नॅशनल पार्कमधील सिंहाचा मृत्यू; सिंहाच्या एका कुटुंबाचा भावपूर्ण अंत

27 Nov 2022 18:07:56
jespa lion


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून सिंहाची (jespa lion) जोडी दाखल झालेली असताना उद्यानातच जन्मलेल्या एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. 'जेस्पा' (jespa lion) नामक नर सिंहाचा रविवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. राष्ट्रीय उद्यानातच जन्मलेला हा सिंह गेल्या काही वर्षांपासून आजारी होता. (jespa lion)
 
 
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी बंद होती. या सफारीला चालना देण्यासाठी शुक्रवारी गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंहाची एक जोडी उद्यानात दाखल झाली. मात्र, ज्या कारणामुळे सिंह सफारी बंद होती, त्यामागे उद्यानात पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सिंहांचे आजारपण कारणीभूत होते. या आजारी सिंहांमधील १२ वर्षीय 'जेस्पा' नामक नर सिंहांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या काही दिवासांपासून तो आजारी होता. तो 'आॅस्ट्रियो' या संधीवाताच्या आजाराने ग्रस्त होता. या रोगामुळे त्याला मागच्या स्नायूंच्या दुखापतीने ग्रासले होते. त्यामुळे 'जेस्पा'ला 'मल्टिपल डेक्यूबिटस अल्सर', सेप्टिक जखमा आणि गळू झाला होता. परिणामी तो मागच्या १५ दिवसांपासून जागेवरुन उठत देखील नव्हता. अशा परिस्थित्तीत शरीराअंतर्गत अवयव निकामी झाल्यामुळे आणि अशक्तपणामुळे रविवारी त्याचा मृत्यू झाला. 
 
 
'जेस्पा'चे कुटुंब
'जेस्पा'चा जन्म राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीमध्येच २२ सप्टेंबर, २०११ साली झाला होता. राष्ट्रीय उद्यानात २००९ साली बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यानातून 'रविंद्र' आणि 'शोभा' नामक सिंहाची एक जोडी आणण्यात आली होती. 'रविंद्र' आणि 'शोभा' या जोडीने राष्ट्रीय उद्यानात २०११ साली तीन छाव्यांना जन्म दिला. यातील एक छावा नर, तर दोन मादी होत्या. त्यांचे नाव 'गोपा', 'जेस्पा' आणि 'लिटील शोभा' असे ठेवण्यात आले. 'रविंद्र' आणि 'शोभा'सोबत सिंह सफारीत नांदणारे हे तिन्ही छावे पाहण्यासाठी त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असे. 'शोभा' देखील या छाव्यांना घेऊन सफारीच्या बससमोरुन ऐटीत चालत असे. कालांतराने 'शोभा' आणि 'लिटील शोभा'च्या मृत्यूनंतर हे कुटुंब त्रिकोणी झाले. 'रविंद्र'ला देखील आजाराने घेरले. 'गोपा' आणि 'जेस्पा' यांच्या बळावर सिंह सफारी सुरू होती. मात्र, त्यानंतर 'गोपा'ही आजारी पडली. गेल्यावर्षी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर यावर्षी आॅक्टोबर महिन्यात १७ वर्षीय 'रविंद्र' देखील मृत पावला आणि रविवार 'जेस्पा' देखील मृत्यू झाल्याने राष्ट्रीय उद्यानातील सिंहाच्या या कुटुंबाचा करुण अंत झाला.
 
 सिंह सफारीमध्ये आई शोभा समवेत तीन छावे 'गोपा', 'जेस्पा' आणि 'लिटील शोभा' - छायाचित्र : राजू बांदेकर
lion
 
Powered By Sangraha 9.0