मलाताई पुरंदरे, कै. विजयाताई लवाटे, डॉ. मंदा आमटे, नसिमा हुरजुक, पुष्पा नडे, प्रेमा पुरव, लीला पाटील, सुनंदा पटवर्धन, रेणू दांडेकर, डॉ. स्मिता कोल्हे, मीना इनामदार, सिंधुताई अंबिके, डॉ. माया तुळपुळे, पद्मजा गोडबोले, मीरा बडवे, अनुराधा भोसले, डॉ. संजीवनी केळकर, जयश्री काळे, सुवर्णा गोखले, सुनीता गोडबोले, चंद्रिका चौहान, रूषाताई वळवी, जया तासुंग मोयोंग, किलांबी पंकजा वल्ली.
 
 
 
- स्मिता कुलकर्णी
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0