मत्स्यपरांच्या तस्करीवर 'सायटीस'कडून बंदी; महाराष्ट्रातूनही होते शार्कच्या मत्स्यपरांची तस्करी

26 Nov 2022 20:51:00

shark fin


मुंबई (अक्षय मांडवकर) -
’संयुक्त राष्ट्र संघा’अंतर्गत काम करणार्‍या ’कनव्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड स्पिसीज ऑफ वाईल्ड फौना अ‍ॅण्ड फ्लोरा’ने (cites) हॅमरहेड आणि रेक्कीएम गटातील शार्क आणि गिटारफीश माशांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीवर बंदी आणली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या माशांच्या मत्स्यपरांची होणारी तस्करी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यामधील काही प्रजाती या महाराष्ट्रात आढळत असून राज्यातूनही या प्रजातींच्या मत्स्यपरांची तस्करी होते. cites

नैसर्गिक संपत्तीच्या तस्करीवरील बंदीसंदर्भात बहुपक्षीय करार करणार्‍या ’cites’ने शार्क आणि गिटारफीश माशांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात या माशांची मांस, मत्स्यपर (फीन) आणि तेलासाठी मोठ्या प्रमाणात तस्करी होते. आग्नेय आशियाई देशांमध्ये शार्कच्या मत्स्यपरांना मोठी मागणी आहे. शार्क माशांच्या विविध अवयवांची तस्करी ही परदेशात सूप, सौंदर्य प्रसाधने, तेल, कपडे बनविण्यासाठी होते. या तस्करीवर रोख लावण्याचा निर्णय २५ नोव्हेंबर रोजी 'सायटीस'ने पनामा येथे पार पडलेल्या १९ व्या बैठकीत घेतला. या निर्णयाअंतर्गत हॅमरहेड आणि रेक्कीएम गटातील शार्क व गिटारफीश माशांच्या प्रजातींना संरक्षणाच्या 'परिशिष्ट २' मध्ये (संकटग्रस्त प्रजात) संरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयामुळे या माशांचे मत्स्यपर आणि इतर अवयवांच्या तस्करीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी आली आहे.



हॅमरहेड आणि रेक्कीएम गटातील शार्क व गिटारफीश माशांच्या काही प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. या माशांच्या समावेश 'इलास्मोब्रान्च' या कुळात होतो. या कुळातील माशांच्या मासेमारीच्या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने राज्यात अभ्यास केला होता. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान राज्यातील सात बंदरांवरील मासेमारीची नोंद करुन हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावेळी संशोधकांना स्पेडनाॅझ शार्क, बुल शार्क, ब्राॅडफिन शार्क, टायगर शार्क, ब्लॅक टीप शार्क, मिल्क डाॅक शार्क या प्रजातींचे मत्स्यपर सातपाटी आणि मालवणच्या बंदरावर आढळले. याशिवाय २०१८ साली शिवडीतील एका गोदामातून शार्क माशांचे तब्बल आठ हजार किलो वजनाचे मत्स्यपर ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एका मच्छीमाराने नाव न छापण्याच्या अटीवर दै. 'मुंबई तरुण भारत'ला सांगितले की, "देशात शार्कच्या मत्स्यपरांची मोठी तस्करी ही दक्षिण भारतातील काही बंदरातून होते. यामध्ये तमिळनाडूमधील दोन आणि आंध्रपद्रेशमधील एका बंदराचा समावेश आहे. शिवाय गुजरातमधील एका बंदरावरही शार्कच्या मत्स्यपरांची साठवणूक केली जाते. महाराष्ट्रात हे प्रमाण अल्प असले तरी, राज्यातील मच्छीमार हे मासेमारीतून मिळालेल्या शार्कच्या प्रजातींचे मत्स्यपर कापून ते सुकवतात. त्याची साठवणूक करतात आणि एकत्रितरित्या त्याची विक्री करतात." २०१३ च्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या धोरणानुसार देशात मत्स्यपरांच्या आयात-निर्यातीवर निर्बंध आहेत.

महाराष्ट्रातील नष्ट्रपाय प्रजाती
व्हाईट-स्पाॅटेड गिटारफीश, बोमाऊथ गिटारफीश, लाँगकॉम्ब सॉफिश, ओशन व्हाईट-टीप शार्क, स्कॅलोपेड हॅमरहेड, ग्रेट हॅमरहेड, जायन्टा गिटारफिश, शार्पनाॅज गिटारफिश, व्हाईडनाॅज गिटारफिश, काॅमन शाॅव्हेलनाॅज रे


Powered By Sangraha 9.0