‘अत्त दीपो भव’

    28-Nov-2022   
Total Views |
 
अशोक हिरे
 
 
 
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्याची प्रेरणा घेऊन आयुष्यभर समाजाच्या हितासाठी विचारकार्य करण्याचा वसा घेतलेले घाटकोपर मुंबईचे अशोक हिरे यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
 
 
“लेकरा, आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेकडकरांमुळेच आहे,” भारतीय बौद्ध महासभेचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष हरीभाऊ आपल्या मुलाला अशोकला सांगत असत. ते माटुंगा वर्कशॉप रेल्वेमध्ये कामाला होते. मात्र, कर्जत तालुक्यातील आपल्या समाजबांधवांच्या ऐक्यासाठी आणि भल्यासाठी हरीभाऊ नेहमी प्रयत्नशील असत. त्यांची तळमळ आणि नि:स्वार्थी भावना त्यांचे पुत्र अशोक यांनी जवळून पाहिली. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर आणि आयामात अशोक यांनी समाजाच्या उत्थानाचा ध्यास घेत कार्य केले. अशोक हिरे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय केंद्राचे (शहीद स्मारक समिती) अध्यक्ष आहेत. ते रेल्वेत नोकरीला होते. तेव्हा ‘ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एमप्लॉईज असोसिएशन सेंट्रल झोन’चे कार्याध्यक्ष होते. (या ‘सेंट्रल झोन’मध्ये नागपूर, भुसावळ, सोलापूर, मुंबई, पुणे हे विभाग येतात.) तसेच ते ‘ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एमप्लॉईज असोसिएशन माटुंगा वर्कशॉप’चे अध्यक्ष होते. अशोक हे ‘सम्यक् विकास संघा‘चे विश्वस्त आणि संस्थापक सदस्य आहेत. ‘माता रमाबाई नगर व्यापारी असोसिएशन’चे सचिवपदही त्यांनी भूषविले आहे.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय आहे.” अशोक यांनी हा विचार आत्मसात केला. त्यामुळे जातिपातीचे भेद लंघत त्यांनी माणूस म्हणून त्यांच्या संपर्कात येणार्‍या माणसाला मदतीचा हात दिला. 2005 साली मुंबईत महापूर आला. त्यावेळी माता रमाबाई नगर घाटकोपरलाही पुराने वेढले. अशोक यांनी त्या पुरात फसलेल्या बांधवांसाठी त्यावेळी भरीव कार्य केले. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची मदत घेत त्यांनी त्यावेळी बचावकार्य केले होते. पुरात ज्यांचे घर, घरातील वस्तू, अन्नधान्यांसह वाहून गेले, तुटले, अशा कुटुंबांना अशोक यांनी स्वत:च्या घरात पूर ओसरेपर्यंत ठेवले. संस्थांच्या मदतीने परिसरात आरोग्य शिबीर, अन्नदान केले. गरजेच्या वस्तूंचे वाटप केले. हेच काम त्यांनी कोरोना काळातही केले. कोरोना काळात तर माता रमाबाई नगरातील सर्वच डॉक्टरांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने आरोग्य तपासणी उपचाराचे महाशिबीर आयोजित केले. कोरोनाबाबत लोकांची जागृती केली.
 
 
अशोक यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. मात्र, ते या सगळ्यांनी खचले नाहीत. कर्जत तालुक्यातील ओमरोली गावचे हिरे कुटुंब. हरीभाऊ आणि चंद्रभागा यांना आठ अपत्ये. त्यापैकी एक अशोक. हरीभाऊ रेल्वेत कामाला असले, तरी त्यावेळी रेल्वेत काम करणार्‍यांना पगार फारसा नव्हताच. त्यामुळे घरची गरिबीच. एकवेळचे अन्न मिळाले, तरी खूप बरे असे ते दिवस. मात्र, घरी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे पालन केले जाई. कष्टाला न घाबरता परिस्थितीवर मात करायलाच हवी, हे संस्कार घरी दिले जात. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षीच शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली तेव्हा सुट्टीमध्ये अशोक अंबरनाथ येथील कंपनीमध्ये कामाला जाऊ लागले. पोत्यांमध्ये रसायन भरण्याचे काम. एक पोते भरले की, 20 पैसे मिळायचे. दिवसाला काही पोती भरली की, दोन-तीन रूपये मिळायचे.
 
 
पण, त्या पैशांनी घरात चूल पेटायची हेच समाधान. शाळेत जायचे आणि छोटे-मोठे कामही करायचे, असे दिवस जात होते. भाकरी मिळवण्याचा संघर्ष मोठा होता. पुढे हिरे कुटुंब विक्रोळीला आले. दहावीपर्यंत शिक्षण झालेले आणि नव्याने विक्रोळीला आलेल्या अशोक यांनी हॉटेलमध्ये ‘वेटर’चे काम सुरू केले. पण, आयुष्य असेच घालवायचे नाही, ही जिद्द मनात होती. त्यामुळे आणखीन चांगल्या कामाच्या शोधात ते राहिले. त्यांना रेल्वेतच नोकरी मिळाली. पुढे मामाच्या मुलीशी विवाह झाला आणि अशोक माता रमाबाई नगर घाटकोपर येथे राहायला आले. परिसराचे वातावरण पूर्ण आंबेडकरमय. या वातावरणात अशोक रूळले. येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेऊ लागले. आंदोलने, मोर्चा यामध्ये सहभागी होऊ लागले.
 
 
रेल्वेमध्ये कामाला असताना त्यांनी त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला मदत केली. त्यामध्ये ती व्यक्ती मागास समाजाची असेल तरच मदत करायची, असे त्यांनी कधीही केले नाही. अशोक यांच्या पुढाकारानेच ‘ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन’तर्फे महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर नाश्ता आणि चहाचा स्टॉल पहिल्यांदा सुरू केला. तो स्टॉल आजतागायत सुरू आहे.
 
 
2012 साली यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. आपण उद्योग-व्यवसाय केला, तर वेळ वाचेल. वाचलेल्या वेळात सामाजिक कार्य करू, असे त्यांनी ठरवले. त्यातूनच मग अशोक यांनी ‘एस. अशोका एंटरप्रायझेस कंपनी’ सुरू केली. आज शहरातील काही रेल्वे स्थानकालगत ‘पार्किंग’चे काम अशोक यांची कंपनी पाहते. हे सगळे करत असताना अशोक सामाजिक बांधिलकी सांभाळून आहेत. ‘शहीद स्मारक समिती’चे अध्यक्ष म्हणून परिसरात जागृतीपर आणि सेवाभावी प्रेरणादायी उपक्रम राबवायचे, हा चंग त्यांनी बांधला आहे. परिसरातील युवकांनी उच्चशिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे, तसेच परिसर नशामुक्त व्हावा, ‘अत्त दीपो भव’चा मार्ग आणखीन प्रखरतेने समाजाने अवलंबवावा म्हणून अशोक यांची इच्छा आहे. अशोक हिरे यांच्यासारखी व्यक्ती खर्‍या अर्थाने ‘प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’च असतात. समाजाचे मानबिंदू असतात. ‘अत्त दीपो भव’ म्हणत ते स्वत:सह समाजाचे उत्थान करण्यासाठी कार्यरत असतात.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.