सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात ५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर आंबोली गाव विस्तारले आहे. या गावाचा परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानला जातो. कारण, उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग असल्याने याठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती देखील सापडतात. शिवाय एवढ्या छोट्या भागामधून २००५ सालापासून २२ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. मात्र, याठिकाणी सापडणाऱ्या वेगवेगळ्या जीवांची प्रजातीनुरुप यादी आजवर प्रसिद्ध झाली नव्हती. परंतु, आता आंबोलीत आढळणाऱ्या चतुर आणि टाचणीच्या (odonate) प्रजातींची यादी प्रसिद्ध झाली आहे. 'जर्नल आॅफ थ्रेट्रेंड टॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शनिवारी ही यादी प्रसिद्ध झाली. संशोधक डाॅ. दत्तप्रसाद सावंत, वन्यजीव अभ्यासक व आंबोलीचे रहिवासी हेमंत ओगले आणि राकेश देऊलकर यांनी या यादीचे संकलन केले आहे.