संविधान : भारतीय लोकशाहीचा प्राण

26 Nov 2022 13:25:36

Indian Constitution
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान संपूर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ ठरलेले संविधान आहे. दि. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान पूर्ण होऊन देशाला अर्पण करण्यात आले. दि. 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून देशभर दरवर्षी साजरा होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन संविधानाचा गौरव केला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यावर निवडून आलेल्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम संविधानाला नतमस्तक होऊन अभिवादन केले होते. संविधानाचे पूजक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वतः संविधानाचे रक्षक आहोत. संविधान स्वयंभू स्वरक्षणास स्वयंपूर्ण आहे. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत देशात संविधान राहणार आहे. संविधानाला कोणीही धक्का देऊ शकत नाही, असे व्यापक परिपूर्ण संविधान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर आधुनिक भारताचेही शिल्पकार ठरतात. डॉ. आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे.
 
 
संसदीय लोकशाहीसाठी भारतीय संविधान जगात आदर्श संविधान म्हणून नावाजले गेले आहे. सामाजिक समता; आर्थिक समता; धर्मनिरपेक्षता; सर्वधर्मसमभाव; बंधुता; सामाजिक न्याय; स्वातंत्र्य; या मूल्यांमुळे भारतीय संविधान मजबूत आहे आणि संविधानामुळे भारतीय संसदीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मजबूत उभी आहे. भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डौलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे. त्यामुळे लोकशाहीचा प्राण ठरलेले भारतीय संविधान प्रत्येक देशवासी मानत आहे. प्रत्येक माणूस संविधान मानत आहे. जो संविधान मानत नाही, त्याला भारतात राहण्याचा अधिकार नाही. संविधान प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. संविधानातून डॉ. आंबेडकरांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. सर्वांनी आपआपला धर्म पाळला पाहिजे. मात्र, इतरांच्या धर्माचाही आदर केला पाहिजे. धर्मावरून तेढ निर्माण होता कामा नये, धार्मिक भेदभावातून देशात फूट पडता कामा नये.
 
डॉ. आंबेडकरांनी जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्यापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ असल्याचा उपदेश केला आहे. त्यातून त्यांनी आपणास राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती शिकविली आहे. त्यामुळे, आम्ही राष्ट्राभिमानी आहोत. डॉ. आंबेडकरांनी सांगितल्यानुसार, जाती-जातीतील धर्मा-धर्मातील संघर्ष मिटला पाहिजे. त्याप्रमाणे, देशात यश मिळत आहे. जाती-धर्मातील संघर्ष मिटत चालला आहे. मात्र, अजूनही काही प्रमाणात मागासवर्गीय तसेच वनवासींवर अत्याचार होतात. धार्मिक जातीय संघर्ष होतात. वाद होतात. जातिधर्माचे होणारे वाद संपूर्णतः संपले पाहिजेत. जातिभेद, धर्मभेद हे सर्व भेदभाव मिटवून समतावादी भारत साकारला पाहिजे. आपण जातिधर्माचे गर्व बाळगण्यापेक्षा भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे. आपण प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच असलो पाहिजे. अशी राष्ट्रप्रेमाची भावना मनामनात जागी करणे, हेच खरे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनी अभिवादन ठरेल!
- रामदास आठवले
(लेखक केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री आहेत.)
(शब्दांकन : हेमंत रणपिसे)

Powered By Sangraha 9.0