‘सगळेच महाराष्ट्राबाहेर’चा अपप्रचार

    26-Nov-2022   
Total Views |
propaganda
 
 
राज्यात काहीच महिन्यांपूर्वी ऐतिहासिक सत्तांतर झाले. शिवसेनेच्या फुटीमुळे फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आले. पण, भाजप आणि ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’चे हे सरकार सत्तेत आल्यापासून कायमच अपप्रचाराचा एक ‘नरेटिव्ह’ काही पत्रकारांना हाताशी घेऊन (फडणवीसांच्याच भाषेत सांगायचे तर ‘एचएमव्ही पत्रकार’) जोरदार पद्धतीने राबविण्यास प्रारंभ झाला. आधी ‘काही कंपन्या महाराष्ट्रातून बस्तान गुंडाळून राज्याबाहेर गेल्या. शिंदे-फडणवीसांनी त्या मुद्दाम गुजरातला जाऊ दिल्या,’ यांसारख्या आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.
 
 
पण, जेव्हा यासंबंधीचे पुरावे सादर करायची वेळ आली तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील एकाही नेत्याला याबाबतचे कोणतेही पुरावे, कागदपत्रे दाखवता आली नाहीच. यावरून हेच सिद्ध होते की, जे जे उद्योेग राज्याबाहेर गेले, ते सगळे महाविकास आघाडीच्या काळातच. पण, तेव्हा या बाबी सहजासहजी सार्वजनिक होणार नाहीत, याची काळजी तेवढी घेतली गेली. आता यावरून राळ खाली बसते ना बसते तोवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून पुन्हा अशाच बातम्यांची पेरणी झालेली दिसते.
 
 
आधी कंपन्या बाहेर गेल्या म्हणून कांगावा आणि आता तर गावंच्या गावं म्हणे कर्नाटक, तेलंगणच्या वाटेवर असल्याच्या बातम्या झळकू लागल्या. त्यातच पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडोरविरोधी गटातही उभी फूट पडली. कारण, या आंदोलनातील काही महाभागांनी महाराष्ट्र सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर पुढील आषाढी एकादशीच्या पूजेला चक्क कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पूजेचा मान देण्याची भाषा केल्यामुळे हे आंदोलन पुरते भरकटले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून आधीच शाब्दिक वातावरण पेटले असताना, महाराष्ट्रातून अशी विधाने समोेर येणे सर्वस्वी दुर्देवी!
 
 
त्यामुळे या आंदोलनकर्त्यांना फूस लावून त्यांच्या मुखातून मुद्दाम हे वदवण्यात आले का, याचीही चौकशी झालीच पाहिजे. कारण, एवढे दिवस हे आंदोलन पंढरपूर परिसराशी संबंधित असताना त्यात कर्नाटक, सीमावादाचा मुळात प्रश्नच उद्भवत नव्हता. तेव्हा, हा विषय तापलाय म्हटल्यावर मुद्दाम त्यावर घाव घालण्याचाच हा केविलवाणा प्रकार म्हणावा लागेल. तीच गत अचानक उसळी घेतलेल्या स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीचाही. तेव्हा, ‘सगळेच चालले महाराष्ट्रबाहेर’ हा अपप्रचार आता खोडून काढायलाच हवा.
भारत जोडो’ नव्हे ‘भारत जानो’
नरेंद्र मोदी हे मूळचे जरी गुजरातचे सुपुत्र आणि तेथील माजी मुख्यमंत्री असले तरी ते आज देशाचे पंतप्रधान म्हणून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी सर्वामान्यता प्राप्त केली. त्यामुळे देशाच्या कुठल्याही कोपर्यात कार्यक्रम असला तरी मोदी अगदी त्या राज्याचेच होऊन जातात. त्यांची वेशभूषा, भाषा ही अगदी त्या त्या राज्याला साजेशी अशीच. इतकी की, समोरच्याला वाटावे हा माणूस तर माझ्याच राज्यातला! 2014 पासून ते आता 2022 पर्यंत मोदींची अशीच लोकप्रिय प्रतिमा.
 
 
त्यामुळे त्या त्या राज्याची नेमकी नस ओळखून, तेथील अस्मितेला यथोचित मान-सन्मान देऊन मोदींनी प्रादेशिक भिन्नतेला वेळोवेळी गौरवान्वितच केले. खरंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनीसुद्धा आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेत नाही म्हणायला त्या त्या राज्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यातील एकंदरीतच कृत्रिमपणामुळे त्यात जीवंतपणा मात्र अभावानेच दिसून आला.
 
 
असो. तर नुकतेच महाराष्ट्रातून ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशात दाखल झाली. यादरम्यान गुजरातमध्येही निवडणुका असून, राहुल गांधींनी तिथेही तोंड दाखवावे, म्हणून औषधापुरते राहुल गांधी गुजरातमध्येही दाखल झाले. तेथील एका जाहीर सभेत चक्क राहुल गांधींनी अनुवादक उभा केला. दक्षिणेकडील राज्यात अनुवादकाची गरज समजूही शकतो, पण गुजरातसारख्या हिंदी व्यवस्थित समजू शकणार्या राज्यात अशाप्रकारे अनुवादक उभा करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
 
 
त्यातही अनुवादक गोंधळला व तुम्ही हिंदीत बोललात तरी लोकांना कळेल, असे राहुल गांधींना सांगत निघूनही गेला. यावरून राहुल गांधी भारताला, येथील विविध प्रदेशातील अस्मितेला, भाषांना खरंच किती चांगले ओळखतात, असाच प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ‘भारत जोडो’च्या नावाखाली खरंतर राहुल गांधींसाठीच ही ‘भारत जानो’ यात्राच म्हणावी लागेल. कारण, यानिमित्ताने का होईना, राहुल गांधी घराबाहेर पडले खरे. इतकी वर्षे राजकारणात असूनही त्यांना भारताचा आत्मा, भारतीयांचा आवाज कधीच ओळखता आला नाही. म्हणूनच पर्यायाने 2014 साली भारतीयांनी काँग्रेसला साफ नाकारले. पण, आता ‘भारत जोडो’मुळे राहुल गांधींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा उंचावल्या असल्या तरी त्यामुळे सत्तेचा मार्ग प्रशस्त होईल, ही शक्यता धुसरच!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची